पादुकांच्या नीरास्नानाची उत्सुकता 

(शब्दांकन - सचिन शिंदे)
Thursday, 29 June 2017

सोहळ्यात आज 
सकाळी सराटीत तुकोबांच्या पादुकांना नीरा नदीत स्नान घातले जाणार
सोहळा सकाळी अकरापर्यंत अकलूजमध्ये दाखल होणार 
सोहळ्यातील तिसरे गोल रिंगण माने विद्यालयाच्या प्रांगणात रंगणार
अकलूजमध्ये पालखीचा मुक्काम माने विद्यालयाच्या प्रांगणात राहील

बाबूराव काटरे,  रेवणगाव, ता. जि. जालना
ढगाळ वातावरण व काहीसे कोवळे ऊन अंगावर घेत आज पालखी सोहळ्याचा प्रवास सकाळी इंदापुरातून सुरू झाला. ढगाळ वातावरणामुळे पाऊस पडेल, अशी अपेक्षा होती. मात्र, मुक्काम तळ येईपर्यंत पावसाने केवळ हुलकावणीच दिली. उद्या (गुरुवारी) पालखी सोहळा सोलापूर जिल्ह्यात जात आहे. यंदा नीरा नदीत पाणी आहे. त्यामुळे तुकोबांच्या पादुका स्नानाच्या प्रसंगाबाबत मनात उत्सुकता दाटून आली आहे. त्याच ओढीने आजच्या वीस किलोमीटरच्या प्रवासास सुरवात केली आहे. तीस वर्षांपासून वारी करतोय. आता सत्तरीकडे वय गेले आहे. मात्र, वारी येण्याचा आनंद कधीच संपत नाही. 

तुकोबारायांचा पालखी सोहळा इंदापुरातून आज सकाळी मार्गस्थ झाला. सकाळी पहाटेच लवकरच उठून आवरले. हरिपाठासह देवपूजा केली. दिंडीतील लोकांना उठवले. त्यांनाही आवरण्यास सांगितले. चोपदारांनी तीन वेळा शिंग वाजवले अन्‌ सोहळा सराटीकडे मार्गस्थ झाला. वाटेत अनेकांनी वेगवेगळ्या पद्धतीने वारकऱ्यांची सेवा केली. त्याचाही आनंद वाटला. जालना भागातील खानापुरी दिंडीतून मी चालतो आहे. आज काहीसे कोवळे ऊन व जास्त प्रमाणात ढगाळ वातावरण होते. पाऊस पडेल अशा आशेनेच चालण्यास सुरवात केली. सोहळा मुख्य रस्त्याने पुढे सरकत होता. वारकरी भजन म्हणत होते. मनात प्रसन्नता निर्माण होत होती. मध्येच पखवाजवादक व टाळकरी यांची जुगलबंदी चालायची. पहिल्या विसाव्याला शेताच्या कडेला बसलेल्या आमच्या दिंडीने भजन गायले. त्या वेळी जाणारी येणारी लोकही बघून त्याच कौतुक करीत होते. सोहळा पुन्हा मार्गस्थ झाला. दिंड्या मागे-पुढे होत्या. वडापुरीत त्यांचा क्रम लावला. येथे दुसरा विसावा झाला. काही दिंड्यांनी जेवण आटोपले होते. आमचे जेवण बावड्यातील विश्रांतीला होते. भाजी-भाकरीसह भात असा बेत होता. आभाळ भरून आले होते. कधी पाऊस येईल, याचा नेम नव्हता. त्याच ओढीने आम्ही चालत होतो. मात्र, पावसाने हुलकावणी दिली. नीरा नदी दुथडी भरून वाहत आहे. उद्या तुकोबारायांच्या पादुकांना नीरा स्नान होणार आहे. उद्या सकाळी सोहळा सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. त्यापूर्वी पादुकांना नीरा स्नान घातले जाईल. त्याप्रसंगी उपस्थित राहण्याची ओढ आहे. आजची वाटचाल मी त्याच ओढीने पूर्ण केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tukaram Maharaj Palkhi 2017