धोतराच्या पायघड्या आणि मेंढ्यांचे रिंगण...

(शब्दांकन - सचिन शिंदे)
Monday, 26 June 2017

सोहळ्यात आज 
पालखी सोहळा सणसरहून निमगाव केतकीकडे मार्गस्थ होणार
पहिले गोल रिंगण बेलवाडी येथे होणार
दुपारचा विसावा बेलवाडीत
दुपारनंतर शेळगाव फाटा, अंथुर्णेमार्गे पालखी सोहळा निमगावात विसावणार 

संभाजी महाराज सूर्यवंशी, अंबाजोगाई (जि. बीड)
तुकोबारायांच्या पालखी सोहळ्याचे काटेवाडीत धोतराच्या पायघड्यांनी झालेले स्वागत व दुपारच्या विसाव्यानंतर झालेले मेंढ्यांचे रिंगण माझ्यासारख्या वारकऱ्याला जगण्याचा मंत्र देऊन जाते. बारामतीतून सोहळा रविवारी सकाळी मार्गस्थ झाला. त्या वेळी वातावरण ढगाळ होते. पावसाची चिन्हे होती. मुंबई, पुण्यात पावसाला सुरवात झाल्याच्या बातम्या ऐकल्या होत्या. त्यामुळे आज वारीत पाऊस बरसणार, अशी उमेद घेऊनच दिंडीत चालू लागलो. सुमारे नऊ किलोमीटरचा टप्पा पार करत साडेअकराच्या सुमारास पालखी सोहळा काटेवाडीच्या हद्दीत पोचला. गावकऱ्यांनी जंगी स्वागत केले. कमानीतून गावात गावकऱ्यांनी खांद्यावरून पालखी नेली. रथ बसस्टॉपजवळ गेला.

मी रथामागे चालत होतो. वीस वर्षांपासूनचा माझा नित्यनियम आहे. त्यानुसार पालखी सोहळा काटेवाडीत पोचण्याआधीच मी झपझप चालत काटेवाडीच्या कमानीजवळ पोचलो. मुलींनी काढलेली रांगोळी व त्यांच्या लेझीम पथकाच्या स्वागताने भारावून गेलो. तुकोबारायांच्या पालखीचे धोतराच्या पायघड्यांनी झालेले स्वागत मनाला आनंद देऊन गेले. परिट समाजाने धोतराच्या पायघड्या घालण्याची सेवा यंदाही चोखपणे पार पाडली. गावात गेलो. वारकऱ्यांसाठी जेवण होते. भात, भाजी, चपाती व लाडूचा बेत होता. जेवण आटोपून मार्गी लागलो. 

गावातून थेट मेंढ्यांच्या रिंगणाजवळ पोचलो. तेथे तयारी सुरू होती. दुपारी तीनच्या सुमारास पालखी आली, त्यापूर्वीच मेंढ्यांचे आगमन झाले होते. सोहळा प्रमुखांसह चोपदारांनी रिंगण लावून घेतले. गर्दी असल्यामुळे रिंगण लावताना कसरत होत होती. मुख्य रस्त्यावरील वाहतूक थांबवण्यात आली. त्यानंतर पालखी रथात ठेवण्यात आली. चोपदारांनी इशारा केला. ‘पुंडलिक वरदा हरी विठ्ठल’चा गजर झाला अन्‌ मेंढ्यांना रिंगणात सोडण्यात आले. शेकडो मेंढ्यांनी पाच वेळा रिंगण पूर्ण केले. हा रिंगण सोहळा संपला. त्यानंतरही नागरिकांनी दर्शनासाठी गर्दी केली. 

धोतराच्या पायघड्या व रिंगण सोहळा पाहिल्याने अपूर्व असे आत्मिक समाधान मिळाले. रिंगण बघण्यासाठी आजूबाजूच्या गावांमधून आलेले नागरिक व त्यानंतरच्या ‘ज्ञानोबा- तुकाराम’च्या जयघोषाने पुढच्या वाटचालीचे बळ मिळाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tukaram-maharaj-palkhi-2017 wari ringan