यंदा वेळेवर पाऊस पडल्याने पायी वारीला कमी गर्दी

संतोष सिरसट
Thursday, 29 June 2017

गेल्या अनेक वर्षापासून पालखी नातेपुतेमार्गे पंढरपूरला जाते. मागील वर्षी माऊलींच्या पालखीमध्ये जेवढी गर्दी होती. तेवढी गर्दी यंदाच्या वर्षी दिसत नाही. दोन दिंड्यांच्यामध्ये गॅप राहतो. तो यापूर्वी राहात नव्हता.
- बाबाराजे देशमुख, माजी उपाध्यक्ष, जिल्हा परिषद.

पालखी मार्गावरून : राज्यात यंदा पावसाळ्याच्या सुरवातीलाच समाधानकारक पाऊस झाला आहे. त्याचा परिणाम थेट संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पालखी सोहळ्यावर झाला आहे. राज्यातील शेतकरी परेणीच्या कामात गुंतला असल्यामुळे पायी वारी करणाऱ्या भाविकांची गर्दी यंदा कमी असल्याचे दिसून येते.

मागील वर्षी राज्यात पावसाळ्याच्या सुरवातीला चांगला पाऊस झाला नव्हता. त्यामुळे शेतकऱ्यांना पेरण्यांची गडबड नव्हती. त्यामुळे मागील वर्षी दिंडीमध्ये पायी चालत येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी होती. यंदाचे चित्र मागील वर्षापेक्षा एकदम उलटे असल्याचे पायी चालणाऱ्या भाविकांनी सांगितले. विदर्भ, मराठवाडा, खानदेश, कोकण, पश्‍चिम महाराष्ट्र या राज्यातील वेगवेगळ्या विभागातून आषाढी वारीसाठी भाविक पालख्यांसोबत चालत पंढरीला जाण्यासाठी येतात.

संत ज्ञानेश्‍वर महाराजांची पालखी बुधवारी जिल्ह्यात आली आहे. जिल्ह्यातील पहिला मुक्काम नातेपुते येथे झाला. नातेपुते येथे सायंकाळी सहाच्या सुमारास समाज आरती झाली. त्यापूर्वी पालखीचे नातेपुते येथे स्वागत करताना त्या गावातील अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यावेळी त्यांच्यामध्येही पालखीमध्ये असलेल्या गर्दीची चर्चा सुरू होती. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा गर्दी कमीच असल्याचा निष्कर्ष त्यांच्या चर्चेतून निघाल्याचे जाणवले. 
यंदा पाऊस चांगला झाला आहे. त्याने शेतकरी खरीपाच्या पेरण्यांमध्ये गुंतला आहे. विठ्ठलाने यंदा शेतकऱ्यांना सुखी ठेवण्याचा निर्णय घेतला असल्यामुळे पावसाळ्याच्या सुरवातीलाच चांगला पाऊस पाडल्याचेही मत अनेक वारकऱ्यांनी व्यक्त केले. 

मागील 10-12 वर्षापासून आम्ही संत ज्ञानेश्‍वर माहाराजांच्या पालखीसोबत असतो. आम्ही सासवड मधून पालखीसोबत पायी चालत येतो. मागील 10-12 वर्षाचा विचार करता यंदाच्या वर्षी मागील वर्षीच्या तुलनेत गर्दी कमी असल्याचे जाणवते.
- सुरेश वाघमोडे, वारकरी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pandharpur wari 2017 monsoon reduced warkari crowd