निरागस मैत्रीची ‘टकाटक’ गोष्ट 

प्रथमेश परब - रितिका श्रोत्री 
Saturday, 19 December 2020

प्रथमेश परब आणि रितिका श्रोत्री यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घातली.हे दोघे पुन्हा एकदा एकत्र येत आहेत ते ‘डार्लिंग’ या चित्रपटातून. लवकरच हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.

बालकलाकार म्हणून मनोरंजन क्षेत्रात पदार्पण करत प्रथमेश परब आणि रितिका श्रोत्री यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घातली. ही जोडी ‘टकाटक’ या चित्रपटातून आपल्या सर्वांसमोर आली होती. आता हेच दोघे पुन्हा एकदा एकत्र येत आहेत ते ‘डार्लिंग’ या चित्रपटातून. लवकरच हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. या निमित्तानं रितिकानं त्यांच्या भेटीचा एक गमतिशीर किस्सा सांगितला. ती म्हणाली, ‘‘माझी आणि प्रथमेशची पहिली भेट एका कार्यक्रमादरम्यान स्टेजच्या विंगेत झाली. मी तेव्हा आठवीत होते आणि बालकलाकार म्हणून एक सिरीयल करत होते. प्रथमेशचा ‘टाईमपास’ हा चित्रपट नुकताच रिलीज झाला होता. त्या कार्यक्रमात त्याचा एक परफॉर्मन्स होता आणि काही कारणानं मी बॅकस्टेजला जात होते. त्यावेळी झालेली ती १-२ मिनिटांची भेट ही आमची पहिली भेट.’’ प्रथमेशने त्यांची ही भेट त्याला आठवत नाही, हे हसत हसत मान्य केलं. प्रथमेश म्हणाला, ‘‘आमची ही भेट फक्त रितिकालाच्याच लक्षात आहे. माझ्या आठवणीतली आमची पहिली भेट ही ‘टकाटक’च्या रीडिंगला झाली होती. त्यावेळी रितिका खूप शांत बसून सगळं ऐकत होती. त्यावेळी मला वाटलं, की ही इतकी शांत बसली आहे आणि हे पात्र अगदीच विरुद्ध आहे. परंतु तिनं उत्कृष्ट काम करत माझ्या मनातली ही शंका पुसून टाकली.’’ तर, ‘या भेटीच्या वेळी त्याच्याशी कसं वागू- बोलू हेच मला कळत नव्हतं- कारण ‘बालक पालक’, ‘टाइमपास’ असे चित्रपट करून तो स्टार झाला होता. हा कसा असेल बोलायला, तो आपल्याशी नीट बोलेल ना, किंवा मी त्याच्याशी कसं बोलू?’ असे प्रश्न रितिकाला पडल्याचं तिनं सांगितलं. 

आणखी लेख वाचण्यासाठी क्लिक करा

रितिकाच्या स्वभावाबद्दल बोलताना प्रथमेश म्हणाला, ‘‘रितिका खूप गुणी मुलगी आहे. अतिशय शांत, समजूतदार आहे. ती पटकन समोरच्याशी बोलायला जात नाही. परंतु एकदा का तिची समोरच्याशी गट्टी जमली, की मग ती कायमस्वरूपीच मैत्री होऊन जाते, तेव्हा ती मोकळेपणाने बोलते सगळं. शिवाय ती खूप ‘डाऊन टू अर्थ’ आहे. इतकं चांगलं काम ती करते; परंतु कधीही ते तिच्या चेहऱ्यावर आणि बोलण्यात तुम्हाला दिसणार नाही. अभिनेत्री म्हणून ती खूप चांगली आहे आणि मेहनत घेऊन काम करणारी मुलगी आहे. आपण तिला काही सांगितलं, की ते खूप छान प्रकारे समजून घेऊन ते आचरणात आणते; जे करणं सोपं नसतं.’’ 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

रितिकानं प्रथमेशविषयी सांगितलं, ‘‘प्रथमेश खूप उत्साही आणि उत्स्फूर्त आहे. तो नेहमी हसतमुख असतो आणि समोरच्यालाही हसवतो. शूटिंग करताना रात्रीचे दोन वाजले असतील, तरी त्याचे जोक्स संपत नाहीत. प्रथमेशला खूप छान वातावरणनिर्मिती करता येते. आजूबाजूचं वातावरण तो कायम आनंदी आणि उत्साही ठेवत असतो. तो सगळ्यांना सामावून घेतो आणि सर्वांशी तितक्याच प्रेमाने वागतो. अभिनेता म्हणून तर तो कमाल आहे, मी स्वतः त्याची फॅन आहे असं म्हणायलाही हरकत नाही.’’ 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

(शब्दांकन : राजसी वैद्य) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article about Prathamesh Parab & Ritika Shrotri friendship