गोरगरिबांची सेवा हाच विठ्ठल

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 20 June 2017

विठ्ठल जळीस्थळी सर्वत्र व्यापून राहिला आहे. सध्याचे जग सुखासाठी धावते आहे. ‘कोण पळे कोणापुढे’ अशी जणू स्पर्धाच लागली आहे. मात्र, खरा आनंद कशात, हे वारकऱ्यांना माहीत आहे. आनंद प्रत्येकाच्या आत असतो. सध्याच्या काळात लोक लौकिक आनंदाच्या मागे लागले आहेत. एक हजार रुपयांची कपबशी आणून लोक घरात दर्शनी ठिकाणी लावून मोठेपणा मिरवून आनंद मिळविण्याचा प्रयत्न करतात. मात्र, तीच कपबशी हातातून पडली, तर एक हजार रुपयांचे नुकसान झाले म्हणून दुःख करीत बसतात. म्हणजे लौकिक जगात मिळणारा आनंद तात्पुरता आहे, तो चिरकाल टिकत नाही. खरा आनंद विठ्ठलाच्या वारकऱ्यांना नामस्मरणात मिळतो. विठ्ठलाच्या चरणांवर मिळतो.

विठ्ठल जळीस्थळी सर्वत्र व्यापून राहिला आहे. सध्याचे जग सुखासाठी धावते आहे. ‘कोण पळे कोणापुढे’ अशी जणू स्पर्धाच लागली आहे. मात्र, खरा आनंद कशात, हे वारकऱ्यांना माहीत आहे. आनंद प्रत्येकाच्या आत असतो. सध्याच्या काळात लोक लौकिक आनंदाच्या मागे लागले आहेत. एक हजार रुपयांची कपबशी आणून लोक घरात दर्शनी ठिकाणी लावून मोठेपणा मिरवून आनंद मिळविण्याचा प्रयत्न करतात. मात्र, तीच कपबशी हातातून पडली, तर एक हजार रुपयांचे नुकसान झाले म्हणून दुःख करीत बसतात. म्हणजे लौकिक जगात मिळणारा आनंद तात्पुरता आहे, तो चिरकाल टिकत नाही. खरा आनंद विठ्ठलाच्या वारकऱ्यांना नामस्मरणात मिळतो. विठ्ठलाच्या चरणांवर मिळतो. घरची परिस्थिती चांगली नसली तरी वारीत प्रतिकूल परिस्थितीतही ‘आनंदाच्या डोही आनंद तरंग’ अशी प्रचिती वारकरी अनुभवतात. 

खऱ्या जीवनाचा अर्थ मला स्वामी विवेकानंदांच्या विचारांतून समजला. जीवन हे सेवेसाठी असते. देवळात देव आहे, हे खरे आहे; पण गाव, राष्ट्र हेही एक मंदिरच आहे. जनता सर्वेसर्वा आहे. जनतेची सेवा ही खरी ईश्वराची पूजा आहे, असा संदेश सर्वच संतांनी दिला. ‘जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले’ असे संत तुकाराम महाराज त्यासाठीच म्हणतात. तसेच, ‘जे खळांचे व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो’ असे संत ज्ञानेश्‍वर महाराजांनी म्हटले आहे. सर्व संतांनी सामाजिकतेचा, तसेच समतेचाच विचार दिला आहे. विवेकानंदांच्या विचारातून सेवेचा अर्थ कळाला. निष्काम कर्म करण्याची उमेद निर्माण झाली. त्या वेळी मी आळंदीला गेलो. ज्ञानेश्‍वर महाराजांच्या समाधीवर माळ ठेवून ती गळ्यात घातली. तेव्हाच माउलींजवळ भावना व्यक्त केली. ‘ही माळ आता गळ्यात नाही, माझ्या देहावर हे तुळशीपत्र आहे. आजपासून हा देह माझा नाही, तो समाजाचा आहे.’ त्यानंतर गावात आलो. ज्ञानेश्वरीतील ओवी वाचनात आली. ‘नगरेची रचावी, जलाशये निर्मावी, महावने लावावी नानाविध.’ या ओवीची फलश्रुती राळेगणसिद्धीमध्ये करण्याचा प्रयत्न केला. त्यातून देशाला नवी दिशा मिळाली. पाणलोट क्षेत्र विकासाचा विचार होऊ लागला आहे. संतविचारांचा अभ्यास करण्यासाठी माळ घातल्यानंतर चार महिने पंढरपूरला चातुर्मास करायचा आणि आठ महिने समाजाची सेवा करण्याचा निर्धार केला. त्यानुसार पाच वर्षे मी निळोबारायांच्या पालखीसमवेत पायी वारी केली. त्या वेळी दिंडीतील वारकऱ्यांना शिस्तीचा, बिडी- तंबाखू न खाण्याचा आग्रह धरला. वारीनंतर चातुर्मासात आत्मिक आनंदासाठी अभ्यासू, ज्ञानी लोकांचे विचार श्रवण केले. मात्र, समाजाला भेडसावणारे प्रश्न शांत बसू देत नव्हते. दुःखी, पीडित, रंजल्या- गांजलेल्यांची सेवा हीच पूजा आहे, ते त्यांचेच रूप आहे, हा संतांचा संदेश प्रमाण मानला. माझ्या आयुष्यात मी स्वार्थाला कधीच थारा दिला नाही. गळ्यात तुळशीची माळ घालण्यासाठी विठ्ठलाची कृपा झाली, त्यानेच मला त्यापुढील आयुष्यात सत्कर्म करण्याची शक्ती दिली. गाव, समाज, देश यांची सेवा करण्याची प्रेरणा त्याच्याच कृपेने मिळाली.

(शब्दांकन - शंकर टेमघरे)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pandharpur Wari 2017