अश्वाच्या पायाखालची मातीही पांडुरंगाचा आशीर्वाद 

(शब्दाकंन - सचिन शिंदे)
Saturday, 1 July 2017

सोहळ्यात आज 
पालखी सोहळा सकाळी बोरगावहून होणार मार्गस्थ  
मळखांबी येथे सोहळ्याचा दुपारचा विसावा होणार
तोंडले बोंडलेच्या अलीकडे होणार पांडुरंगाचा धावा.
सायंकाळी सोहळा पिराची कुरोलीस विसावणार

कुंडलिक गुरगौड, बेल्लूर, (जि. धारवाड, कर्नाटक) 
तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यातील पहिले उभ रिंगण डोळ्यांत साठवण्यासाठी आम्ही रस्त्याच्या कडेला कड केले होते. त्यातून वाऱ्याच्या वेगाने धावलेल्या अश्वाच्या दर्शनाने मी धन्य झालो. माउलीचे अश्व धावताना वारकऱ्यांनी ‘पुंडलिक वरदा’ऽऽ चा केलेला गजर कानात साठून राहिला आहे. तेच बळ घेऊन पुढची वाटचाल करत राहिलो. उभ्या रिंगणात धावलेल्या अश्वाच्या पायाखालची माती मी मस्तकी लावली त्यामुळे जणू पांडुरंगाचा आशीर्वाद मिळाल्याचीच माझी भावना झाली. अर्धा तास झालेल्या रिंगणाने पंढरीच्या वाटेकडील ओढ अधिक तीव्रतेने वाढली होती. मजल दरमजल करत किमान पंधरा किलोमीटरचा टप्पा ओलांडून आम्ही बोरगावात पोचलो. 

अकलूज येथील मुक्काम आटोपून सकाळी पालखी सोहळा बोरगावकडे मार्गस्थ झाला. सकाळच्या न्याहरीपूर्वीच रिंगण सोहळा होणार होता. मी रथामागच्या १८६ क्रमांकाच्या दिंडीतून चालतो. बेल्लारीचे दोनशे लोक दिंडीत आहेत. मला जास्त मराठी येत नाही; मात्र अभंग पाठ आहेत. माझ्या गुरूंनी मराठीतले अभंग कन्नड भाषेत लिहिले आहेत. त्यामुळे त्या अभंगाची आम्हाला ओळख आहे. अकलाईमंदिर मार्गे पुढे सरकलेला सोहळा माळीनगरमध्ये आला. तेथे उभे रिंगण होणार होते. त्याची उत्सुकता होती. माळीनगरच्या हद्दीत पालखी एका लिंबाखाली थांबवण्यात आली. तेथून रथापुढच्या व रथामागील दिंड्या रस्त्यात उभा राहिल्या. दोन्ही बाजूने वारकरी व मध्ये अश्व धावण्यासाठी जागा ठेवण्यात आली. 

रथामागील व पुढील दिंड्या असा पद्धतीने उभ्या राहिल्या होत्या, की रथ मधोमध आला होता. चोपदारांसह पालखी सोहळाप्रमुख पूर्ण रिंगण फिरून पाहत होते. रिंगणात येणाऱ्या वारकऱ्यांना बाजूला करत होते. रिंगण लावून झाल्यानंतर काही मुलांनी रिंगणात रांगोळी रेखाटली. लाल, हिरव्या, पांढऱ्या रंगाची उधळण करत पूर्ण दोन किलोमीटरची रांगोळी रेखाटताना त्यांचा वेग मोठा होता. त्याचे वारकऱ्यांनीही कौतुक केले. त्यांनी रांगोळी काढून झाल्यावर माउलींचे अश्व सोडण्यात आले. ‘पुंडलिक वरदा’ऽऽ चा गजर झाला. इशारा करताच अश्व सोडण्यात आले. अश्वही वाऱ्याच्या वेगाने सुमारे दोन किलोमीटरचे उभे रिंगण पूर्ण करून आल्यानंतर पुन्हा मानाचे अश्व सोडण्यात आले. त्यावरील चोपदार होते. तेही अश्व धावले. त्यानंतर रिंगण पूर्ण करून आल्यानंतर मध्ये थांबवलेल्या पालखीतील पादुकांना अश्वाने अभिवादन केले अन्‌ पुन्हा राहिलेले रिंगण ते अश्व धावले. अश्व गेल्यानंतर माझ्यासहित वारकऱ्यांनी अश्व धावलेल्या जागेची माती मस्तकी लावली. तेथे दुपारचा विसावा झाल्यानंतर पालखी पुन्हा पंढरीच्या वाटेने मार्गस्थ झाली.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tukaram Maharaj Palkhi 2017