esakal | अश्‍व दौडले रिंगणी, होता टाळ-मृदंगाचा ध्वनी
sakal

बोलून बातमी शोधा

अश्‍व दौडले रिंगणी, होता टाळ-मृदंगाचा ध्वनी

अश्‍व दौडले रिंगणी, होता टाळ-मृदंगाचा ध्वनी

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

लोणारवाडी (ता. सिन्नर) -
अश्‍व दौडले रिंगणी, 
होता टाळ-मृदंगाचा ध्वनी ! 
निवृत्तिनाथांच्या जयजयकारे 
गेले रिंगण रंगुनी !!

ढगाळ वातावरणात अश्‍वांची नेत्रदीपक दौड, टाळ-मृदुंगाच्या साथीने वारकऱ्यांमध्ये निर्माण झालेला उत्साह व पुंडलिक वरदा हरी विठ्ठल या जयघोषाबरोबरच संतश्रेष्ठ निवृत्तिनाथांचा जयजयकार करीत दातली येथे अश्‍वांचा पहिला नेत्रदीपक गोल रिंगण सोहळा लाखो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साही व भक्तिमय वातावरणात पार पडला. 

पहाटेची पूजा व आरती झाल्यानंतर श्री निवृत्तिनाथ महाराजांच्या दिंडी सोहळ्याने लोणारवाडीचा निरोप घेतला. सकाळी टाळ-मृदंगाच्या गजरात वारकऱ्यांनी वाटचालीला सुरवात केली. सकाळी नऊला हा सोहळा सिन्नर येथे पोचला. नगरवासीयांनी सोहळ्याचे मोठ्या उत्साही व भक्तिमय वातावरणात स्वागत केले. वारकऱ्यांना ग्रामस्थांतर्फे सकाळची न्याहारी देण्यात आली. अल्पशा विश्रांतीनंतर सोहळा कुंदेवाडीकडे मार्गस्थ झाला. आजची वाटचाल ही १८ किलोमीटरची असल्याने वारकऱ्यांची पावले दुपारच्या भोजन व विश्रांतीसाठी झपझप पडत होती. वाटचालीत गोड अभंग गायले जात होते. दुपारी कुंदेवाडी येथे पोचल्यानंतर भोजन व विश्रांती घेण्यात आली.

अश्‍वांची नेत्रदीपक दौड 
दातली येथील पहिल्या गोल रिंगण सोहळ्यासाठी तळवाडे (ता. त्र्यंबकेश्‍वर) येथील पांडुरंग बोडके यांचा देवाचा अश्‍व व पिंपळद येथील मनोहर घोलप यांचा स्वाराचा अश्‍व रिंगणस्थळी आणण्यात आला. संस्थानचे अध्यक्ष संजयनाना धोंडगे, सचिव पवनकुमार भुतडा, पालखी सोहळा अध्यक्ष पंडित महाराज कोल्हे, व्यवस्थापक पुंडलिकराव थेटे, विश्‍वस्त रामभाऊ मुळाणे, जयंत महाराज गोसावी, त्र्यंबकराव गायकवाड आदींनी अश्‍वांची पूजा केली. सुरवातीला पताकाधारी वारकऱ्याने एक प्रदक्षिणा पूर्ण केली. त्यानंतर ‘पुंडलिक वरदा हरी विठ्ठल’ नामाचा जयघोष करीत देवाचा व स्वाराचा अश्‍व रिंगणात सोडण्यात आले. या दोन्ही अश्‍वांनी नेत्रदीपक तीन प्रदक्षिणा पूर्ण करून लाखो भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. रिंगण पूर्ण होताच अश्‍वांच्या टापाखालील माती भाळी लावण्यासाठी भाविकांनी गर्दी केली.
 
रिंगणात रंगले उडीचे खेळ 
अश्‍वांच्या नेत्रदीपक रिंगण सोहळ्यानंतर सर्व दिंड्यांना रिंगणाच्या ठिकाणी निमंत्रित करण्यात आले. बेलापूरकर महाराज व जयंत महाराज गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली दिंड्या-दिंड्यांमध्ये हुतुतू, हमामा, फुगडी, सूरपाट, गड्यात गडी, उडी आदी खेळ रंगले. देहभान हरपून वारकऱ्यांनी या खेळांचा आनंद लुटला. सायंकाळी हा सोहळा खंबाळे मुक्कामी पोचला. आज (ता. १४) हा सोहळा भोकणी, मऱ्हड, निऱ्हळमार्गे पारेगाव मुक्कामी पोचेल.

दातलीत रिंगण सोहळा 
संतश्रेष्ठ श्री निवृत्तिनाथ दिंडी सोहळ्यातील पहिले गोल रिंगण दातली येथे होणार असल्याने सर्व वैष्णवांमध्ये उत्साह संचारला होता. अवकाशात हळूहळू मेघराजाची गर्दी होऊ लागली होती. जणू त्यालाही अश्‍वांच्या रिंगण सोहळ्याची उत्सुकता लागून राहिली होती. दुपारी साडेतीनला सोहळा दातली येथे पोचला. श्री निवृत्तिनाथ समाधी संस्थान व ग्रामस्थांनी रिंगण आखून घेतले होते. रिंगणस्थळी पालखी येताच ती रथातून उतरविण्यात आली व रिंगणाला गोल प्रदक्षिणा घालून ती रिंगणाच्या मध्यभागी आणण्यात आली. त्यानंतर पताकाधारी, तुळशीवाल्या महिला, टाळकरी, मृदंगवादक, विणेकरी आदींनी पालखी व रिंगणाला एक प्रदक्षिणा पूर्ण केली.