माझिया माहेरा : समृद्ध आठवणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माझिया माहेरा : समृद्ध आठवणी

जिथे आपला जन्म झाला, जिथे आपण वाढलो, त्या जन्मभूमीला आपण विसरू शकत नाही. माझ्या माहेराला मी विसरू शकत नाही.

माझिया माहेरा : समृद्ध आठवणी

- अपूर्वा आपटे, पुणे

जिथे आपला जन्म झाला, जिथे आपण वाढलो, त्या जन्मभूमीला आपण विसरू शकत नाही. माझ्या माहेराला मी विसरू शकत नाही. माझा जन्म मुंबईचा. मे महिन्याच्या व दिवाळीच्या सुटीत आम्ही मामाकडे पुण्याला येत असू व सासरही पुण्यातच मिळाले.

माझा जन्म मुंबईच्या चाळीत झाला. आमची चाळ म्हणजे गिरगावातील ‘ताराबाग.’ ए, बी, सी, डी, ई अशा पाच चाळी व एका चाळीत नव्वदच्या आसपास बिऱ्हाडे. एक गावच ताराबागेत वसले आहे. पुण्यातील सदाशिव पेठ तसे मुंबईतील गिरगाव, त्यामुळे मराठी कुटुंबांचा संगम होता. मालक गुजराती असल्यामुळे चाळीचे नाव ‘ताराबाग.’

आम्ही चौथ्या मजल्यावर राहत होतो. आमच्या मजल्यावर २२ बिऱ्हाडे. मध्ये प्रशस्त चौक होता. बारा लोकांसाठी चार स्वच्छतागृहे होती. पहाटे पाच वाजता पाणी यायचे व सकाळी आठ वाजता जायचे. त्यानंतर पाणी नाही.

आमच्या मजल्यावर गणपती बसायचा. रोज गणपतीची आरती व्हायची. ऐकून-ऐकून सर्व आरत्या- अगदी दशावतारी आरतीसुद्धा आजही तोंडपाठ आहे. भोंडला नऊ दिवस असायचा, त्यामुळे त्यातील गाणी तोंडपाठ आहेत. पहाटे पाच वाजेपर्यंत मंगळागौर खेळली आहे. संक्रांतीचे, चैत्रगौरीचे हळदीकुंकू, नागपंचमी सर्व अनुभवले आहे.

चौकात एका वेळेला दहा-बारा मुले आम्ही सहज जमत असू. कॅरम, पत्ते, गोट्या, बाटलीची बुचे, पिनपिन, लपंडाव, सागरगोटे, भोवरे सगळे खेळ खेळले आहेत. तीनचाकी स्कूटर, सायकल अशी वाहने घेऊन आम्ही बाहुला-बाहुलीची वरात काढली होती व चौकात लग्नाची पंगत बसली होती.

घर मध्यवर्ती असल्यामुळे चौपाटी, बालभवन, तारापोरवाला, मत्सालय, राणीची बाग, म्हातारीचा बूट, गेट वे ऑफ इंडिया सगळे जवळ होते. माझे वडील लहानपणीच वारले. आई व आम्ही तिघी बहिणी असे आमचे जीवन होते. ताराबागेतील शेजाऱ्यांमुळे आम्हाला वडिलांची उणीव कधी भासली नाही. कोणाकडेही आम्ही खेळायला जात होतो. गणपती उत्सवात नाटक, नृत्य इत्यादी सांस्कृतिक कार्यक्रम व्हायचे.

चाळीच्या मालकाचा वाढदिवस असला, की पडद्यावर चित्रपट दाखवला जायचा.

मुंबईत टीव्ही आला, तेव्हा जिथे टीव्ही तिथे आम्ही लहान मुले कार्यक्रम बघायला जायचा. बस व लोकल सार्वजनिक वाहतूक पुण्यापेक्षा फार सुरेख होती.

आता आईचे निधन झाले व ताराबागेत आमचे घरही उरले नाही. एकदा ताराबागेत जायचा योग आला, तेव्हा आम्ही एकीकडे चहा, एकीकडे फराळ, तर एकीकडे जेवलो. मुंबई सर्वांना सामावून घेते.

घरोघरी काम करणारे कोकणातील चाकरमानी गडी आमच्या चौकात वळकट्या टाकून झोपायचे व स्टोव्हवर भात टाकून, भात खाऊन दिवसभर काम करायचे. दहीहंडीला रात्री बारा वाजता हंडी फोडायचे. कोकणातील शंकासूर, बाला डान्स इत्यादी खेळही करायचे.

असे वाटते, पुन्हा लहान व्हावे. ताराबागेत जावे. चौकातून घरी जावे व डोळे भरून वास्तू पाहावी. तिला स्पर्श करावा. वात्सल्य अनुभवावे. वास्तू तथास्तूच म्हणेल.

Web Title: Apurva Aapate Writes Majhia Mahera Pune

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :puneMumbaiWomens Corner
go to top