वाखरीत ‘विश्‍वरूप दर्शना’ची अनुभूती

पूजा करपे, डोंबिवली, मुंबई
Monday, 3 July 2017

वाखरी - संतांच्या पालख्यांच्या संगतीत रंगलेले उभे- गोल रिंगण, हा नयनरम्य सोहळा ‘याचि देही याचि डोळा’ अनुभवण्यासाठी उसळलेल्या विराट गर्दीने जणू ‘विश्वरूप दर्शन’च घडल्याचा आनंद रविवारी वारकऱ्यांनी घेतला. वाखरीच्या तळावरील हे विलोभनीय दृश्‍य म्हणजे ‘आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदची अंग आनंदाचे’ असेच होते. 

माउलींचा पालखी सोहळा शनिवारी भंडीशेगावला मुक्कामी होता. भंडीशेगाव ते वाखरी कमी अंतराची वाटचाल असल्याने आज वारकरी दुपारचे जेवण करूनच निघण्याची तयारी करू लागले. आज कांदेनवमी असल्याने भंडीशेगावला विविध दिंड्यांमधून जेवणासाठी कांदाभजीचा बेत होता.

जेवणानंतर दुपारी बारानंतर अनेकांना वेध लागले ते वाखरीचे. वाखरीला जाण्यासाठी देवस्थानच्या तंबूत एक वाजता कर्णा वाजविण्यात आला आणि पालखी वाखरीच्या दिशेने जाण्यासाठी सज्ज झाली. माउलींचा सोहळा मजल- दरमजल करत वाखरीला बाजीरावच्या विहिरीजवळ पोचला. पोलिस एकेक करून वाहने पुढे काढत होते. यामुळे चालणाऱ्या वारकऱ्यांना अडचण नव्हती. आज सोहळ्यातील चौथे गोल आणि दुसरे उभे रिंगण होणार होते.

वारकरी आधीच रस्त्याच्या दुतर्फा थांबून राहिले. संत तुकाराम महाराज आणि माउलींच्या पालखी सोहळ्यातील उभ्या रिंगणाचा अनुभव वारकऱ्यांनी घेतला. त्यानंतर तासाभराने वाखरीच्या प्रशस्त मैदानात माउलींच्या गोल रिंगणाची आखणी सुरू झाली. रिंगणाच्या मध्यभागी ‘माउली माउली’च्या गजरात पालखी आणून मांडण्यात आली. चोपदारांनी पोलिसांच्या मदतीने गोलाकार दिंड्या आणि पताकाधारी रिंगणासाठी उभे केले. ‘माउली माउली’चा गजर टिपेला पोचला होता. भोपळ्या दिंडीतील मानकऱ्याने रिंगणात जरीपटक्‍याचा ध्वज घेऊन फेरी मारली. त्यानंतर स्वाराचा अश्व धावला. पाठोपाठ माउलींचा अश्व धावू लागला. रांगोळ्यांच्या पायघड्यांनी आधीच रिंगण आकर्षक दिसू लागले होते, त्यातच वारकऱ्यांनी केलेला माउलीनामाचा गजर चैतन्य निर्माण करत होता. माउलींच्या अश्वाने दोन फेऱ्या मारून रिंगण पूर्ण केले. रिंगणानंतर वारकऱ्यांनी धाव घेत अश्वांच्या टापाखालची माती कपाळी लावण्यासाठी गर्दी करू लागले.

आळंदीपासून निघालेला पालखी सोहळा आता अंतिम टप्प्यात आला आहे. कधी पंढरी येते, याची उत्सुकता लागली आहे. उद्या सर्व संतांच्या पालख्या पंढरीत विसावणार आहेत.

सोहळ्यात आज 
पहाटे माउलींना काकडा आणि पूजा.
नामदेव महाराज स्वागतासाठी निरोप घेऊन येणार.
पुरंदरे मळा येथे पालखी भाटे यांच्या रथात ठेवणार.
इसबावीत सोहळ्याचे तिसरे उभे रिंगण.
पंढरपुरात प्रवेश.

(शब्दाकंन - विलास काटे)

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: wari news sant dnyaneshwar maharaj palkhi sohala