esakal | मेमॉयर्स : माझी आई सुपरवुमन
sakal

बोलून बातमी शोधा

ankita panvelkar

आईविषयी किती अन्‌ काय बोलायचं! मुळात आपल्या आयुष्याची सुरुवात तिच्यापासून होते. तिच्यासमोर आपलं आयुष्य कोऱ्या पुस्तकासारखं असतं. ते कोरं पुस्तक उत्तमरीत्या भरायचं असतं. माझ्या आईनं माझं अन् माझ्या बहिणीचं पुस्तक नक्कीच उत्तमरीत्या भरलं आहे.

मेमॉयर्स : माझी आई सुपरवुमन

sakal_logo
By
अंकिता पनवेलकर, अभिनेत्री

आईविषयी किती अन्‌ काय बोलायचं! मुळात आपल्या आयुष्याची सुरुवात तिच्यापासून होते. तिच्यासमोर आपलं आयुष्य कोऱ्या पुस्तकासारखं असतं. ते कोरं पुस्तक उत्तमरीत्या भरायचं असतं. माझ्या आईनं माझं अन् माझ्या बहिणीचं पुस्तक नक्कीच उत्तमरीत्या भरलं आहे. कारण आम्ही दोघीही आई-बाबांमुळंच स्वतःच्या पायावर यशस्वीरीत्या उभ्या आहोत. बाबांची नोकरी बंदर खात्यात होती. आम्ही चौथीपर्यंत मुरूड-जंजिरा इथं राहत होतो. पण, आम्हाला चांगलं शिक्षण देण्यासाठी आईनं पुण्याला शिफ्ट होण्याचं ठरविलं.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

त्यामुळं स्वतःचं घर घेणं गरजेचं होतं. घर घेऊन आम्ही पुण्याला शिफ्ट झालो. खरंतर बाबा एका ठिकाणी नोकरी करत असताना आम्ही दुसऱ्या ठिकाणी राहणं, हा खूपच धाडसी निर्णय होता. तो आईनं घेतला. ती तिच्या मतावर ठाम राहिली. त्यामुळंच आम्ही दोघी बहिणी चांगलं शिक्षण घेऊ शकलो. खरंतर माझी आई माझ्यासाठी ‘सुपरवुमन’ आहे. तिच्यामध्ये सर्वच गुण आहे. माझं बाबांवरही प्रेम आहे, पण आईवर जरा जास्त. कारण, आम्ही पुण्यात शिफ्ट झाल्यानंतर आमचं शिक्षण, घराचे हप्ते व इतर जबाबदाऱ्याही होत्या. त्यासाठी तिनं नोकरीही केली. ती शिस्तप्रिय होती.

पण, कडक नव्हती. तिनं आमच्यावर कोणतीही बंधनं घातली नाहीत. त्यामुळं आम्ही कधीच चुकीचे निर्णय घेतले नाहीत. जे करायचं ते मनापासून करा, असं ती नेहमीच सांगायची. मला अभिनयामध्ये करिअर करायचं आहे, हे मी तिला सांगितल्यावर ती पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. कार्यशाळेमध्ये सहभागी होण्यासाठी ती स्वतः मला घेऊन गेली. तिच्यामुळंच मी अभिनयामध्ये चांगले करिअर करू शकले. सध्या तिच्यामुळेच मी ‘बाळूमामा’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे. 

आई माझा वीकपॉइंट तसंच, स्ट्राँगेस्ट सिस्टिमही आहे. ती नेहमीच म्हणते, ‘आई काय असते, ते आई झाल्याशिवाय कळत नाही.’ आज मी एका लहान मुलीची आई आहे. आता मला कळतंय, आईनं किती कष्ट घेतले आमच्यासाठी. तिचा स्वावलंबीपणा व नवरा-बायकोने एकमेकांना कसं धरून राहायचं, हे आईमुळेचं मी शिकले. ती कधीच कोणावर अवलंबून राहिली नाही. ती स्वतः गाडी शिकली. आता योगा करते. वेगवेगळे पदार्थ अतिशय उत्तमरीत्या बनविते.

प्रत्येक वेळेचा ती आता सदुपयोग करत आहेत. मी अभिनयाला सुरुवात केली, त्या वेळी मी पुणे-मुंबईला ये-जा करायचे. पण, हातामध्ये जास्त काम येऊ लागली, त्या वेळी पुणे-मुंबई करणं अवघड जाऊ लागलं. त्या वेळी ती म्हणाली, ‘आता मुंबईला जाणं गरजेचं आहे.’ त्या वेळी माझी मुलगी दहा ते अकरा महिन्यांची होती. तेव्हापासून जवळपास चार वर्षे माझी मुलगी श्रावी तिच्याकडंच राहिली. आईनं तिचं खूप छान पाहिलं. मी पुण्यात येत असे, त्या वेळी श्रावी खूप आनंदी राहायची. त्यामुळं मलाही खूप भरून येत असे. खरंतर आईमुळंच मी मुंबईत आनंदी राहून कामावर लक्ष केंद्रित करू शकले. माझ्या नवऱ्यानंही मला खूप सपोर्ट केला. त्यामुळं मी अभिनयात चांगला पाय रोवू शकले. 

शब्दांकन - अरुण सुर्वे

loading image
go to top