Wari 2019 : वारकऱ्यांना २४ तास आरोग्यसेवा

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 22 June 2019

अखंड वीज
वीज मंडळाचे सहायक अभियंता विजय पाटील यांनी सांगितले, की यात्रा काळात २४ तास वीजपुरवठा केला जाईल. वीजतारांची दुरुस्ती पूर्ण झाली आहे. शहरात १२ रोहित्रे असून त्यांची दुरुस्ती केली आहे. आळंदी पालिकेच्या पाणीपुरवठ्यासाठी स्वतंत्र रोहित्र असून, चोवीस तास पाणीपुरवठा केंद्र सुरू राहावे, यासाठी वीजपुरवठा अखंड राहील. वारीसाठीच्या नियंत्रण कक्षासाठी चार लोकांचे फिरते पथक राहील.

आळंदी - संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी येथे येणाऱ्या लाखो वारकऱ्यांना आरोग्यसेवा देण्यासाठी ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्राने संयुक्तपणे नियोजन केले आहे. यंदा आषाढी वारीत चोवीस तास बाह्यरुग्ण आणि आंतररुग्णांसाठी आरोग्य सेवा देण्यात येणार आहे. शहरातील ग्रामीण रुग्णालयाच्या नव्या इमारतीसह इतर चार ठिकाणी आरोग्य सुविधा सज्ज असल्याची माहिती आळंदी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. गणपत जाधव आणि आरोग्य सेवक डॉ. संदीप गोरे यांनी दिली.

डॉ. जाधव आणि डॉ. गोरे यांनी सांगितले, की राज्य सरकारने चार कोटी रुपये निधीतून आळंदीत मध्यवर्ती ठिकाणी ग्रामीण रुग्णालयाची सुसज्ज इमारत उभी केली आहे. येथे तीस खाटा उपलब्ध आहेत. शहरातील खासगी रुग्णालयांतही आरोग्य सेवेसाठीच्या सूचना दिल्या आहेत. चोवीस तास आरोग्य सेवा दिली जाणार असून दोन वैद्यकीय अधिकारी, दोन अधिपरिचारिका कार्यरत राहणार आहेत. पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी १५ वैद्यकीय अधिकारी, २० अधिपरिचारिका, २५ परिचर, ६ प्रयोगशाळा तंत्रज्ञ, ६ औषध निर्माण अधिकारी, १५ आंतरवासीय विद्यार्थी, ८ क्ष किरणतज्ज्ञ, चार रुग्णवाहिका मागवून कामाची विभागणी केली आहे. सर्वप्रथम पालिका हद्दीतील धर्मशाळा, हॉटेल यांना भेट देऊन स्वच्छतेविषयी मार्गदर्शन केले जाणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wari 2019 Warkari Health Service