बेलवाडीत रंगले तुकोबांचे पालखी रिंगण 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 27 June 2017

वालचंदनगर -  पंढरीच्या विठ्ठलाच्या भेटीची लागलेली ओढ...‘ज्ञानोबा तुकाराम’च्या जयघोषाने दुमदुमलेले आसमंत...ढगांनी आकाशात केलेली गर्दी अन्‌ ऊन सावलीच्या सुरू असलेल्या खेळामध्ये बेलवाडी (ता. इंदापूर) येथे संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील मानाचे पहिले गोल रिंगण उत्साहात झाले. रिंगण सोहळा पाहण्यासाठी लाखो वैष्णवांनी गर्दी केली होती.

वालचंदनगर -  पंढरीच्या विठ्ठलाच्या भेटीची लागलेली ओढ...‘ज्ञानोबा तुकाराम’च्या जयघोषाने दुमदुमलेले आसमंत...ढगांनी आकाशात केलेली गर्दी अन्‌ ऊन सावलीच्या सुरू असलेल्या खेळामध्ये बेलवाडी (ता. इंदापूर) येथे संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील मानाचे पहिले गोल रिंगण उत्साहात झाले. रिंगण सोहळा पाहण्यासाठी लाखो वैष्णवांनी गर्दी केली होती.

सणसर (ता. इंदापूर) येथील पालखीचा मुक्काम आटोपून पालखी सोहळा सकाळी साडेसात वाजता बेलवाडी गावामध्ये दाखल झाला. आमदार दत्तात्रेय भरणे यांच्या हस्ते संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे व मानाच्या अश्‍वाचे पूजन करण्यात आले. ‘ज्ञानोबा तुकाराम’च्या जयघोषात रिंगण सोहळ्याला सुरवात झाली. मेंढ्यांनी रिंगणाला पहिल्या तीन फेऱ्या मारून सुरवात केली. पताकावाल्यांनी देहभान हरपून रिंगणाला फेऱ्या घातल्या. महिला डोक्‍यावरती तुळस व हंडा घेऊन धावल्या. विणेकरी व पखवाजवालेही देहभान हरपून धावले. अश्‍वांचे रिंगण पाहण्यासाठी वैष्णव आतुरले होते. मानाचे अश्‍व रिंगण सोहळ्यामध्ये धावण्यास सुरवात होताच ‘ज्ञानोबा तुकाराम’च्या जयघोषाने आसमंत दुमदुमले. मानाच्या अश्‍वांनी रिंगण सोहळ्याच्या तीन फेऱ्या पूर्ण करताच नागरिकांनी अश्‍वाच्या पायाखालची धूळ घेऊन मस्तकाला लावण्यासाठी गर्दी केली. रिंगण सोहळा पूर्ण होताच पालखी तळावर फुगडी व वारकऱ्यांचे खेळ रंगले. 

रिंगण सोहळ्याचा परिसर वारकऱ्यांचा गर्दीने फुलून गेला होता. नागरिकांनीही गर्दी केली होती. या वेळी जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती प्रवीण माने, उद्योजक अर्जुन देसाई, सरपंच शोभा गणगे, उपसरपंच अनिल खैरे, ‘छत्रपती’चे संचालक सर्जेराव जामदार, कांतिलाल जामदार, इंदापूर तालुका शिक्षक सोसायटीचे अध्यक्ष संभाजी काळे, शहाजी शिंदे, वसंत पवार, शुभम निंबाळकर, बाळासाहेब गायकवाड, केशव नगरे आदी उपस्थित होते. बारामतीचे उपविभागीय पोलिस अधिकारी बापू बांगर, इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील, वालचंदनगर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक उत्तम भजनावळे, ‘महावितरण’चे मोहन सूळ, तलाठी सचिन करगळ, ग्रामसेवक दीपक कुंभार यांनी रिंगण सोहळ्याचे योग्य नियोजन केल्याने नागरिकांना रिंगण सोहळ्याचा आनंद घेता आला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tukaram Maharaj Palkhi 2017 ringan belwadi