जगण्याची एनर्जी अन्‌ भक्तीची शिदोरी

नंदा तुपे, सुपे (जि. पुणे)
Tuesday, 4 July 2017

संत भार पंढरीत पोचणार असल्याने माझ्या आनंदाला पारावार उरलेला नाही. संतांचे विचार जागते ठेवणाऱ्या पालख्या आज पंढरीत दाखल होणार आहेत. त्यामुळे सावळ्या विठुरायाच्या ओढीने मी पंढरपुरात दाखल होणार आहे. वारीच्या काळात विचार अन्‌ आचारातही पांडुरंग सामावल्याची भावना मनात घेऊन पंढरीत दाखल होते आहे. यंदाची माझी नववी वारी आहे. देहूपासूनचा प्रवास अत्यंत चांगला झाला. वाटेत दोन ठिकाणी किरकोळ पाऊस झाला; मात्र म्हणावासा पाऊस झालेला नाही, तेवढीच खंत मनात आहे. मात्र, देहूपासूनच्या प्रवासात वर्षभराची जगण्याची एनर्जी व विठुरायाच्या भक्तीची शिदोरी सोबत घेऊन जाणार असल्याचा आनंद सर्वांत मोठा आहे. त्यामुळे वारी चुको दे न हरी... अशीच भवना मनात कायम राहील.

संत तुकोबारायांचा पालखी सोहळा काल रात्री वाखरीत विसावला, तेथे चांगली सोय करण्यात आली होती. राज्यभरातून आलेल्या वेगवेगळ्या पालख्या काल रात्री वाखरीत विसावल्या होत्या. त्यामुळे प्रत्येक पालखीत भजन, कीर्तनाचा आनंद दिसत होता. "आनंदाचे डोही आनंद तंरग' अशीच माझी भावना झाली. माझ्या सोबतच्या पाच सहकारी मैत्रिणींना घेऊन रात्री माउलींच्या पालखीचे दर्शन घेतले. त्यानंतर महत्त्वाच्या पालख्यांचेही दर्शन घेऊन दिंडीत आले. मी बावीस क्रमांकाच्या दिंडीत चालते. कालचा प्रवास थोडाच होता. संत तुकोबारायांचा पालखी सोहळा आज दुपारी एकच्या सुमारास मार्गस्थ झाला. वाखरीतून निरोप घेताना पंढरीची ओढ अधिक वाढली होती.
पालखी सोहळा दुपारी एक वाजता पंढरपूरकडे मार्गस्थ झाला. त्या वेळी दिंड्या क्रमांकाने लावण्यात आल्या. सकाळपासून पादुका दर्शनासाठी खुल्या ठेवण्यात आल्या होत्या. सोहळा हळूहळू पाच किलोमीटरचे अंतर कापून पुढे सरकत होता. दूध पंढरीत अनेक वारकरी खरेदीसाठीही जात होते. पंढरपुरात येण्यापूर्वी पादुका अभंग आरती झाली, त्यालाही वारकऱ्यांनी उपस्थिती लावली होती. त्यानंतर तेथेच उभा रिंगण सोहळा पार पडला. मानाच्या अश्वासह चोपदाराच्या अश्वाने रिंगण पूर्ण केले.

त्या वेळी पुंडलिक वरदाचा..... मोठा गजर करत सोहळ्यातील अखेरचा रिंगण सोहळा मीही डोळ्यांत साठवला. गर्दी होती; पण त्यातूनही अश्वाच्या दर्शनासाठी पुढे जाऊन हात लावला, त्या वेळी आनंदच आनंद वाटला. सायंकाळी सोहळा पंढरपुरात दाखल झाला, त्या वेळी चंद्रभागेतीरी जाऊन दर्शन घेतले. मंदिराच्या भोवती फिरून दर्शन घेतले. पालख्यांच्या व त्यातील वारकऱ्यांच्या स्वागतासाठी प्रशासन सज्ज होते. अनेक ठिकाणी स्थानिक लोकांनी स्वागत केले होते. त्यामुळे मन प्रसन्न झाले. त्याच प्रसन्नतेत चंद्रभागेच्या तीराचे दर्शन घेऊन पुन्हा दिंडीकडे आले. त्यानंतर उद्या एकादशी दिवशी सावळ्या पांडुरंगाच्या दर्शनाची ओढ मनात ठेवून आम्ही तेथेच विसावलो.
(शब्दाकंन - सचिन शिंदे)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: wari news palkhi sohala nanda tupe