Wari 2019 : आळंदीत जड वाहनांना बंदी

सकाळ वृत्तसेवा
Friday, 21 June 2019

पुणे-आळंदी रस्ता बुधवारी पहाटे बंद
माउलींची पालखी आळंदीतून बुधवारी सकाळी सहाला पुण्याकडे मार्गस्थ होणार असल्याने पुणे-आळंदी रस्त्यावरील सर्व वाहतूक पहाटे पाचपासूनच बंद ठेवली जाणार आहे. वारी काळात वडगाव रस्ता, चाकण रस्ता, देहूफाटा येथे वाहतूक पोलिस उभे करून बॅरिकेडिंग केले जाणार आहेत. पालखी पुण्याकडे मार्गस्थ होत असताना भोसरी, पिंपरी भागातून आळंदीला येणारी वाहने दिघी मॅक्‍झिन येथे, मोशी- देहूमार्गे येणारी वाहने देहूफाटा येथे अडविली जाणार आहेत. पालखी सोहळा पुणे विश्रांतवाडीच्या पुढे मार्गस्थ झाल्यानंतर हा मार्ग पुन्हा खुला करण्यात येणार आहे.

आळंदी - आषाढी वारीसाठी माउलींची पालखी मंगळवारी (ता. २५) प्रस्थान ठेवणार आहे. यासाठी येथे होणारी गर्दी लक्षात घेता मरकळ औद्योगिक विभागात जाणाऱ्या अवजड, तसेच मालवाहू वाहनांना शुक्रवारपासून (ता.२१) बुधवारपर्यंत (ता. २६) आळंदी शहरातून प्रवेश बंदी करण्यात आली आहे, अशी माहिती आळंदी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र चौधर यांनी दिली.

चौधर यांनी सांगितले, की मरकळ औद्योगिक विभागात जाणाऱ्या अवजड वाहनांना आळंदी शहरातून शुक्रवारपासून प्रवेश बंदी केली आहे. भोसरी, तसेच चाकणहून मरकळ औद्योगिक विभागात जाणारी अवजड वाहने पुणे-नगर रस्त्यावरून वाघोली-लोणीकंदमार्गे मरकळला वळविण्यात येतील. पुण्यावरून येणारी छोटी चारचाकी वाहने चऱ्होली खुर्द ते चऱ्होली बुद्रुक बाह्यवळण मार्गाने वळविली जातील. शहरात रस्त्यातील अडथळे, अतिक्रमणे दूर करण्यासाठी पोलिसांचे स्वतंत्र पथक वारी काळात राहील.

हातगाड्या, तसेच फिरत्या व्यावसायिकांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात येईल. वारी काळात रस्त्यावर, तसेच धर्मशाळांसमोर उभ्या वाहनांवर कारवाई करण्यात येईल. महाद्वारातील रस्त्यांवरही वाहनांना बंदी राहील. आळंदी पोलिसांच्या वतीने नऊ सहायक पोलिस आयुक्त, ४३ पोलिस निरीक्षक, १७० सहायक पोलिस निरीक्षक, ११३० महिला व पुरुष पोलिस कर्मचारी, दोनशे वाहतूक पोलिस, ५५० गृहरक्षक दर्जाचे कर्मचारी, असा बंदोबस्त आहे. प्रस्थान (ता. २५) झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी (ता. २६) पालखी पुण्याकडे मार्गस्थ होणार आहे. दिंडीतील काही वाहने माउलींची पालखी पुण्याकडे मार्गस्थ होण्याआधी पहाटे दोनपासून पुणे-आळंदी रस्ता, चऱ्होली बुद्रुक ते चऱ्होली खुर्द बाह्यवळण आणि केळगाव- डुडूळगाव रस्त्याने पहाटे पाचपर्यंत सोडण्यात येतील.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wari 2019 Heavy Vehicle Ban Alandi Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Sohala