अश्व धावले रिंगणी, पाय आठविती विठोबाचे

(शब्दांकन - सचिन शिंदे)
Tuesday, 27 June 2017

सोहळ्यात आज 
पालखी सोहळा निमगाव केतकीहून इंदापूरकडे मार्गस्थ होणार
तरंगवाडीला पहिला व गोकुळीचा ओढा येथे दुसरा विसावा
पालखी सोहळ्याचे दुसरे गोल रिंगण इंदापुरात
रिंगण सोहळ्यानंतर पालखी सोहळा इंदापुरात विसावणार 

दाजी लांडगे, उदगीर, जि. लातूर
संत तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यातील पहिले गोल रिंगण सोमवारी कोवळ्या उन्हात रंगले.  
ते माझे सोयरे सज्जन सांगती, 
पाय आठविती विठोबाचे...

तुकोबा रायांच्या अभंगातील ओळीप्रमाणे माझ्या मनातही भावना उमटली. हा सोहळा कोवळे ऊन अंगावर झेलत वारकऱ्यांनी साजरा केला. त्यानंतर सोहळा तासभर बेलवाडीत विसावला. 

संत तुकोबारायांचा पालखी सोहळा सणसरचा मुक्काम आटोपून सोमवारी पहाटे मार्गस्थ झाला. अवघ्या पाच किलोमीटरचा टप्पा काही मिनिटांतच पार केला. सातच्या सुमारास सोहळा बेलवाडीत पोचला. पावणेआठच्या सुमारास पालखी रिंगणात आणण्यात आली. त्या वेळी ‘ज्ञानोबा... तुकाराम’च्या गजराने सारा परिसर दणाणून गेला. रथामागील सतरा क्रमांकाच्या दिंडीत मी चालतो. ती दिंडीही लगोलग मैदानात आणण्यात आली. टाळकरी, पखवाजवादक, तुळस व पाणी डोक्‍यावर घेतलेल्या महिलांसह झेंडेकरी मैदानात आले. जमलेले टाळकरी व पखवाज वादकांनी खेळ सुरू केला. खेळताना एका ठेक्‍यात त्यांनी केलेला ‘ज्ञानबा... तुकाराम’चा गजर मनाला सुखावून गेला. दिंडीचा चोपदार म्हणून माझ्यावर जबाबदारी आहे. त्यामुळे माझ्या दिंडीतील लोकांना योग्य जागी पोचविल्यानंतर मूळ रिंगण लावण्यासाठी मदतीला गेलो.   

पालखीची रिंगण प्रदक्षिणा झाल्यानंतर सोहळ्यातील प्रमुख लोकांनी अश्वाला रिंगण मार्ग दाखवला. पहिल्यांदा रिंगणात मेंढ्यांना आणण्यात आले. त्यांचे दोन वेळा रिंगण पूर्ण झाले. त्यानंतर डोक्‍यावर तुळस घेतलेल्या महिला त्यानंतर झेंडेकरी धावले. त्यानंतर टाळकरी व पखवाजवादक धावले. नंतर मूळ रिंगण सोहळा होणार होता. त्यामुळे उत्सुकता दाटली होती. ‘बोला... पुंडलीक वरदा हरी विठ्ठल’चा जयघोष झाला आणि अश्व रिंगणात धावले. पहिल्यांदा माउलींचे अश्व धावले. त्यानंतर चोपदारांचे अश्व धावले. तिसऱ्या वेळी दोन्ही अश्व एकदम धावले व रिंगण सोहळा झाला. अश्व धावताना तुकारामांचा झालेला गजर मनात घर करून राहिला. रिंगण सोहळा पूर्ण झाल्यानंतर त्याची माती डोक्‍याला लावण्यासाठी भाविकांनी केलेल्या गर्दीने परिसर फुलून गेला. या सोहळ्याने वारकऱ्यांचा शीण दूर झालाच शिवाय पुढच्या वाटचालीलाही बळ मिळाल्याची जाणीव झाली...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tukaram Maharaj Palkhi 2017 palkhi wari 2017