हडपसरमधून दोन्ही पालख्या पुढे मार्गस्थ

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 20 June 2017

हडपसर - पुण्यातील दोन दिवसांच्या मुक्कामानंतर निघालेल्या संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे हडपसरवासीयांनी उत्साहात स्वागत केले. विसावास्थळी रांगोळ्याच्या पायघड्या व फुलांच्या वर्षावाने स्वागत करण्यात आले. दुतर्फा गर्दी करून पालखीचे दर्शन घेत वारकऱ्यांना फराळ, अन्नदान करण्यात आले.

हडपसर - पुण्यातील दोन दिवसांच्या मुक्कामानंतर निघालेल्या संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे हडपसरवासीयांनी उत्साहात स्वागत केले. विसावास्थळी रांगोळ्याच्या पायघड्या व फुलांच्या वर्षावाने स्वागत करण्यात आले. दुतर्फा गर्दी करून पालखीचे दर्शन घेत वारकऱ्यांना फराळ, अन्नदान करण्यात आले. विसावा घेतल्यानंतर माउलींची पालखी सासवड रस्त्याने ; तर तुकाराम महाराजांची पालखी सोलापूर रस्त्याने लोणी काळभोर मुक्कामी मार्गस्थ झाली. 

संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सकाळी नऊच्या सुमारास; तर संत तुकाराम महाराजांची पालखी साडेअकराच्या सुमारास हडपसरमध्ये पोचली. विसावा घेतल्यानंतर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सकाळी दहाच्या सुमारास; तर तुकाराम महाराजांची पालखी दुपारी दीडच्या सुमारास मार्गस्थ झाली. 

गाडीतळ येथे पादुकांची पूजा झाल्यानंतर लाखो भक्तांनी दर्शनबारीमध्ये उभे राहून शांततेत दर्शन घेतले. स्वागतासाठी महापौर मुक्ता टिळक, आमदार योगेश टिळेकर, विरोधी पक्षनेते चेतन तुपे, माजी महापौर वैशाली बनकर, चंचला कोद्रे, नगरसेवक योगेश ससाणे, मारुती तुपे, संजय घुले, उज्वला जंगले, बंडू गायकवाड, हेमलता मगर, नाना भानगिरे उपस्थित होते. 

हडपसरनगरी पहाटे चारपासूनच वैष्णवभक्तांच्या गर्दीने फुलून गेली होती. पहाटे चारपासून वारकरी हडपसरहून मार्गस्थ होऊ लागले. भाविक व सेवाभावी संस्थांनी आणि राजकीय पक्षांनी एकादशीनिमित्त वारकऱ्यांसाठी फराळ, आरोग्यतपासणी, चहाची व्यवस्था केली होती. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून चोख पोलिस बंदोबस्त होता. विसावास्थळी 16 सीसीटीव्ही कॅमेर होते. महापालिकेने वारकऱ्यांच्या सेवेसाठी आवश्‍यक त्या सुविधा उपलब्ध केल्या होत्या. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pandharpur Wari 2017 Hadapsar Dive ghat