पालकत्व निभावताना... : घराबाहेर पडण्याची धांदल...

आशिष तागडे
Sunday, 7 June 2020

‘आई, मी जरा रवीकडे जाऊन येतो...’’ आदित्यच्या या विचारण्यावजा सांगण्यावर काय उत्तर द्यावे हेच शुभांगीला समजेना. आदित्यने यंदा दहावीची परीक्षा दिलेली. वर्षभर त्याने अवांतर गोष्टी बाजूला ठेवत चांगल्या पद्धतीने अभ्यास केला होता.

‘आई, मी जरा रवीकडे जाऊन येतो...’’ आदित्यच्या या विचारण्यावजा सांगण्यावर काय उत्तर द्यावे हेच शुभांगीला समजेना. आदित्यने यंदा दहावीची परीक्षा दिलेली. वर्षभर त्याने अवांतर गोष्टी बाजूला ठेवत चांगल्या पद्धतीने अभ्यास केला होता. प्रिलिमची परीक्षा झाल्यावरच त्याने आई-बाबांना मुख्य परीक्षा झाल्यावर आम्ही चार-पाच मित्र ट्रिपला जाणार असल्याचे सांगितले होते, मात्र प्रत्यक्षात घडले वेगळेच. शेवटचा भूगोलाचा पेपरच रद्द झाल्यामुळे मित्रांमध्ये नाराजी होती, त्यात आता सरासरी गुण मिळणार असल्याने आणखीनच भर पडली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

लॉकडाउनमुळे घरातच बसावे लागल्याने सर्व मित्रही वैतागले होते. प्रत्यक्ष भेटून गप्पा, चेष्टा-मस्करीची मजा फोनवर येत नसल्याने निर्बंध शिथिल झाल्यावर सर्वांनी भेटण्याचा प्लॅन केला. आदित्यने ‘बाहेर जाऊ का?’ असे विचारण्याऐवजी ‘रवीकडे जाऊन येतो,’ असे सांगितल्याने शुभांगीने आदित्यचा कल समजून घेत, ‘‘अरे, अगदी जायलाच पाहिजे का?’’ असे विचारून नवऱ्याकडे पाहत म्हणाली, ‘‘अहो, तुम्हीतरी समजावून सांगा.’’ बाबांचे उत्तर यायच्या आत आदित्य म्हणाला, ‘‘परीक्षा झाल्यापासून दोन महिने घरातच बसून आहे ना? बाहेर, अगदी सोसायटीच्या आवारात तरी गेलो का?’’ ते खरेही होते. मध्यस्थाच्या भूमिकेतून बाबा म्हणाले, ‘‘अरे, तुझे बरोबर आहे. पण परिस्थिती काय सांगून येती का? आणि इतके दिवस घरात थांबलाच आहे, तर अजून एखाद्या आठवड्याने काय फरक पडणार आहे?’’

आपला बाहेर जाण्याचा मुद्दा आदित्यने सोडला नव्हता. तो म्हणाला, ‘‘बाबा, आपण आणि रवी राहतो तो भाग कन्टेन्टमेंट झोनमध्ये नाही, म्हणून आम्ही भेटायचे ठरविले आहे.’’ त्यावर शुंभागी म्हणाली, ‘‘अरे, तो कोरोना की फोरोना काय कन्टेन्टमेंट झोनचा पत्ता विचारत फिरतो का? आपण थोडी सबुरी दाखवून काळजी घ्यायला नको का?’’ आता मात्र आदित्य इरेलाच पेटला. तो म्हणाला, ‘‘आई, मी दोन-अडीच महिने घरात राहूनही तू सबुरी दाखव म्हणत आहे. अगं, मी बाहेर जातोय म्हणजे काही काळजी घेणार नाही, असे कसे तुम्हाला वाटले. मी तसाही सायकलवरच जाणार असून चेहरा पूर्णपणे झाकणार आहे. आणि आम्ही मित्र भेटल्यावर एकमेकांना नेहमीप्रमाणे देतो तशा टाळ्याही देणार नाहीत. पूर्ण सोशल डिस्टन्सिंग पाळूनच आम्ही भेटणार आहोत. कोणाच्या घरात तर जाणारच नाहीत. रवीच्या सोसायटीच्या जवळ असलेल्या नाना-नानी पार्कमध्ये भेटणार आहोत. केवळ गप्पाच नाही मारणार, त्याबरोबर करिअरसाठी आता कोणते पर्याय आहेत यावरही चर्चा करणार आहोत.’’

‘अरे हो,’’ आपले विरोधाचे एक पाऊल मागे घेत शुभांगी म्हणाली, ‘‘त्यासाठी भेटणे गरजेचेच आहे का? फोनवरही बोलता येऊ शकते.’’ त्यावर आदित्य म्हणाला, ‘‘आई, आम्ही अगदी अर्ध्या-पाऊण तासासाठी सर्व खबरदारी घेऊन भेटणार आहोत.’’ आदित्यचा निर्धार पाहून त्याला योग्य खबरदारी घेऊन रवीकडे जाण्याला परवानगी देण्याशिवाय आई-बाबांकडे दुसरा पर्यायच नव्हता...सोशल डिस्टंन्सिंग हे प्रत्येकाच्या आयुष्यात प्रथमच आले आहे. ते पचनी पडणे अवघडच. कितीही व्हिडिओ कॉल केले तरी प्रत्यक्ष भेटण्याची मजा काही औरच ना...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article aashish tagade on parenting

Tags
टॉपिकस
Topic Tags: