रोटी घाटात वारकऱ्यांसवे नाचल्या पर्जन्यधारा

(शब्दांकन - सचिन शिंदे)
शनिवार, 24 जून 2017

सोहळ्यात आज 
पालखी सोहळा बारामतीकडे मार्गस्थ होणार
दुपारचा मुक्काम बऱ्हाणपुरात
मोरेवाडीत तिसऱ्या विश्रांतीनंतर सोहळा मार्गस्थ होणार 
सायंकाळी सोहळा बारामतीत मुक्कामी विसवणार 

शारदा हरी भोसले, मातोळा (ता. उमरगा, जि. उस्मानाबाद)
रोटी घाटातील बिकट टप्प्यावर पावसाच्या हजेरीने वारकऱ्यांची मने आनंदली. वारकऱ्यांच्या अभंगांसोबत जणू पाऊस नाचल्याची भावना माझ्या मनात तरंगून गेली. याच आनंदात वारकरी नाचत होते, विठुरायाच्या नामस्मरणात दंग होते. या वातावरणात तीन किलोमीटरचा घाटाचा अवघड टप्पा केव्हा पार झाला, तेच समजले नाही. घाटात नेहमीच पाऊस येतो, मात्र मागील दोन वर्षांत त्याने हुलकावणी दिली. यंदा थोडी का होईना लागलेली पावसाची हजेरी मनाला सुखावून गेली.

पालखी सोहळ्यात पाच वर्षांपासून सहभागी होत आहे. सकाळी वरवंडवरून पालखी सोहळा मार्गस्थ झाला. वाटेत आठ किलोमीटरवर पाटसला पहिला विसावा झाला. त्यानंतर सोहळा उजवीकडे वळून रोटी घाटाकडे निघाला. मी रथामागील ३४ क्रमांकाच्या दिंडीत चालते. घाटातील वाट असल्याने दिंडी सोडून सहा-सात महिलांसमवेत पुढे आले. टोलनाक्‍यापासून घाटातील रस्त्याकडे निघाले. ढग दाटून आल्याने रस्त्याच्या कडेला झाडाखाली थांबले. तोपर्यंत सोहळा टोलनाक्‍यावर आला होता. नगारा घाटाकडच्या रस्त्याला लागून काही मिनिटे होतात न होतात तोच पाऊस सुरू झाला. अभंगांच्या तालावर पाऊसच नाचायला लागल्याची भावना मनात तरंगली. 

तेवढ्यात नगारा माझ्याजवळून पुढे गेला. काही वेळाने रथही गेला. रथानंतर दिंड्या ‘ज्ञानोबा माउलीं’चा गजर करत पुढे सरकत होत्या. रस्ता ओला झाला होता. पावसाच्या शिडकाव्याने वारकऱ्यांमध्ये आनंदाला उधाण आले होते. माझी दिंडी आली, त्यात मी सहभागी झाले. डोक्‍यावर तुळस घेऊन विठुरायाच्या ओढीने घाटाचा रस्ता पार करायला सुरवात केली. निम्मा घाट चढून गेलो, तोपर्यंत पालखी रोटीत पोचली. तेथे पोचताच चोपदारांच्या इशाऱ्यावर सोहळा थांबला. तेथे अभंग आरती होणार होती. पावसाच्या हजेरीने सुखावलेले वारकरी आरतीत सहभाग झाले. 

धरीता पंढरीची वाट, 
नाही संकट मुक्तीचे
वंदू येती देव पदे,
त्या आनंद उत्साहे 
नृत्यछंदे, उडती रज, 
जे सहज चालता 
तुका म्हणे गरूड टके, 
वैष्णव निके संभ्रम... 

वारकरी अभंग म्हणण्यात दंग होते. अभंगाचे शब्द कानावर पडल्यानंतर अवघड वाटचालीतील थकवा गायब झाला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tukaram Maharaj Palkhi 2017 roti ghat