Wari 2019 : जीवन अंतर्बाह्य बदलविणारी वारी... 

wari
wari

महाराष्ट्रात मध्ययुगामध्ये अनेक भक्तिसंप्रदाय उदयास आले आणि कमी-अधिक काळ आपला प्रभाव गाजवून क्षीण झाले किंवा नामशेष झाले. मात्र महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय याला अपवाद ठरलेला आहे. तो संप्रदाय आणि त्याचा प्रभाव सतत वाढतच राहिलेला आहे. अगदी एकविसाव्या विज्ञाननिष्ठ शतकामध्येही हा संप्रदाय टिकून आहे. तो समाजशास्त्र आणि साहित्यसंशोधक यांच्या कुतूहलाचा विषय होऊन राहिलेला आहे. 
वारकरी संप्रदाय म्हणजे महाराष्ट्र संतांचा भागवतधर्म. 

ज्ञानेश्‍वरांच्या तत्त्वज्ञानाने वारकरी संप्रदायाची पायाभरणी केली. त्यांच्या विचारसरणीचा आदर्श पुढे ठेवून महाराष्ट्रातील भागवतधर्मीयांनी आपल्या पारमार्थिक जीवनाची वाटचाल केली. संत नामदेवांपासून संत तुकारामांपर्यंत संतमंडळींनी या परंपरेशी एकरूप होऊन त्या त्या कालखंडातील पारमार्थिक जीवनाचे प्रतिनिधित्व केले. त्यांचे जीवन ज्ञानदेवांच्या उपदेशाने आणि तात्त्विक दृष्टीने भारले गेले होते. या संतमंडळींच्याच व्यक्तिमत्त्वांची छाप तत्कालीन समाजावर पडून महाराष्ट्रातील सामान्यांच्या जीवनात एक प्रकारचे चैतन्य निर्माण झाले; त्यांची अस्मिता जागृत झाली. 

गीता, उपनिषदे, ब्रह्मसूत्रे यावरील आचार्यांच्या टीका-प्रतिटीका, वाद- प्रतिवाद या सर्वच गोष्टींपासून सर्वसामान्य माणूस दूर होता. त्यांची संभ्रमावस्था व नवीन पंथाकडे आकृष्ट होण्याची स्थिती या पार्श्‍वभूमीवर ज्ञानदेवांनी सर्व विचारांचा समन्वय साधणाऱ्या गीतामाऊलीचा भावार्थ आपल्या परतत्त्वस्पर्शी वाणीतून सांगितला. 

संतांचे कार्य धार्मिक व सांस्कृतिक क्षेत्रात व्यापकतेने घडले. ऐहिक जीवनाच्या विकासावर शाश्‍वत सुख अवलंबून नसते. त्यासाठी पारमार्थिक जीवनविकासाची गरज असून, चिरंतन समाधान त्यातच सामावले आहे. हा विचार ज्ञानेश्‍वरांनी लक्षात घेऊन पारमार्थिक प्रगतीसाठी मार्ग सांगितला. जीवनात भक्ती आणि कर्म यांचे शुद्ध बीजारोपण केले. बाह्यजीवन कितीही दरिद्री किंवा समृद्ध असले तरी मनःशांती ढळू न देता जीवनाची वाटचाल करण्याचा दिव्य मार्ग ज्ञानेश्‍वरांना गवसला, तो त्यांनी सर्व सामान्यांपर्यंत ज्ञानरूपाने पोचवला. 

वारकरी संप्रदायातील संतांनी आपल्या परतत्त्वस्पर्शी प्रतिभेने मराठी साहित्याची थोर परंपरा निर्माण करून महाराष्ट्र लोकजीवनाला सांस्कृतिक अधिष्ठान प्राप्त करून दिले. दुःखितांना, पतितांना या संतसाहित्याची परंपरा संजीवक ठरली आहे. वारकरी संप्रदायाने श्रेष्ठ तत्त्वाच्या आधारे समाजाला स्फूर्ती देण्याचे कार्य केले आहे. 

