निमगाव केतकीत 108 सेवेसाठी पूर्वीच्या गाडीची मागणी 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 6 June 2017

निमगाव केतकी - येथील ग्रामीण रुग्णालयात "108' सेवेसाठी बजाज कंपनीची असलेली फोर्स गाडी आठ दिवसांपूर्वी संबंधित एजन्सीने बदलून त्या ठिकाणी दुसरी लहान गाडी दिली आहे. लहान गाडी ग्रामीण भागातील कच्च्या रस्त्याला चालत नसल्याने अनेक तातडीचे रुग्ण या सेवेपासून वंचित राहणार आहेत. 

निमगाव केतकी - येथील ग्रामीण रुग्णालयात "108' सेवेसाठी बजाज कंपनीची असलेली फोर्स गाडी आठ दिवसांपूर्वी संबंधित एजन्सीने बदलून त्या ठिकाणी दुसरी लहान गाडी दिली आहे. लहान गाडी ग्रामीण भागातील कच्च्या रस्त्याला चालत नसल्याने अनेक तातडीचे रुग्ण या सेवेपासून वंचित राहणार आहेत. 

शिवाय पालखी मार्गातील निमगाव केतकी हे महत्त्वाचे ठिकाण असल्याने व पालखी सोहळा तोंडावर आल्याने पूर्वीची मोठी गाडी येथे तातडीने आणण्याची गरज आहे. निमगाव केतकी हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने येथे 108 ची सेवा मोठ्या प्रमाणात चालते. अपघाती रुग्ण, डिलेव्हरीकरिता तातडीने महिलांना रुग्णालयात आणणे असे येथे महिन्याला दीडशे ते दोनशे कॉल होतात. परिसरातील चाळीसपेक्षा जास्त खेडे गावांना या सेवेचा चांगला फायदा होत आहे. पूर्वीची गाडी मोठी उंच असल्याने कच्च्या रस्त्यांनी कुठेही जात होती, मात्र सध्या देण्यात आलेली गाडी लहान असल्याने ती कच्च्या रस्त्याला व्यवस्थित चालत नाही. 

गाडीच्या आतील भागही कमी उंचीचा असल्याने व सलाईन लावण्यासाठी सोय नसल्याने रुग्णांबरोबर असलेल्या नातेवाइकाला हातात सलाईन घेऊन उभे राहावे लागते; परंतु उंची कमी असल्याने वाकून उभे राहावे लागते. 

ऍड. सचिन राऊत म्हणाले, ""पूर्वीची गाडी येथे मिळावी, म्हणून आमदार दत्तात्रेय भरणे व संबंधित खात्याच्या वरिष्ठांना याबाबत कळविले आहे. पूर्वीची गाडी न मिळाल्यास तातडीच्या रुग्णांची मोठी गैरसोय होणार आहे.'' 

रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. सदानंद काळे म्हणाले, ""108 च्या गाडीचा विषय आमच्या अखत्यारीत येत नाही. त्याचे कॉन्ट्रॅक्‍ट हे बीव्हीजी या कंपनीकडे आहे. येथील लोकांची मागणी रास्त असल्याने आपण संबंधिताना पत्र पाठवून पूर्वीची गाडी मिळण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.'' 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pune news Nimgaon ketki Rural Hospital