संतांसंगे स्नानाचा आनंद विरळच

विजयराज जाधव, सुरत, गुजरात
Sunday, 25 June 2017

पुणे जिल्ह्याचा निरोप घेताना नीरा नदीचे पवित्र स्नान आणि सातारा जिल्ह्यात प्रवेश करताना पाडेगावच्या ग्रामस्थांनी केलेल्या ढोलताशांच्या गजरातील स्वागताने मन भारावून गेले. चांदीच्या रथातील माउलींच्या पादुका हातात घेऊन चाललेले पालखी सोहळा मालक राजाभाऊ आरफळकर, फुलांच्या पाकळ्यांच्या पायघड्या आणि माउली माउली नामाचा टिपेला पोचलेला गजर, अशा वातावरणात नीरा स्नानाने अवघा रंग एक झाला, अशीच अवस्था झाली.  

वाल्हे येथे पहाटपूजा झाल्यानंतर नीरा स्नानासाठी माउलींचा सोहळा मार्गस्थ झाला. सकाळपासून उन्हाची तीव्रता होती. टप्पा छोटा होता. मात्र उन्हामुळे थकवा जाणवत होता. मधूनच वारा आल्यावर धुळीचे कण अंगावर चिकटून राहत होते. सकाळी साडेदहाला पालखी सोहळा नीरा येथे जेवणासाठी विसावला. खरे तर वारकऱ्यांना जेवणापेक्षा नीरा स्नानाची आतुरता लागली होती. नदीच्या दोन्ही काठांवर भाविकांची गर्दी होती. अबालवृद्ध, महिला वारकरी नीरेच्या वाहत्या पाण्यात डुंबण्याचा आनंद घेत होत्या. नीरा स्नानाचे महत्त्व पूर्वीपासून असून आजही ते जपले जाते. पालखी मार्गावर तोंडले येथील नंदाच्या ओढ्यात पादुकांवर जलशिंपन केले जाते. मीही सहकारी वारकऱ्यांबरोबर स्नानाचा आनंद घेतला. संतांसंगे स्नानाचा आनंद विरळाच आणि भाग्याचाही. 

स्नानावेळी अनेकजण फोटो काढण्यासाठी गर्दी करत होते. इथल्या दत्त घाटावर आकर्षक फुलांच्या पाकळ्या आणि रांगोळ्याच्या पायघड्या घातल्या होत्या. 

माउली स्नानासाठी आल्यानंतर माउली माउलीचा गजर मनाला आनंद देत होता. स्नानानंतर पादुका पालखीरथात ठेवण्यात आल्या. त्यानंतर सोहळ्याने पुणे जिल्ह्याचा निरोप घेत सातारा जिल्ह्यातील पाडेगावात प्रवेश केला. या वेळी विद्यार्थ्यांनी बॅंड आणि तुतारीने स्वागत केले. नंतर सोहळा लोणंद नगरीत विसावला.खरेतर मी मूळचा गुजरातमधील; मात्र वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून मला वारीचे वेध लागले. गेल्या सात वर्षांपासून वारीच्या वाटेवर येतो. मात्र दरवर्षी तेवढाच आनंद मला वारीच्या माध्यमातून मिळतो. वर्षभराची ऊर्जा घरी घेऊन जातो.

सोहळ्यात आज 
पालखी दुपारी लोणंदहून पुढे मार्गस्थ
दुपारी चांदोबाचा लिंब येथे पहिले उभे रिंगण
तरडगाव येथे सोहळा मुक्कामी

(शब्दांकन - विलास काटे)

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: wari news sant dnyaneshwar maharaj palkhi sohala