योग्य दिशा दाखवणारे विठ्ठलरूपच!

(शब्दांकन - तेजल गावडे)
Thursday, 22 June 2017

विठ्ठल म्हटलं की, मला पंढरपूरची वारी आठवते. मी या वारीमध्ये कधी सहभागी झालो नाही, परंतु वारी मला आवडते, हेही निश्‍चित. त्याचंही एक खास कारण आहे. माझी आजी (माझ्या वडिलांची आई) सुशीला महाजनी ही खरं तर बालविधवा. स्वातंत्र्यपूर्व काळात पंढरपूरच्या देवळात विधवांना प्रवेश नव्हता. माझ्या आजीचे वडील हे सुधारक मताचे होते. माझ्या आजीला ते पंढरपूरच्या देवळात विठ्ठलाच्या दर्शनासाठी घेऊन गेले. ते रात्री पंढरपूरला पोहोचले. गावातील मंडळींना माझी आजी आणि आजीचे वडील मंदिरात प्रवेश करणार असल्याची कुणकुण लागली होती.

विठ्ठल म्हटलं की, मला पंढरपूरची वारी आठवते. मी या वारीमध्ये कधी सहभागी झालो नाही, परंतु वारी मला आवडते, हेही निश्‍चित. त्याचंही एक खास कारण आहे. माझी आजी (माझ्या वडिलांची आई) सुशीला महाजनी ही खरं तर बालविधवा. स्वातंत्र्यपूर्व काळात पंढरपूरच्या देवळात विधवांना प्रवेश नव्हता. माझ्या आजीचे वडील हे सुधारक मताचे होते. माझ्या आजीला ते पंढरपूरच्या देवळात विठ्ठलाच्या दर्शनासाठी घेऊन गेले. ते रात्री पंढरपूरला पोहोचले. गावातील मंडळींना माझी आजी आणि आजीचे वडील मंदिरात प्रवेश करणार असल्याची कुणकुण लागली होती. त्यांच्या या प्रवेशाला विरोध इतका तीव्र झाला, की त्यांनी माझ्या आजीला, तसेच तिच्या वडिलांना कुणाला घरातही घेऊ दिले नाही. त्यामुळे ती रात्र त्यांनी स्टेशनवर झोपून काढली. ही गोष्ट महात्मा गांधींच्या कानावर गेली. ते तिथे प्रत्यक्षात येऊ शकत नव्हते. मग त्यांनी पुण्यातील त्यांच्या जवळचे कार्यकर्ते तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांना ही बाब सांगितली. ‘तुम्ही स्वतः तेथे जा. तेथील बडवे त्यांना अडवणार नाहीत, याची काळजी घ्या. त्यांना मंदिरात प्रवेश मिळालाच पाहिजे. आपल्या समाजात ही सुधारणा झालीच पाहिजे,’ अशी स्पष्ट भूमिका मांडली.
 

महात्मा गांधीजींनी असे सांगितल्यानंतर तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी तेथे गेले. तर्कतीर्थांनी केलेल्या मध्यस्थीमुळे माझ्या आजीला पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात प्रवेश मिळाला. त्यानंतर पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात विधवांना प्रवेश मिळू लागला. ही सुरवात माझ्या आजीमुळेच झाली. म्हणूनच मी विठ्ठल कुणात पाहतो हे सांगायचं झालं तर मला माझ्या आजीमध्ये आणि तिच्या वडिलांमध्ये आणि माझे आजोबा ह. रा. महाजनी यांच्यामध्येही मला विठ्ठल दिसतो. ते तेव्हा ‘लोकसत्ता’चे संपादक होते. त्या वेळी बालविधवांशी कुणी लग्न करीत नव्हते, परंतु त्यांनी ते एक धाडस केले. त्यांनी ते पाऊल उचलले आणि एका सुधारणेची सुरवात झाली. विठ्ठल हा सर्वसामान्यांचा आहे. या सर्वसामान्यांना योग्य दिशा दाखवणारे माझ्यासाठी विठ्ठलरूपच आहेत. माझ्या मनातले विठ्ठल तेच आहेत!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pandharpur Wari 2017 gashmir mahajani