Parenting
Parenting

पालकत्व निभावताना... : आखाड तळताना...

तिखटाच्या पुऱ्या म्हणजे मुक्ताचा जीव की प्राण. महिन्यातून एकदा तरी त्या झाल्याच पाहिजे, हा तिचा अलिखित दंडक. सीमानेही पोरीचा हा दंडक मोडलेला नाही. कधीही सहलीला, अगदी छोट्याही, मुक्ता जाणार असल्यास इतर खाऊबरोबर पुऱ्या असायच्याच. दोन दिवसांपूर्वीच सीमाने घरात घोषणा केली की, या महिन्यात एका मुलीला तिखटाच्या पुऱ्या दोनदा खायला मिळणार आहेत. आईच्या ब्रेकिंग न्यूजमुळे मुक्ताचा चेहरा फुगलेल्या पुरीइतका प्रफुल्लित झाला.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

तिने फार अंदाज न लावता आईला तिखटाच्या पुऱ्यांचा बेत कशासाठी करणार म्हणून विचारले. त्यावर मुक्ताची उत्सुकता फार न ताणता सीमा म्हणाली, ‘अगं वेडाबाई, येत्या रविवारी घरात आखाड तळणार आहे. दिव्याची आमावस्या आहे ना!’ आषाढ महिना असतो हे माहीत होते, मात्र आखाड तळणे ही काय भानगड आहे आणि त्याचा आपल्या आवडत्या तिखट पुऱ्यांशी काय संबंध, असे अनेक प्रश्‍न चेहऱ्यावर ठेवून मुक्ता आईकडे पाहायला लागली. सीमाला हे लक्षात आले. ती म्हणाली, ‘विसरलीस का, दरवर्षी आपण आखाड तळतो आणि त्याचा नैवेद्य शितळादेवीला दाखवायला घेऊन जातो. गेल्यावर्षी तुला तेथूनच शाळेत सोडले होते.’ मुक्ताची ट्यूब आता पेटली. ‘हो खरंच आई, आता आठवले. दरवर्षी वारीनंतर तू आखाड तळत असते. यावर्षी ना वारी ना शाळा, त्यामुळे लक्षातच आले नाही. अगं आई, आखाड तळणे म्हणजे काय आणि त्याचा शितळादेवीलाच का नैवेद्य दाखवायचा,’ मुक्ताने आईला विचारले. 

‘बाई गं. मला कामे आहेत आणि तुझ्या प्रश्‍नांची समाधानकारक उत्तरे देणे मला शक्य नाही. तू असं कर, आजीलाच विचार. आणि हो तिला फार भंडावून सोडू नकोस.’ मुक्ताने सरळ आजीकडे जात प्रश्‍नांची सरबत्ती तिच्यासमोर मांडली. तिला शांत करत आजी म्हणाली, ‘हो हो...किती प्रश्‍न विचारशील. अगं, हा आपल्या रूढी परंपरांचा भाग आहे. या लोक संस्कृतीतील देवता आहेत. त्यांना पुरण, तळण असा नैवेद्य दाखविण्याचे संकेत रूढ आहेत. श्रावण महिन्यात सर्व व्रत-वैकल्य असल्याने आषाढात हे सर्व करतात.

त्यानंतर चातुर्मास पाळला जातो. त्याला शास्त्रीय आधार आहे. पावसाळी हवेत पचनशक्ती मंदावलेली असते. त्यामुळे दोन्ही वेळचे जेवण, जड पदार्थ सहज पचत नाहीत. साहजिकच पचनाच्या तक्रारी निर्माण होतात. त्यामुळे या दिवसांत आहार मर्यादित असणे गरजेचे ठरते. दिव्याची आज अमावास्या, दिवे घासून पुढील सणावाराला तयार केले जातात. दिवे सजवून लावून त्यांना लाह्या, फुटाणे वाहतात. याचे कारण दिव्यांचा प्रकाश प्रत्येकाच्या मनातील अंधःकार दूर करून उजेडाकडे वाटचाल करण्यासाठी आपण सज्ज झालो. काळाच्या ओघात काही गोष्टी बदलत्या आहेत, तरी आपले संस्कार आणि परंपरा यांची आधुनिकतेला सांगड घालत आपण पुढे जायचे, हो ना मुक्ताबाई?’

आजीच्या बोलण्याने मुक्ताच्या डोक्यात एक कल्पना आली. ती आजीला म्हणाली, ‘आजी, आज मी दिवे घासते.’ मुक्ताच्या या निर्धाराने यंदाचा आखाड कामाला आला, अशीच भावना सीमा आणि तिच्या सासूबाईंच्या चेहऱ्यावर होती.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com