एक ‘बिटरस्वीट’ गोष्ट  | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

smita-akshya

या चित्रपटाची कथा महाराष्ट्रातील एका सत्यघटनेवर आधारित आहे. ऊसतोड कामगार महिलांच्या व्यथा आणि त्यांचे समाजाकडून होणारे शोषण हा या चित्रपटाचा विषय आहे. या चित्रपटात ‘सगुणा’ नावाच्या नायिकेची कथा आहे.

एक ‘बिटरस्वीट’ गोष्ट 

भारतीय चित्रपटसृष्टीसाठी एक अतिशय आनंदाची गोष्ट ही, की बुसान आंतरराष्ट्रीय महोत्सवासाठी मराठी चित्रपट ‘बिटरस्वीट’ चित्रपटाची निवड झाली आहे. या चित्रपटाची कथा, पटकथा, दिग्दर्शन आणि संकलन अनंत महादेवन यांचे असून महेंद्र पाटील यांनी या चित्रपटाचे संवादलेखन केले आहे. या चित्रपटाची निर्मिती सुछंदा चॅटर्जी आणि शुभा शेट्टी यांनी केली आहे. या चित्रपटाची कथा महाराष्ट्रातील एका सत्यघटनेवर आधारित आहे. ऊसतोड कामगार महिलांच्या व्यथा आणि त्यांचे समाजाकडून होणारे शोषण हा या चित्रपटाचा विषय आहे. या चित्रपटात ‘सगुणा’ नावाच्या नायिकेची कथा आहे. सगुणाच्या भूमिकेत अभिनेत्री अक्षया गुरव आहे, तर तिच्या आईची भूमिका केली आहे स्मिता तांबे या अभिनेत्रीने. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

स्मिता तांबे आणि अक्षया गुरव यांची पहिली भेट झाली होती ती ‘बिटरस्वीट’ या चित्रपटाच्या संहितावाचनाच्या वेळी. स्मिता म्हणते, ‘‘मला अजूनही आठवतंय, की अक्षया पंजाबी ड्रेस परिधान करून आली होती. तिला बघून मला दहा वर्षांपूर्वीची मीच आठवले. अक्षया संहितावाचनात पूर्ण गुंतून गेली होती. तिच्यातील साधेपणा मला आवडला होता.’’ 

अक्षया म्हणते, ‘‘बिटरस्वीट या चित्रपटामुळे मला स्मिताताईकडून खूप शिकायला मिळणार होते. एवढी मोठी अभिनेत्री या शूटिंगच्या प्रोसेसमध्ये माझी स्मिताताई झाली. चित्रपटात आमचे नाते आई मुलीचे आहे. मी ‘सगुणा’ची भूमिका करत आहे. सगुणा ही शहरात हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेत असते; पण काही कारणास्तव तिला पुन्हा गावात येऊन ऊस तोडणी कामगाराचे जीवन जगावे लागते, अशी ही भूमिका आहे.’’ 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

स्मिता तांबे या संदर्भात म्हणते, ‘‘मुळात या चित्रपटात काम करताना ज्या प्रांतात ही कथा घडते, तिथल्या भाषेवर मेहनत घेणे खूप महत्वाचे होते. ऊसतोड महिला कामगारांना काय समस्यांना सामोरे जावे लागते, अशावर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. दिग्दर्शक, कथा, पटकथालेखक अनंत महादेवन यांचे मोलाचे मार्गदर्शन मला ही भूमिका साकारताना झाले, म्हणजे कथेचा गाभा अनंत महादेवन यांनी उत्तम मांडला, तर संवादातून महेंद्र पाटील यांनी तो उत्तम फुलवला.’’ 

अक्षयाला स्मिताने साकारलेल्या सर्वच भूमिका आवडतात. ‘जोगवा’, ‘पंगा’ अशा चित्रपटांतील स्मिताने केलेल्या भूमिका अक्षयाला आवडल्या आहेत. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील चित्रपट यावर स्मिताचा असलेला अभ्यास अक्षयाला प्रभावित करणारा ठरतो, असे ती सांगते. स्मिता म्हणते, ‘‘बिटरस्वीट चित्रपटाच्या शूटिंगच्या दरम्यान अक्षयातील चांगली अभिनेत्री मला उलगडत गेली. ती खूप प्रामाणिक आहे, एखाद्या भूमिकेसाठी प्रचंड मेहनत घेणारी आहे, हे मला जाणवलं.’’ 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

‘बिटरस्वीट’ चित्रपटाचे नामांकन ‘जिसेक’ पुरस्कारासाठीदेखील झाले आहे. प्रत्येक भारतीयासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. 

(शब्दांकन : गणेश आचवल)

loading image
go to top