esakal | दोन्ही पालख्यांसोबत "मोबाईल टॉवर' 
sakal

बोलून बातमी शोधा

दोन्ही पालख्यांसोबत "मोबाईल टॉवर' 

दोन्ही पालख्यांसोबत "मोबाईल टॉवर' 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - मोबाईल सेवा पुरविणाऱ्या सर्व कंपन्यांचे "मोबाईल टॉवर' दोन्ही पालख्यांसोबत दिले जाणार आहेत. तसेच आषाढी वारीसाठी पालखीतळ, रिंगण मैदाने आणि पालखी मार्गांवरील विकासकामे अंतिम टप्प्यात आली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून शनिवारी देण्यात आली. 

पंढरपूर आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या पूर्वतयारीची आढावा बैठक पुणे आणि सोलापूर पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज विधानभवन येथे पार पडली. या वेळी पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, सोलापूरचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी पालखी तयारीचा आढावा घेतला. या वेळी विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी पालखीतळ, रिंगण मैदाने आणि मार्गांवरील कामांची माहिती दिली. 

जिल्हाधिकारी सौरभ राव म्हणाले, ""संत ज्ञानेश्‍वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्यांसमवेत "मोबाईल टॉवर' असलेले स्वतंत्र ट्रक पंढरपूरपर्यंत जाणार आहेत. पिण्याच्या पाण्याचे ट्रक, फिरती शौचालये, रुग्णवाहिका, फिरते आरोग्य केंद्रदेखील तैनात केले जाणार आहे. पालखी मार्गांवर वाटल्या जाणाऱ्या पाण्याचे निर्जंतुकीकरण, अन्न नमुन्यांची तपासणी केली जाणार आहे. कचऱ्याची विल्हेवाटदेखील शास्त्रोक्त पद्धतीने केली जाणार आहे. पालखीदरम्यान फटाकेबंदी असणार आहे. तसेच पालखी मार्गावरील मांसाहारी हॉटेल, कत्तलखाने, मासळी बाजार आणि मद्यविक्रीची दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत.'' 

तसेच साताऱ्याच्या जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल आणि सोलापूरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी पालखी मार्गांची दुरुस्ती, पायाभूत सुविधांच्या झालेल्या  कामांची माहिती दिली. 

पुणे महापालिका आयुक्त कुणाल कुमार आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनीदेखील महापालिका हद्दीतून पालखी सोहळ्यासाठीच्या पूर्वतयारीचा आढावा सादर केला. 

अतिक्रमणे काढून टाकण्याच्या सूचना 
पंढरपूर आषाढी वारीमध्ये सुमारे दहा लाख वारकरी सहभागी होणार आहेत. त्यामुळे गर्दीमुळे वाहतूक कोंडी, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पालखी प्रस्थानापूर्वी देहू आणि आळंदी पालखी मार्गांवरील अतिक्रमणे काढून टाकण्याच्या सूचना पालकमंत्री गिरीश बापट यांनी या वेळी पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या.

loading image
go to top