ज्ञानेश्‍वर पालखी मार्ग होणार हिरवागार 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 5 June 2017

भोसरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेने दिघी ते आळंदीपर्यंतच्या पालिका हद्दीत सातशे झाडांचे पुनर्रोपण केले आहे. या झाडांना पालवी फुटून झाडे वाढू लागली आहेत. पावसाळ्यात आणखी एक हजार झाडे लावण्याचे उद्दिष्ट असल्याने पालखी मार्ग हिरवागार होणार आहे. त्याचप्रमाणे झाडांच्या शीतल छायेने पंढरीला जाणारा वारकरी सुखावणार आहे. 

भोसरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेने दिघी ते आळंदीपर्यंतच्या पालिका हद्दीत सातशे झाडांचे पुनर्रोपण केले आहे. या झाडांना पालवी फुटून झाडे वाढू लागली आहेत. पावसाळ्यात आणखी एक हजार झाडे लावण्याचे उद्दिष्ट असल्याने पालखी मार्ग हिरवागार होणार आहे. त्याचप्रमाणे झाडांच्या शीतल छायेने पंढरीला जाणारा वारकरी सुखावणार आहे. 

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने दिघी ते पालिकेच्या आळंदीजवळ हद्दीपर्यंतच्या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम हाती घेतले आहे. सध्या आठपदरी रस्त्याचे काम सुरू आहे. रुंदीकरणामध्ये येणाऱ्या झाडांच्या पालिकेच्या उद्यान विभागाच्या मार्गदर्शनाखाली ठेकेदारामार्फत या विस्तारीत रस्त्याच्या कडेलाच पुनर्रोपण करण्यात आले आहे. या कामास फेब्रुवारी 2015 पासून सुरवात करण्यात आली. काम अजतागायत सुरूच आहे. पहिल्या टप्प्यात पुणे-आळंदी रस्त्यावर चोविसावाडी ते काळे कॉलनी आणि ताजणे मळा ते दत्तनगरपर्यंत साडेचारशे झाडांचे पुनर्रोपण करण्यात आले; तर दुसऱ्या टप्प्यातील पुर्रोपणांच्या कामास ऑक्‍टोबर 2016 पासून सुरवात करण्यात आली. या टप्प्यात चोविसावाडी ते दत्तनगर आणि दत्तनगर ते दिघीपर्यंतच्या रस्त्यावर अडीचशे झाडांचे पुनर्रोपण करण्यात आले. आता या झाडांना पालवी फुटल्याने ती चांगल्या प्रकारे जगू लागली असल्याचे स्पष्ट होते. 

तिसऱ्या टप्प्यात या रस्ता रुंदीकरणास अडथळा ठरणाऱ्या सुमारे पन्नास झाडांचेही पुनर्रोपण पावसाळ्यात होणार असल्याची माहिती पालिकेच्या वनविभागाने दिली. त्याचप्रमाणे नवीन आठपदरी रस्त्याच्या पदपथावर; तसेच सेवा रस्त्याकडेला एक हजार झाडे लावण्यात येणार आहेत. त्यामुळे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी मार्ग हिरवागार होणार आहे. सावली देणाऱ्या झाडांबरोबरच रंगीबेरंगी फुलझाडांचे वृक्षारोपण करण्याची मागणी काही नागरिकांनी बोलून दाखविली. 

दिघी ते काळे कॉलनीपर्यंत रस्तारुंदीकरणास अडथळा ठरणाऱ्या जवळपास सर्वच झाडांचे पुनर्रोपण विस्तारित रस्त्याकडेला केले आहे. महापालिकेच्या उद्यान विभागाच्या देखरेखीखाली ठेकेदाराकडून या झाडांचे पुनर्रोपण करण्यात आले आहे. देखभालीची जबाबदारीही त्याच्यावर सोपविली आहे. पुनर्रोपित झाडांना जनावरांनी अंग घासणे, झाडांचे पुनर्रोपन व्यवस्थित न होणे आदींसारख्या कारणांमुळे सुमारे पंधरा टक्के पुनर्रोपीत झाडे दगावतात. विस्तारित रस्त्याकडेला सुमारे आठ-नऊ फूट उंचीच्या नव्या एक हजार झाडांचे वृक्षारोपण करण्यात येणार आहे. 
-शरद बगाडे, सहायक उद्यान अधीक्षक, पिंपरी-चिंचवड महापालिका, ई-क्षेत्रीय कार्यालय. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pune news palkhi pcmc