वरवंडला पालखीतळावर ‘सीसीटीव्ही’

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 22 June 2017

वरवंड - संत तुकाराम पालखी सोहळा वरवंड (ता. दौंड) येथे गुरुवारी (ता. २२) मुक्कामी येणार आहे. ग्रामपंचायतीने पालखी स्वागताचे उत्तम नियोजन केले असून, पालखी विसाव्याच्या ठिकाणी विठ्ठल- रुक्‍मिणी मंदिरात व पालखीतळावर सहा ठिकाणी ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे बसविले आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने व पालखी नियोजनावर लक्ष ठेवण्यासाठी हे कॅमेरे महत्त्वाची भूमिका बजावण्यावर असल्याचे सरपंच संतोष कचरे यांनी सांगितले.

वरवंड येथील पालखीतळाची स्वच्छता केली असून, प्रांगणात पेव्हींग ब्लॉक बसविण्यात आले आहेत. उत्तर बाजूला छोटी खडी टाकण्यात आली आहे. आरोग्य व महावितरण विभागाने नियोजित काम पूर्ण केले आहे. ग्रामपंचायतीने विठ्ठल मंदिर व पालखीतळावर सहा सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा उपक्रम राबविला आहे. मंदिरात भिंतीवर मोठी स्क्रीन लावण्यात आली आहे. कॅमेरामुळे पालखी सोहळा नियोजनावर लक्ष ठेवणे सोपे जाणार आहे. दर्शन घेतेवेळी भाविकांना उपद्रव करणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठीही पोलिसांना ‘सीसीटीव्ही’ची मोठी मदत होणार आहे. मंदिरात पालखीच्या दर्शनासाठी पुरुष व महिलांसाठी स्वतंत्र रांगांचे नियोजन केले आहे.  

याबाबत यवतचे पोलिस निरीक्षक धन्यकुमार गोडसे म्हणाले, ‘‘ग्रामपंचायतीचा पालखीतळावर सीसीटीव्ही बसवून आदर्शवत उपक्रम राबविला आहे.’’

वरवंड ग्रामपंचायतीच्या वतीने पालखी सोहळ्याच्या निमित्ताने यंदा प्लॅस्टिक मुक्तीचा नारा दिला आहे. परिसरातील व्यावसायिकांना नोटिसा देऊन प्लॅस्टिक वापर बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pandharpur Wari 2017 Tukaram Maharaj Palkhi 2017 cctv