इतर तीर्थक्षेत्रांना यात्रा म्हणून जाऊन येण्याचा जो रिवाज असतो, त्याचा भक्ताच्या दैनंदिन जीवनाशी अतूट असा संबंध असतोच असे नाही. परंतु पंढरपूरवारी करणाऱ्या माणसाचे दैनंदिन जीवन वारीव्रत घेतल्याने आरपार बदलून जावे अशी अपेक्षा असते. आणि ते तसे बदलते देखील. वारकऱ्यांचा आचार-विचार, आहार, निद्रा, लौकिक सुखे आणि परमेश्‍वरभक्ती यासंबंधाने काही नियम असतात, ते त्याने पाळावे अशी अपेक्षा असते. मुख्य म्हणजे आपण वारकरी असून, वारकऱ्यांचे व्रतस्थ जीवन जगत आहोत याची निदर्शना करणारी तुळशीमाळ, त्रिपुंड किंवा खांद्यावरची भगवी पताका यासारख्या काही खाणाखुणा त्याने निश्‍चयाने बाळगाव्यात अशीही अपेक्षा असते. वारकरी या उपदेशाचे जास्तीत जास्त पालन करण्यात धन्यता मानतो. 

बऱ्याच पंथांमध्ये, संप्रदायांत निर्बंधांना कर्मकांडाचे स्वरूप आलेले असते, तर वारकरी पंथामध्ये कर्मकांडांचा मुळात निषेध केलेला आहे. 
वारकऱ्याचे कुलदैवत कुठलेही असो, वारकरी होताच तो पंढरपूरच्या विठ्ठलाचा भक्त होऊन जातो. यातही वैशिष्ट्य असे, की पंढरपूरच्या विठ्ठलाची भक्ती स्वीकारल्यावर अन्य दैवतांच्या भक्तीचा त्याने त्याग करावयास पाहिजे, असे बंधन त्याच्यावर नसते. त्यातूनच तो परमेश्‍वराकडे एकत्वबुद्धीने पाहण्यास शिकतो. 

प्रपंचात राहून परमार्थ आचरण करण्याचा मार्ग वारकरी संप्रदायाने दाखवून दिला. तत्त्वज्ञान, आचार-विचार सुलभता, वाङ्‌मयाचे सुलभ आकलन यामुळे शतकानुशतके हा संप्रदाय टिकून आहे.प्रपंच करून परमार्थ करता येतो ही शिकवण वारकरी संप्रदाय आजही देत आहे. मनामनांची मशागत करण्याचे काम वारकरी संप्रदायाने शेकडो वर्षांपूर्वी केले. ते अखंडपणे चालू राहिले. आजही मनांची बांधणी करणे आवश्‍यक वाटते. स्त्री-शूद्रांना सामावून घेणाऱ्या या संप्रदायाने जातिभेदविरहित समाज ही कल्पना रुजविली. 

वाङ्‌मयनिर्मितीतून समाजप्रबोधनाचे कार्य विशेषत्वाने होते. वारकरी संप्रदायातील संतांच्या अभंग, ओव्या व इतर रचनांतून धर्म जागविणारा विचार असून, समाजधारणेचे मोलाचे कार्य आढळते. आजही संतश्रेष्ठांचे हे वाङ्‌मय समाजाला प्रगतीची व समृद्धीची वाट दाखविणारे असल्याने त्याचे नित्यपठण, पारायण व स्मरण होताना दिसते. आषाढी, कार्तिकी वारी हा वारकऱ्यांचा आचारधर्म होय. वारकरी संप्रदायाचे आचरण करणारा हा अखंड वारकरी असतो. स्वतः आयुष्यभर "वारी' नियमितपणे करणारे आपल्या कुटुंबातील इतरांनाही वारकरी होण्यास प्रवृत्त करतात. ही परंपरा घराघरांतून वाढत जाते. वारी पायी करण्यावर वारकऱ्यांचा भर असतो. लाखो वारकरी देहू-आळंदीहून दिंड्या गटाने निघून पंढरपुरी पोचतात. तीन आठवड्यांच्या या वाटचालीत ऊन-वारा-पाऊस यांची पर्वा न करता पांडुरंगाच्या दर्शनाने कृतकृत्य होतात ते पंढरपुरी पोचल्यावर! 

वारी ही आत्मिक लाभासाठी करावयाची. पंढरीची वारी साधनेचे सार आहे. वारीमध्ये सहभागी होणाऱ्यास "अभिमान नुरे।' याची प्रचिती येते. लोभी, क्रोधी, उद्धट, हट्टी विक्षिप्त माणसे राग सोडून सरळ वागावयास लागतात. नीतिमूल्यांची जोपासना वारीच्या माध्यमातून होते. तो जीवनानंद देणारा तसेच व्यक्तिगत जीवन अंतर्बाह्य बदलविणारा अनुभव आहे. 

(लेखक संत साहित्याचे अभ्यासक आहेत.) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com