Wari 2019 : देहूत चोख बंदोबस्त

सकाळ वृत्तसेवा
Friday, 21 June 2019

पासची व्यवस्था
पालखी प्रस्थान सोहळ्यास भजनी मंडपात गर्दी होते. त्यामुळे संत तुकाराम महाराज संस्थानने यंदा देऊळवाड्यात पासची व्यवस्था केली आहे, अशी माहिती पालखी सोहळाप्रमुख संजय महाराज मोरे यांनी दिली.

देहू - आषाढी वारीसाठी देहूतून पंढरपूरकडे संत तुकाराम महाराज पालखी सोहळा सोमवारी (ता. २४) प्रस्थान ठेवणार आहे. त्या पार्श्वभूमीवर देहूतील मुख्य देऊळवाड्यात देहूरोड पोलिसांकडून कडक सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात येणार आहे. प्रस्थान सोहळ्याच्या वेळी देऊळवाड्यातील भजनी मंडपात भाविकांची गर्दी होते. सोहळा सर्वांना व्यवस्थित पाहता यावा, यासाठी पासधारकांनाच भजनी मंडपात प्रवेश देण्यात येणार आहे, असे देहूरोड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मनीष कल्याणकर यांनी सांगितले. अनुचित प्रकार रोखण्यासाठी पाच पथके व ४६० पोलिस कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत.

प्रस्थानाच्या दिवशी देऊळवाड्याच्या मुख्य प्रवेशद्वारातून दिंड्यांना आत प्रवेश देण्यात येईल. दिंडीतील वाहनांसाठी रिंगरोड परिसरात वाहनतळ आहे. संत तुकाराम महाराज मुख्य देऊळवाडा, वैकुंठस्थान, गावचे प्रवेशद्वार, देहूरोड येथील कमानीवर टेहळणीसाठी सोय केली आहे.

कल्याणकर म्हणाले की, भाविकांच्या सुरक्षिततेसाठी पोलिस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांच्या नेतृत्वाखाली दोन सहायक पोलिस उपायुक्त, ६ पोलिस निरीक्षक, ३० फौजदार, १८० कर्मचारी, ९५ महिला पोलिस, २०० होमगार्ड, ६० महिला होमगार्ड यांची नियुक्त केली आहे. विविध संस्था, कंपनीतील दोनशे स्वयंसेवक बंदोबस्तासाठी आहेत. सहायक पोलिस उपायुक्त नम्रता पाटील यांच्या देखरेखीखाली देहू ते दापोडीपर्यंत बंदोबस्त असणार आहे. दोन एसआरपीएफ प्लॉटून, दोन आर्म्स गार्ड, दोन स्टायकिंग फोर्स, दोन एनडीआरएफच्या टीम, दोन बाँबशोधक पथके असतील. वाहनांवर फिरते कॅमेरे, नदीकिनारी जीव सुरक्षारक्षक तैनात केले आहेत. 

सोहळ्यानिमित्त देहूतील वाहतूक व्यवस्थेत बदल केला आहे. प्रस्थानाच्या दिवशी सोमवारी (ता. २४) देहूगावातून अवजड वाहने बंद करण्यात येणार आहेत. मंगळवारी (ता. २५) सोहळा देहूतून पंढरपूरकडे मार्गस्थ होईल त्या वेळी देहूरोड ते निगडीपर्यंत वाहतूक बंद असणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wari 2019 Dehu Police Bandobast Sant Tukaram maharaj Palkhi Sohala