अभंग गाताना जाणवतो परमतत्त्वाचा स्पर्श

(शब्दांकन - नीला शर्मा)
Wednesday, 21 June 2017

‘अगा वैकुंठीच्या राया, अगा विठ्ठल सखया’ अशी आर्त साद घालणाऱ्या संत कान्होपात्रेच्या भूमिकेत जेव्हा मी रंगमंचावर असते, तेव्हा विलक्षण अनुभूती जाणवत असते. प्रेक्षक माझ्या गायन व अभिनयाला दाद देत असतात. मला मात्र ती किमया कान्होपात्रेच्या व्यक्तिमत्त्वाची वाटते. कान्होपात्रेला सोसावा लागलेला छळ, समाजाकडून झालेली अवहेलना व संकटांचे डोंगर कोसळत असतानाही तिनं ते कमालीच्या धीरानं सोसणं हे सारं मला प्रेरणा आणि बळ देत असतं. केवढ्या ताकदीनं साऱ्याला तोंड देत ती विठ्ठलाशी एकरूप झाली होती. वंचितांच्या दुःखाचा उद्‌गार काव्यातून करत होती.

‘अगा वैकुंठीच्या राया, अगा विठ्ठल सखया’ अशी आर्त साद घालणाऱ्या संत कान्होपात्रेच्या भूमिकेत जेव्हा मी रंगमंचावर असते, तेव्हा विलक्षण अनुभूती जाणवत असते. प्रेक्षक माझ्या गायन व अभिनयाला दाद देत असतात. मला मात्र ती किमया कान्होपात्रेच्या व्यक्तिमत्त्वाची वाटते. कान्होपात्रेला सोसावा लागलेला छळ, समाजाकडून झालेली अवहेलना व संकटांचे डोंगर कोसळत असतानाही तिनं ते कमालीच्या धीरानं सोसणं हे सारं मला प्रेरणा आणि बळ देत असतं. केवढ्या ताकदीनं साऱ्याला तोंड देत ती विठ्ठलाशी एकरूप झाली होती. वंचितांच्या दुःखाचा उद्‌गार काव्यातून करत होती. राग, संतापाच्या पलीकडे जाऊन नवनवीन रचनांच्या माध्यमातून नवा विचार, नवीन सृजन करत होती. या साऱ्याचा मी खोलवर विचार करत जाते, तिला शोधत असते, मनोमन तिच्याशी संवाद साधत असते. त्या एकत्रित रसायनातून माझा तो गायन-अभिनयाचा आविष्कार घडत असतो आणि कान्होपात्रेची सकारात्मकता, तिला विठ्ठलात जाणवलेला तो परमतत्त्वाचा स्पर्श मलाही जाणवल्यावाचून राहत नाही.

‘संत कान्होपात्रा’ या संगीत नाटकाचे गेल्या दोन वर्षांत पंचवीस प्रयोग झाले. प्रत्येक प्रयोगात कान्होपात्रेच्या अभंगांनी मला भरभरून अवर्णनीय समाधान दिलं. एरवीही मी संतरचनांच्या गायनाचे कार्यक्रम सतत करत असते. तेव्हाही मला अलौकिक आनंद मिळत असतो; मात्र नारायण विनायक कुलकर्णी यांनी लिहिलेल्या, कान्होपात्राचं चरित्र सांगीतिक अंगानं मांडणाऱ्या या नाटकाचं मोल माझ्या लेखी काही औरच. पहिला यमन रागात बांधलेला अभंग ‘नम्र भाव गुरूपायी मम हा’ ती चोखोबांसाठी गाते. मग भूप रागातील ‘सरे तत्त्व कान्हे सुख आज’ गायल्यावर चोखोबांकडून तिला दीक्षा मिळाल्यावर ‘अवघाची संसार सुखाचा करीन’ हा अभंग गाताना मन प्रफुल्लित होऊन जातं. पुढं ‘देवा धरिले चरण’ व ‘माझ्या जीवाचे जीवन’, ‘पतित तू पावना’, ‘वर्म वैरियाचे हाती’, ‘दीन पतित अन्यायी’, ‘पतितपावन म्हणविसी आधी’ यांसारख्या एकाहून एक सरस रचना गाताना मी भावविभोर होते. संत चोखोबांनी रचलेले ‘जोहार मायबाप जोहार’, ‘धाव घाली विठू आता चालू नको मंद’, ‘ऊस डोंगा परि रस नोहे डोंगा’ अशा अभंगांतील अर्थाचा उलगडाही दर वेळी नव्यानं या भूमिकेमुळे मला होतो. संत नामदेवांची रचनाही अंतर्मुख करून जाते.

अस्मिता चिंचाळकर 
मराठी संगीत नाटकांमधील गायिका-अभिनेत्री


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pandharpur Wari 2017 asmita chinchalkar