esakal | मेमॅायर्स : माझे प्रेरणास्त्रोत
sakal

बोलून बातमी शोधा

Samruddhi-Kelkar

आईनं माझ्या कलागुणांना लहानपणापासूनच पाठिंबा दिला. खरंतर नृत्याला आजही पालक विरोध करतात, ही वस्तुस्थिती आहे. मात्र, आई-बाबांनी मला कधीच विरोध केला नाही.आई आजारी असतानाही माझ्याबरोबर सदैव राहत असे.

मेमॅायर्स : माझे प्रेरणास्त्रोत

sakal_logo
By
समृद्धी केळकर, अभिनेत्री

आईचं नाव काढलं, तरी माझ्या डोळ्यांत पाणी येतं. कारण, २०१५ मध्ये माझ्या आईचं आजारपणामुळं निधन झालं. मात्र, ती माझ्या हृदयात, मनात अन् प्रत्यक्ष श्‍वासात घर करून बसली आहे. ती या जगात नसली, तरी तिचं अस्तित्व मला क्षणाक्षणाला खुणावत असतं. अप्रत्यक्षरीत्या का होईना ती मला प्रत्येक गोष्टीत पाठिंबा देत असते. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आईनं माझ्या कलागुणांना लहानपणापासूनच पाठिंबा दिला. खरंतर नृत्याला आजही पालक विरोध करतात, ही वस्तुस्थिती आहे. मात्र, आई-बाबांनी मला कधीच विरोध केला नाही. आई आजारी असतानाही माझ्याबरोबर सदैव राहत असे. माझ्या नृत्याचा कार्यक्रम कुठेही असो... ती माझ्याबरोबर येत असे. आजारी असतानाही अन् झेपत नसलं, तरी तिनं कधीच माझ्याबरोबर येण्यास नकार दिला नाही. उलट, ती मला पाठिंबाच देत असे. बाबांनीही माझ्या कलागुणांना वाव देण्यासाठी कधीच विरोध केला नाही. आजकाल सर्वजण उच्चशिक्षण घेऊन डॉक्‍टर, इंजिनिअर हो, किंवा सरकारी नोकरी कर, असं सांगतात; पण कुटुंबीयांनी मला माझं करिअर निवडण्यासाठी पूर्ण स्वातंत्र्य दिलं. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

निवेदिता रानडे व लीना भोसले-शेलार यांच्याकडून मी नृत्याचे धडे घेतले. कथकमध्ये अलंकारची पदवी घेतली. तसेच, वेगवेगळे नृत्याचे प्रकार शिकले. आता मीही नृत्याचे प्रशिक्षण देत आहे. ज्यावर्षी आई गेली, त्याचवर्षी मी ऑडिशन्सही देण्यास सुरूवात केली. २०१५मध्ये ‘पुढचं पाऊल’ व ‘लेक माझी लाडकी’ या मालिकांमध्ये अभिनयाची संधी मिळाली. त्यानंतर लावणीवर आधारित असलेल्या ‘ढोलकीच्या तालावर’ या डान्स शोमध्येही मी सहभागी झाले. मात्र, या वेळी मला आईची खूपच आठवणं येत होती. कारण, आईलाही नृत्याची आवड होती अन् तिनं माझं नृत्य फुलण्यासाठी खूप प्रयत्न केले. डान्स शोनंतर ‘लक्ष्मी सदैव मंगलम’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारण्याची संधी मला मिळाली. आता मी ‘स्टार प्रवाह’ या वाहिनीवर ‘फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

खरंतर मी अभिनय क्षेत्रामध्ये येईन, असा विचार कधीच केला नव्हता; पण कुटुंबीयांनी साथ दिली. त्यामुळेच मी इथपर्यंत येऊन पोचले. आजही माझे बाबा अन् ताई मला खूप पाठिंबा देतात. चित्रीकरण केव्हाही संपू दे, बाबा घ्यायला येतात. माझ्यासाठी डबाही बनवतात. आईची कमतरता ते कधीच जाणवू देत नाहीत. मात्र, माझ्या अभिनयाची अन् नृत्याच्या करिअरची वाटचाल पाहण्यासाठी आई हवी होती. तिला हे सर्व पाहताना खूपच आनंद झाला असता; पण आपल्या हातात आठवणींपलीकडं काहीच असू शकत नाही, हे सत्य नाकारता येणार आहे. 
(शब्दांकन : अरुण सुर्वे)