esakal | पालकत्व निभावताना... : आई पुढील वर्षी वाढदिवस साजरा करू !
sakal

बोलून बातमी शोधा

Parenting

कोकणातून वाढदिवसाच्या निमित्ताने येतात आणि तो झाला की, प्रणिताला गावी घेऊन जातात. दरवर्षीचा हा शिरस्ता. तिलाही गावी जायला खूप आवडायचे. कारण मनसोक्त आंबे खात नारळी-पोफळीच्या बागेत मनासारखे खेळता यायचे. एप्रिलच्या मध्यावर वाढदिवस असल्याने प्रणिताला शाळेत कधीच वाढदिवस साजरा करता आला नाही. सुटी लागल्याने जिवलग मैत्रिणी बाहेरगावी गेलेल्या असायच्या. यावर्षी मात्र सातवीतून आठवीत जाताना मोठा वाढदिवस साजरा करण्याचे तिने मनोमन ठरविले होते आणि तशी कल्पना आई-बाबांना दिली होती.

पालकत्व निभावताना... : आई पुढील वर्षी वाढदिवस साजरा करू !

sakal_logo
By
आशिष तागडे

कोकणातून वाढदिवसाच्या निमित्ताने येतात आणि तो झाला की, प्रणिताला गावी घेऊन जातात. दरवर्षीचा हा शिरस्ता. तिलाही गावी जायला खूप आवडायचे. कारण मनसोक्त आंबे खात नारळी-पोफळीच्या बागेत मनासारखे खेळता यायचे. एप्रिलच्या मध्यावर वाढदिवस असल्याने प्रणिताला शाळेत कधीच वाढदिवस साजरा करता आला नाही. सुटी लागल्याने जिवलग मैत्रिणी बाहेरगावी गेलेल्या असायच्या. यावर्षी मात्र सातवीतून आठवीत जाताना मोठा वाढदिवस साजरा करण्याचे तिने मनोमन ठरविले होते आणि तशी कल्पना आई-बाबांना दिली होती. आई रेखानेही पूर्वकल्पना मिळाल्याने आधीपासूनच तयारी सुरू केली होती. मार्चमध्ये अचानक उद्‌भवलेल्या परिस्थितीमुळे रेखा जरा चिंतित झाली. दोन-चार आठवड्यात परिस्थिती निवळेल आणि प्रणिताचा वाढदिवस साजरा करता येईल, अशी तिला आशा होती. प्रत्यक्षात मात्र वेगळेच घडले.

अर्थात, प्रणिता नाराज होऊ नये म्हणून रेखाने तयारी मात्र सुरूच ठेवली होती. प्रणिताने उत्साहाने मैत्रिणींना फोन केले. परंतु दुसऱ्यांदा लॉकडाउन वाढल्याने रेखाची चिंता आणखी वाढली. तसे तिने नवऱ्यालाही बोलून दाखविले. आजी-आजोबा येणार नसल्याने प्रणिताचाही हिरमोड झाला होता. प्रणिताच्या मनाचा अंदाज घेण्यासाठी रेखाने वाढदिवसाचा विषय छेडला. सुरुवातीला प्रणिताने काहीच प्रतिक्रिया दिली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी जेवण झाल्यावर रेखा म्हणाली, ‘अगं, काय ठरविले आहेस वाढदिवसाचे. मी आता घरी आहे ना, तर तुझ्या आवडीचे पदार्थ करणार आहे. सकाळी आणि सायंकाळी दोन्ही वेळेस वेगवेगळे पदार्थ करते आणि हो, यू-ट्यूबवर पाहून छानसा केकही करते. तू सांग कशाचा केक करायचा. तूही मला मदत कर, म्हणजे माझ्याकडून केक चुकणार नाही.’ प्रणिताचा मूड नीट व्हावा म्हणून रेखा बोलून गेली. 

आईचे बोलणे ऐकून घेतल्यानंतर प्रणिताने बॉंबच टाकला. ती म्हणाली, ‘आई, या वर्षी वाढदिवस साजराच केला नाहीतर मी लहान होणार आहे का?’
या वाक्‍याने रेखा बुचकाळ्यात पडली. जरा सावरत ती म्हणाली, ‘अगं, असं का बोलतेस. आपण करू ना छानसा वाढदिवस साजरा.’ प्रणिता शांत स्वरात ठामपणे उत्तरली, ‘आई, आताची परिस्थिती खरंच वाढदिवस साजरा करण्यासारखी आहे का? आणि एक वर्ष वाढदिवस साजरा न केल्याने मी काही लहान होणार नाही.

आई, तू काल विचारल्यापासून माझ्या मनात एक विचार येत आहे, यावर्षी वाढदिवसाच्या निमित्ताने नवीन कपडे आणता येणार नाही. कोणाला बोलावता येणार नाही, त्यामुळे बऱ्यापैकी पैसे वाचतील. ते पैसे आपण कोरोनाग्रस्तांना मदत करणाऱ्या संस्थेला देऊ यात का? वाढदिवस काय पुढील वर्षीही साजरा करता येईल आणि या वर्षी चक्क तू घरी केक करणार आहेस, यापेक्षा अधिक मला काहीच नको.’ क्षणभर रेखा दिगमुढ झाली. आपण तिची आई का, तीच आपली आई हेच तिला समजेना! आई आणि लेकीचे संभाषण ऐकताना डोळे कधी पाणावले हे बाबांना समजलेही नाही. आपली लेक मोठीच नाहीतर ‘मॅच्युअर’ झाल्याचे लक्षात आल्याने दोघांनीही प्रणिताला आलिंगन देत मनाचा बांध डोळ्यांवाटे मोकळा केला.

loading image
go to top