विठ्ठल-रखुमाईचे दर्शन "लाइव्ह' 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 5 June 2017

पुणे - पंढरपूर आषाढी वारीसाठी दरवर्षी सुमारे दहा लाख वारकरी येतात. यंदा या सोहळ्यादरम्यान व्यवस्थापन, सुविधा आणि सूचनांसाठी जिल्हा प्रशासनाकडून "पालखी सोहळा 2017' हे मोबाईल ऍप विकसित केले आहे. यावर विठ्ठल-रखुमाईचे दर्शन चोवीस तास "लाइव्ह' करता येणार आहे. या ऍपचे उद्‌घाटन पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते झाले. 

पुणे - पंढरपूर आषाढी वारीसाठी दरवर्षी सुमारे दहा लाख वारकरी येतात. यंदा या सोहळ्यादरम्यान व्यवस्थापन, सुविधा आणि सूचनांसाठी जिल्हा प्रशासनाकडून "पालखी सोहळा 2017' हे मोबाईल ऍप विकसित केले आहे. यावर विठ्ठल-रखुमाईचे दर्शन चोवीस तास "लाइव्ह' करता येणार आहे. या ऍपचे उद्‌घाटन पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते झाले. 

आगामी पालखी सोहळ्याच्या नियोजनाची आढावा बैठक शनिवारी विधान भवनातील सभागृहात पार पडली. सोलापूरचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख, राज्यसभा खासदार अमर साबळे, आमदार बाळा भेगडे, पिंपरी चिंचवडचे महापौर नितीन काळजे, विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, पुण्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव, सोलापूर जिल्हाधिकारी आर. बी. भोसले, पुणे महापालिका आयुक्त कुणाल कुमार, पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई, साताऱ्याचे जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, विशेष शाखेच्या पोलिस उपआयुक्त ज्योती सिंग, श्री संत तुकाराम महाराज संस्थान देहूचे अध्यक्ष बाळासाहेब मोरे-इनामदार, श्री ज्ञानेश्‍वर महाराज संस्थान आळंदी कमिटीचे विश्‍वस्त अजित कुलकर्णी आदी उपस्थित होते. 

येत्या 16 जून ते 9 जुलैदरम्यान पार पडणाऱ्या या सोहळ्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने हे ऍप विकसित केले आहे. त्याद्वारे कोणताही व्यक्ती तक्रार, सूचना करू शकते अथवा मदत मागू शकते. पाण्याचे टॅंकर, आरोग्य सेवा, धान्य, रॉकेल व सिलिंडर पुरवठा, इत्यादी सुविधा वारकऱ्यांना उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत; तसेच विठ्ठल-रखुमाईच्या मूर्तीचे "लाइव्ह' दर्शनाची सुविधाही या ऍपद्वारे उपलब्ध होणार आहे. हरविलेल्या व्यक्तींचा शोधदेखील यावर घेता येईल. देहू, आळंदी व पंढरपूर देवस्थानचे विश्‍वस्त, पालखी सोहळा प्रमुख, दिंडी प्रमुख, जिल्हाधिकारी, तहसीलदार, आरोग्य केंद्रे, नियंत्रण कक्ष इत्यादींचे संपर्क क्रमांक या ऍपवर देण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी राव यांनी या वेळी दिली. येत्या 12 जूनपासून "प्ले स्टोअर'वरून हे "मोबाईल ऍप डाउनलोड' करता येणार आहे. 

सकाळ सोशल फाउंडेशनतर्फे "हरित वारी' 
पंढरपूर आषाढी वारीदरम्यान प्रशासन; तसेच "कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्स्बीलीटी' (सीएसआर)अंतर्गत सर्व पालखी तळ परिसरात हजारो फिरते शौचालये (मोबाईल टॉयलेट) उभारण्यात येणार आहेत. हरित वारी उपक्रमाअंतर्गत "सकाळ सोशल फाउंडेशन'च्या वतीने पालखीमार्गावर वृक्षलागवड, बीजारोपण केले जाणार आहे. निर्मल वारी उपक्रमाअंतर्गत "सेवा सहयोग'संस्थेच्या वतीने फिरते शौचालये उभारण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pune news mobile app