esakal | Wari 2019 : खड्डेमुक्तीची वारी
sakal

बोलून बातमी शोधा

आळंदी (ता. खेड) - देहू फाट्यावरील गल्लीबोळातील सिमेंटचे केलेले रस्ते.

दिवसाआड पाणीपुरवठा
काळेवाडी, देहू फाटा, इंद्रायणीनगर आणि खेड हद्दीत गोपाळपुरा, वडगाव रस्ता, मरकळ रस्ता व चऱ्होली रस्त्यासह गावठाणात विभागवार; पण दिवसाआड पाणी सोडले जाईल. २४ तास पंपिंग सुरू ठेवणार आहे. रोज एक तास पाणी राहील. वारकऱ्यांना सहा टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येणार असून, शहराबाहेरील दिंड्यांसाठी ही सोय आहे.

Wari 2019 : खड्डेमुक्तीची वारी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

आळंदी - आषाढी वारीत दरवर्षीप्रमाणे वारकऱ्यांना खड्ड्यांची वारी यंदा अनुभवावी लागणार नाही. कारण, आता पालिकेने राज्य तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून प्रदक्षिणा रस्त्यासह पालिका निधीतून कोट्यवधी रुपये खर्चून रस्ते सिमेंट काँक्रीटचे केले आहेत; तसेच वारीकाळात वारकऱ्यांना आणि आळंदीकरांना पुरेशा प्रमाणात पाणी पुरविण्याकरता दिवसाआड विभागवार एक तास पिण्याचे पाणी सोडले जाणार असल्याची माहिती आळंदीचे मुख्याधिकारी समीर भूमकर यांनी दिली.

वारीकाळात येणाऱ्या लाखो भाविकांना सुविधा पुरविण्यासाठी आळंदी पालिकेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. याबाबत मुख्याधिकारी भूमकर यांनी सांगितले की, शहरात वेगाने प्रमुख रस्त्यांसह गल्लीबोळांतील रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण केले जात आहे. मंदिराकडे येणाऱ्या मार्गावर सुमारे पावणेदोन कोटींचा निधी खर्च करून सिमेंट काँक्रिटीकरण केले आहे. अठरा कोटींतून प्रदक्षिणा मार्गाचे काम पूर्ण झाले. आळंदी शहरातील रस्त्यांवर शनिवारपासून (ता. २२) जंतुनाशक फवारणी केली जाईल.

वारीसाठी जादा कर्मचारी नेमून शहरात स्वच्छता ठेवली जाईल. वारीकाळात रात्री आणि पहाटे घंटागाड्यांची सोय कचरा वाहण्यासाठी केली आहे. वारीकाळासाठी नदीकाठी महिलांना कपडे बदलण्यासाठी चेंजिगरूमची व्यवस्था करण्यात येईल. शहरात ठिकठिकाणी प्रखर प्रकाशझोताचे पाचशे दिवे लावले जाणार आहेत. शहरात विविध ठिकाणी यात्रा अनुदानातून सीसीटीव्ही लावण्यात येतील. साठ सीसीटीव्ही आणि महत्त्वाच्या सूचना देण्यासाठी ठिकठिकाणी चाळीस स्पीकर लावले जाणार आहेत. पालिकेत मध्यवर्ती आपत्कालीन कक्ष उभारण्यात येईल. शहरातील सर्व शासकीय कार्यालयांतील एक प्रतिनिधी उपस्थित राहील.

तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून चौदा ठिकाणी बांधलेल्या साडेतीनशे शौचालये आणि जिल्हा परिषदेकडून देण्यात येणारी नऊशे शौचालये विविध ठिकाणी लावण्यात येणार आहेत.