पालकत्व निभावताना : वर्क फॉर होम!

Papad
Papad

दुपारची वेळ होती. अवनी घरातील काम आटोपून ऑफिसच्या कामासाठी लॅपटॉप उघडणार, तोच शरयू पळत येत म्हणाली, ‘‘आई, मला बोअर होतंय, काही तरी खायला दे.’

अवनीनं दहाच मिनिटांपूर्वी शरयूला पोटभर खायला दिलं होतं. त्यामुळं आता केवळ करमत नाही म्हणून तिला भूक लागल्यासारखं झालं असल्याचं अवनीच्या लक्षात आलं. अवनी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर चार दिवसांपासून ‘वर्क फ्रॉम होम’ करत होती. त्यामुळं घराबरोबर ऑफिसकडंही लक्ष देता येतं, याचं तिला समाधान होतं. वर्क फ्रॉम होमचा निर्णय झाल्यापासून तिनं आपल्या लाडक्‍या शरयूसाठी काय काय आवडीचे पदार्थ करता येतील याची यादीच तयार केली होती. सासरे गेल्यापासून सासूबाईंनाही घरात एकटं वाटत होतं. त्यांच्याशी मनसोक्त गप्पा मारण्याचा प्लॅनही तिनं केला होता आणि सुरुवातही तशीच केली. पहिल्या दिवशी मस्तपैकी इडली केली. सासूबाईंना शेजारी उभं करून त्या करतात तसं दाक्षिणात्य पद्धतीचं सांबारही तिनं शिकून घेतलं. सासूबाईंनाही त्यामुळं बरं वाटलं. कधी नव्हे ती नवऱ्यानं भाजी आणली होती. पालक, मेथी, गवार, कोथिंबीर अगदी शांतपणे निसून ठेवण्यातील आनंद शोधत एक दिवस पालकाचे पराठे, एक दिवस मेथीचे पराठे आणि एक दिवस मस्तपैकी पालकभजी आणि केळी घालून मऊसूत शिरा करायचा प्लॅनही आखला होता. चार दिवसांत आईच्या हाताचे वेगवेगळे पदार्थ पोटात जात असल्यामुळं शरयू भलतीच खूष होती. आपल्या आईला एवढे पदार्थ करता येतात, याचं अप्रूप तिच्या चेहऱ्यावर दिसत होतं. ते टिपत अवनी म्हणाली, ‘‘माझ्या आईनं खूप पदार्थ मला शिकविले आहेत. ते आता तुला करून घालणार आहे.’’

सासूबाईंकडं वळत अवनी म्हणाली, ‘‘आई, जरा वेळ आहे, तर यावेळी आपण वाळवण घरीच करूयात. तुम्ही सांगा त्याप्रमाणं सगळे पदार्थ करू’’ अवनीच्या या वाक्‍यानं सासूबाई भलत्याच आनंदित झाल्या. ‘अगं, आपण साबुदाण्याच्या पापड्यांपासून सुरुवात करू त्यानंतर साबुदाण्याच्या चकल्या, तिखटाच्या पापड्या आणि हो शक्‍य असल्यास गव्हाच्या कुरडयाही करू...’ 

सासूबाईंच्या उत्साह पाहून अवनी कामाला लागली. लागलीच साबुदाणा, गहू भिजवायला स्वयंपाक घरात शिरली. या निमित्तानं शरयूलाही कच्च्या पापड्या, त्यासाठी केलेला चीक खायला मिळेल आणि तिचं ‘बोअर’ होणे कमी होईल, हा विचार तिच्या मनात आला. आजीची आणि आईची कल्पना शरयूलाही आवडली. तिलाही या खाण्याविषयी खूप उत्सुकता होती. आजीबरोबर चार वर्षांपूर्वी गावी गेल्यावर तिथं हा मेवा तिनं खाल्ला होता. आता तो आपल्या घरी होणार याचा तिला आनंद होता. अवनीच्या पतीलाही ‘वर्क फ्रॉम होम’ ऑर्डर आल्यामुळं तोही या आनंदात सहभागी झाला. दुसऱ्या दिवशी लागलीच साबुदाण्याच्या पापड्या घालायचा यथासांग कार्यक्रम झाला. पापड्या कशा घालायचा याचं खास ‘ट्रेनिंग’ शरयूला देत असतानाच लहानपणी वाड्यात वाळवणाचा कसा मोठा कार्यक्रम असायचा, याचं रसभरीत वर्णन अवनीनं केलं होतं. उडदाचे पापड, त्याच्या लाट्या, शेजारच्या काकूंकडं पापड लाटायला गेले, की दहा पापड लाटल्यावर मिळणारी एक लाटी, गच्चीत वाळवण घातल्यानंतर त्याच्यावर लक्ष ठेवताना कोणाचं लक्ष नाही हे पाहून हळूच खालेल्या पापड्या, हे सांगताना अवनी बालपणाच्या आठवणीत रमली. खरंच कामाच्या रहाटगाडग्यात हा आनंद, समाधान आपण गमावूनच बसलो होतो, याची जाणीव तिला झाली. ‘वर्क फ्रॉम होम’ करताना ‘वर्क फॉर होम’ कधी सुरू झालं, हे तिला समजलंच नाही...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com