विठुरायाच्या उंबऱ्यावर पालख्या

सकाळ वृत्तसेवा
Monday, 3 July 2017

संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरून (पिराची कुरोली) - आपुल्या माहेरा जाईन मी आता। निरोप या संता हाती आला।। पंढरीच्या उंबऱ्याशी आलेल्या वारकऱ्यांना विठुरायाची ओढ लागली आहे. शनिवारी बोंडले येथे संत तुकाराम महाराज व संत सोपानकाका यांच्या पालखीची गुरू भेट झाली. तेथून पुढे येताच पंढरपूर तालुक्‍यात मेघराजाने स्वागत केल्याने वारकरी सुखावले. मुक्कामासाठी पालखी सोहळा पिराची कुरोली येथे विसावला. रात्री पालखी परिसरात जागा मिळेल तिथे वारकरी झोपले. अनेक दिंड्यांत भजन, कीर्तन व भारुडाचे उशिरापर्यंत उत्साहात कार्यक्रम सुरू होते. पंढरीच्या आतुरतेने वारकरी १५-२० दिवसांचा पायी प्रवास करत आहेत.

संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरून (पिराची कुरोली) - आपुल्या माहेरा जाईन मी आता। निरोप या संता हाती आला।। पंढरीच्या उंबऱ्याशी आलेल्या वारकऱ्यांना विठुरायाची ओढ लागली आहे. शनिवारी बोंडले येथे संत तुकाराम महाराज व संत सोपानकाका यांच्या पालखीची गुरू भेट झाली. तेथून पुढे येताच पंढरपूर तालुक्‍यात मेघराजाने स्वागत केल्याने वारकरी सुखावले. मुक्कामासाठी पालखी सोहळा पिराची कुरोली येथे विसावला. रात्री पालखी परिसरात जागा मिळेल तिथे वारकरी झोपले. अनेक दिंड्यांत भजन, कीर्तन व भारुडाचे उशिरापर्यंत उत्साहात कार्यक्रम सुरू होते. पंढरीच्या आतुरतेने वारकरी १५-२० दिवसांचा पायी प्रवास करत आहेत. ते ठिकाण आता हाकेच्या अंतरावर आले आहे. वारकऱ्यांची उत्सुकता शिगेला पोचली असून वारकऱ्यांची संख्याही वाढू लागली आहे. राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणांहून व मार्गांवरून दिंड्या पालखीच्या दर्शनासाठी येत आहेत. सातारा, कराड, कोल्हापूर, मराठवाडा, विदर्भातून येणाऱ्या दिंड्यांतील अनेक वारकरीही पालखीचे दर्शन घेण्यासाठी येत आहेत. स्थानिक नागरिकांची रात्री उशिरापर्यंत दर्शनाची रांग लागत आहे. शनिवारी दुपारी पावसाचा शिडकावा झाला असला तरी रात्री पुन्हा चांदणे पडल्याने जिथे जागा मिळेल तिथे वारकरी झोपले. रात्री पाऊस झाला तर वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून राहुट्या उभारण्यात आल्या होत्या.

दिवसभर चालून थकल्याने अनेक वारकरी रात्री लवकर झोपले. दिंड्यांमध्ये कीर्तन, भजन, गवळण व भारुडाचे उशिरापर्यंत कार्यक्रम सुरू होते. पालखी सजावट करणारे सीताराम केसवड व कुमार केसवड यांचे उशिरापर्यंत सजावटीचे काम सुरू होते.

भारूड अन्‌ आराध्यांची गाणी...
पालखी मुक्कामाच्या ठिकाणी अनेक दिंड्यांत रात्री भजन, कीर्तन व भारुडं झाली. दिंड्यांतील कलाकार टाळ-मृदंगाच्या गजरात भारुडं सादर करत होते. पालखीच्या रथामागे ५७ नंबरला पुणे जिल्ह्यातील आष्टापूर येथील दिंडी आहे. या दिंडीत पोतराजाचे रूप घेऊन एका भारूड कलाकाराने भारूड सादर करत आराध्यांची गाणी सादर केली.

आरोग्य केंद्रांकडे गर्दी
दिवसभर चालून वारकऱ्यांना थकवा येतो. अनेकांचे पाय दुखतात. सर्दी, खोकला, लहान ताप असे नॉर्मल आजार होतात. वारकऱ्यांच्या सेवेसाठी जिल्हा परिषदेने उभारलेल्या आरोग्य केंद्रांमध्ये गर्दी होत आहे. पण, ही गर्दी यंदा कमी असल्याचे पिराची कुरोली येथील आरोग्य केंद्रावरील कर्मचाऱ्याने सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: tukaram-maharaj-palkhi-2017 palkhi