esakal | Wari 2019 : पाणी, विजेचा अखंड पुरवठा
sakal

बोलून बातमी शोधा

देहू - पालखी सोहळ्यापूर्वी डांबरीकरण करण्यासाठी प्रशासनाची लगबग सुरू आहे.

आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळा अवघ्या दोन दिवसांवर (सोमवार, ता. २४) येऊन ठेपला आहे. त्यामुळे हजारो भाविकांना पिण्यासाठी शुद्ध पाणीपुरवठा व्हावा, यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वतीने जय्यत तयारी सुरू आहे.

Wari 2019 : पाणी, विजेचा अखंड पुरवठा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

देहू - आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळा अवघ्या दोन दिवसांवर (सोमवार, ता. २४) येऊन ठेपला आहे. त्यामुळे हजारो भाविकांना पिण्यासाठी शुद्ध पाणीपुरवठा व्हावा, यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वतीने जय्यत तयारी सुरू आहे.

देहू, माळवाडी, विठ्ठलवाडी या गावांत वारकरी आणि दिंड्या मुक्कामी असतात. त्यामुळे २४ तास पाणीपुरवठा करण्यासाठी जीवन प्राधिकरणाची लगबग सुरू आहे; तर अखंड वीजपुरवठा ठेवण्यासाठी महावितरणचे कर्मचारी तयारी करत आहेत. आषाढी वारीत जलजन्य आजार पसरू नयेत, यासाठी जीवन प्राधिकरणाच्या वतीने विशेष खबरदारी घेण्यात येत आहे.

गावात जलवाहिनीतील गळती थांबविण्याचे काम सुरू आहे; तर काही भागांत हे काम पूर्ण झाले आहे. भूमिगत गटारांची कामे करण्यात येत असल्याने बऱ्याच ठिकाणी नळजोड तुटले आहेत. शुक्रवारीही नळजोड दुरुस्तीची कामे सुरू होती. माळवाडीतील तुटलेले नळजोड दुरुस्त करण्यात आले. याबाबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे शाखा अभियंता धनंजय जगधने म्हणाले, ‘‘माळवाडी गावात २४ तास पाणीपुरवठा देण्यात येणार आहे. नळदुरुस्तीची कामे ९९ टक्के झाली आहेत. बोडकेवाडी येथील पंपिंग स्टेशनवर जादा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. क्‍लोरिनेशन, आलम यांचा मुबलक साठा आहे.’’

महावितरण अखंड वीजपुरवठा देणार आहे. याबाबत शाखा अभियंता ए. सी. गोवडा यांनी सांगितले, की वीजपुरवठा सुरळीत राहण्यासाठी जादा फीडरची व्यवस्था केली आहे; तसेच पालखी मार्गावरील वीजवाहक तारांवर येणाऱ्या झाडांच्या फांद्या तोडल्या आहेत. पथदिवे बसविण्यात आले आहेत. घाटावर मर्क्‍युरी दिवे बसविण्यात आले आहेत; तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी फिरते पथक नेमण्यात आले आहे.

पाणी एटीएमला पसंती
गावात विविध ठिकाणी शुद्ध पिण्याचे पाणी फिल्टरमुळे उपलब्ध होत आहे. एक रुपयात एक लिटर आणि पाच रुपयांत २० लिटर पाणी एटीएममधून मिळते. त्यामुळे वारकऱ्यांची गर्दी पाणी एटीएमकडे जास्त आहे.