माझी आई ‘वंडरवुमन’ 

Anagha Bhagre,
Anagha Bhagre,

माझ्या आईचं नाव मोहिनी अतुल भगरे. अगदी एका शब्दात सांगायचं तर माझी आई वंडरवुमन आहे. ती शिक्षिका असून, तिला शिकण्याची खूप आवड आहे. बीएड केल्यानंतर तिनं शिक्षिकेची नोकरी स्वीकारली. शिक्षणाची आवड तिनं कायम जपली. या वर्षीच तिनं पत्रकारितेचं शिक्षणही पूर्ण केलं. या वयातही तिचा उत्साह तरुणांना लाजवेल असाच आहे.  

मी मध्यमवर्गीय कुटुंबात वाढले. माझे आई-बाबा दोघंही नोकरी करत असल्यामुळं लहानपणापासूनच आईनं मला स्वावलंबी बनवलं. आई-बाबांनी खूप कष्ट करून मला लहानाचं मोठं केलं. माझ्या आईला स्वयंपाक आणि स्वच्छतेची आवड आहे. त्यामुळं नोकरी आणि घर अशा दोन्ही जबाबदाऱ्या तिनं निगुतीनं पार पाडल्या. आईच्या हातची भरली वांगी आणि बाजरीची खिचडी मला प्रचंड आवडते. अगदी लहानपणीच तिनं मला स्वयंपाक करायलाही शिकवलं आहे. तिसरी-चौथीमध्ये असताना तिनं पाहुण्यांसाठी मला एकदा कोबीची भाजी बनवायला लावली होती. भाजी फार काही चांगली झाली नाही. मात्र, तिनं सर्वांना आवर्जून खायलाही लावली आणि माझं कौतुकही केलं.  

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

आई शाळेतही खूप सक्रिय असते. शाळेतली नाटकं बसवणं, त्याचं लेखन-दिग्दर्शन करणं ही सगळी जबाबदारी तिच्या खांद्यावर असते आणि ती ते आवडीनं करते. शाळेत कोणताही कार्यक्रम असला, तर आईच सूत्रसंचालनाची भूमिका पार पडते. आईचा हाच गुण माझ्यामध्येही आला आहे. आई शिक्षिका असल्यामुळं तिनं नेहमीच वक्तृत्व, वेशभूषा अशा सर्वच स्पर्धांसाठी मला प्रोत्साहन दिलं आहे. आईला खोटं बोलणं आणि खोटं वागणं अजिबात सहन होत नाही. त्याबाबतीत ‘चुकीला माफी नाही’ असा तिचा नियम आहे. तेच संस्कार तिनं माझ्यावर केले आहेत. मीदेखील चुकीची गोष्ट खपवून घेत नाही. तिला समाजसेवेची आवड आहे. आमच्या घरी घरकाम करणाऱ्या काकूंच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारीही तिनं घेतली आहे.  

‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेतली अभिनेत्री म्हणून माझी पहिलीच भूमिका. श्वेता या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळतं आहे. मात्र आई कौतुक करण्यासोबतच माझ्या चुकाही सांगते. डायलॉग कसा घ्यायला हवा... कसं व्यक्त व्हायचं, या छोट्या-छोट्या गोष्टींसाठी तिची नेहमीच मदत होते. आईनं शिकवलेल्या स्वावलंबणाचा मला अभिनय क्षेत्रासाठी खूप उपयोग होतो. मी मूळची नाशिकची; मात्र चित्रीकरणासाठी मुंबईलाच असते. आईच्या पाठिंब्यामुळेच मला हे बळ मिळालं आहे. 

(शब्दांकन : अरुण सुर्वे) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com