पालखी महामार्गाचे काम प्रगतिपथावर - खासदार मोहिते-पाटील

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 6 June 2017

अकलूज - पालखी मार्गांचे काम प्रगतिपथावर आहे. संत ज्ञानेश्‍वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचा सर्व्हे पूर्ण झाला आहे. येत्या सहा महिन्यांत त्यासाठी भूसंपादनाचे काम मार्गी लागेल, अशी माहिती खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांनी दिली.  शंकरनगर-अकलूज येथे दोन्ही पालखी महामार्गांशी संबंधित प्रमुख अधिकाऱ्यांसोबत पार पडलेल्या बैठकीत त्यांनी या कामाबाबत माहिती घेऊन मार्गदर्शक सूचनाही केल्या. खासदार मोहिते-पाटील यांच्या उपस्थितीत  येथील सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील कारखान्याच्या कार्यस्थळावर याबाबतची बैठक पार पडली. पालखी महामार्गाचे प्रोजेक्‍ट डायरेक्‍टर एस. एस.

अकलूज - पालखी मार्गांचे काम प्रगतिपथावर आहे. संत ज्ञानेश्‍वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचा सर्व्हे पूर्ण झाला आहे. येत्या सहा महिन्यांत त्यासाठी भूसंपादनाचे काम मार्गी लागेल, अशी माहिती खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांनी दिली.  शंकरनगर-अकलूज येथे दोन्ही पालखी महामार्गांशी संबंधित प्रमुख अधिकाऱ्यांसोबत पार पडलेल्या बैठकीत त्यांनी या कामाबाबत माहिती घेऊन मार्गदर्शक सूचनाही केल्या. खासदार मोहिते-पाटील यांच्या उपस्थितीत  येथील सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील कारखान्याच्या कार्यस्थळावर याबाबतची बैठक पार पडली. पालखी महामार्गाचे प्रोजेक्‍ट डायरेक्‍टर एस. एस. कदम, नॅशनल हायवेचे कार्यकारी अभियंता वसंत पंधरकर यांच्यासह आमदार हनुमंत डोळस, जिल्हा परिषद सदस्या शीतलदेवी मोहिते-पाटील, स्वरूपाराणी मोहिते-पाटील, मदनसिंह मोहिते-पाटील, सरपंच शिवतेजसिंह मोहिते-पाटील, रामचंद्र सावंत-पाटील, नानासाहेब मुंडफणे, संभाजी जाधव, भीमराव रेडे-पाटील, ऍड. प्रकाशराव पाटील, प्रतापराव पाटील, भीमराव काळे आदी उपस्थित होते. 

पालखी मार्गाचे प्रोजेक्‍ट डायरेक्‍टर कदम यांनी या वेळी पालखी मार्गाबाबत माहिती दिली. श्री संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी मार्गाला एनएच 965 व संत तुकाराम महाराज पालखी मार्गाला एनएचजी 965 असे क्रमांक देण्यात आले आहेत. सध्या पालखी महामार्गाचे डिझाईनिंगचे काम सुरू आहे. सर्व्हेचे काम पूर्ण झाले आहे. येत्या सहा महिन्यांत भूसंपादनाचे कामसुद्धा मार्गी लागणार आहे, असे सांगून ते म्हणाले, राष्ट्रीय महामार्ग हे 60 मीटर रुंदीचे असतात. परंतु या परिसरातील शेतकऱ्यांच्या बागायती जमिनींचे नुकसान होऊ नये अशी मागणी खासदार मोहिते-पाटील यांनी केली होती. त्यामुळे या परिसरात 45 मीटर रुंदीचा रस्ता करण्यात येणार आहे. माळशिरस तालुक्‍यात नातेपुते, माळशिरस, अकलूज, लवंग व श्रीपूर ते माळखांबी असा बायपास रस्ता केला जाणार आहे. माळीनगर येथे उड्डाणपूल नियोजित आहे. ज्या गावांतून पालखी जाते, त्या गावांतील रस्तासुद्धा दुरुस्त करून त्या त्या विभागास हस्तांतरित करण्यात येणार आहे. 

सातारा-म्हसवड-अकलूज-टेंभुर्णी-बार्शी-लातूर या महामार्गाचीही  बैठक झाली. या कामाची एकूण चार टेंडर (प्रत्येकी 500 कोटी रुपयांचे) काढली आहेत. त्याचेही काम लवकरच सुरू होणार आहे. संत ज्ञानेश्‍वर व संत तुकाराम महाराज पालखी मार्गाच्या सद्यःस्थितीची माहिती देण्यासाठी लवकरच दिल्ली येथे मंत्री नितीन गडकरी आणि खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांच्यासमवेत बैठक आयोजित केली जाणार आहे. 
- एस. एस. कदम, प्रोजेक्‍ट डायरेक्‍टर, पालखीमार्ग 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: solapur news palkhi Akluj Vijaysingh Mohite-Patil