अभिनयाशी निष्ठा 

शिवानी रांगोळे आणि सिद्धार्थ चांदेकर 
Saturday, 12 December 2020

‘सांग तू आहेस ना?’ या मालिकेत दिसत आहेत. शिवानी आणि सिद्धार्थची ओळख ५-६ वर्षांपासूनची. एका ब्युटी कॉंटेस्टमध्ये शिवानी स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती, तर सिद्धार्थ तिथं परीक्षक म्हणून आला होता.

अभिनेत्री शिवानी रांगोळे आणि अभिनेता सिद्धार्थ चांदेकर हे आजच्या तरुण पिढीतल्या आघाडीच्या कलाकारांपैकी दोघं. सध्या ते ‘सांग तू आहेस ना?’ या मालिकेत दिसत आहेत. शिवानी आणि सिद्धार्थची ओळख ५-६ वर्षांपासूनची. एका ब्युटी कॉंटेस्टमध्ये शिवानी स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती, तर सिद्धार्थ तिथं परीक्षक म्हणून आला होता. ती त्यांची पहिली भेट. त्यानंतर दोघंही गोरेगावमध्ये राहत असल्यानं आणि बराचसा मित्र परिवार सारखा असल्यानं आमच्या नेहमी भेटी व्हायच्या- त्यामुळं आमची मैत्री आणखी घट्ट झाली असं सिद्धार्थनं सांगितलं. सिद्धार्थच्या या म्हणण्याला शिवानीनंही दुजोरा दिला. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सिद्धार्थ माणूस म्हणून आणि एक अभिनेता म्हणून कसा आहे, असं विचारल्यावर शिवानी म्हणाली, ‘‘सिद्धार्थ हा कुठल्याही गोष्टीकडं सकारात्मक दृष्टीनं बघणारा मुलगा आहे. तो सगळ्यांना सामावून घेतो. तो फार गप्पिष्टही आहे. सगळ्यांशी तो भरपूर गप्पा मारतो. सतत आनंदी आणि एनर्जीनं भरलेला असतो तो. सकाळी सहाची शिफ्ट असो, नाहीतर रात्री उशिरा पॅकअप झालेलं असो, त्याच्यातला उत्साह जसाच्या तसा असतो. आणि तो तीच एनर्जी घेऊन सेटवर वावरत असल्यानं आम्हा सगळ्यांमध्येही तो उत्साह संचारतो. आम्ही भरपूर मजा मस्ती करत असतो सेटवर, आमच्या जोडीला सानियाही असते. परंतु काम करण्याच्या वेळी तो अतिशय फोकस्ड आणि त्याचं १०० टक्के देऊन काम करतो. आपल्यासोबतच सहकलाकाराचंही काम कसं छान होईल याकडंही तो लक्ष देतो. मालिकेमध्ये सिद्धार्थ स्वराज जोशी ही भूमिका साकारतोय, परंतु वास्तवात सिद्धार्थ हा अजिबात स्वराजसारखा गंभीर आणि शांत नाही.’’ 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सिद्धार्थनं शिवानीच्या स्वभावाविषयी सांगितलं, ‘‘शिवानी खूप शिस्तबद्ध मुलगी आहे. ती एकटी राहते मुंबईत आणि सकाळी शूटला येण्यापूर्वी ती घरातलं सगळं आवरून, स्वतःचा डबा बनवून, चार कामं करून येते. हा तिच्यातला गुण मला फार आवडतो. तिला वाचनाची प्रचंड आवड आहे. दोन सीन्समध्ये अगदी १० मिनिटांचा वेळ असला, तर तेवढ्यात तिची तीन पानं वाचून झालेली असतात. अशा विद्युत वेगानं ती पुस्तकं वाचते. आतापर्यंत तिनं साकारलेल्या भूमिका बऱ्यापैकी गंभीर होत्या, पण खऱ्या आयुष्यात शिवानी खूप मजा मस्ती करणारी आणि हसतमुख मुलगी आहे. ती खूप हुशार अभिनेत्री आहे, ती खूप उत्स्फूर्त आहे, तिच्यात एक स्पार्क आहे. तिनं ‘डबल सीट’ चित्रपटात साकारलेली भूमिका मला विशेष आवडली. त्यात तिचा छोटासा रोल असला, तरी त्या वेळात ती आपलं लक्ष वेधून घेते. आपल्याला शिवानीबरोबर काम करायचं आहे हे कळल्यावर मला खूप आनंद झाला होत.’’ 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

(शब्दांकन : गणेश आचवल) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article about Actress Shivani Rangole actor Siddharth Chandekar