esakal | पालकत्व निभावताना... : मैत्रीचा हात...!
sakal

बोलून बातमी शोधा

Parenting

मुग्धा गेल्या रविवारपासून जरा नाराजच असल्याचे रेणुकाला जाणवलं. मुलीच्या नाराजीबाबत बोलतं करायला तिनं शुक्रवारी सहज प्रश्‍न केला, ‘बाईसाहेब काय बिनसलं?’ त्यावर ‘आई, तुम्हाला होते का मित्र,’ मुग्धाच्या या प्रश्‍नानं रेणुकाला आश्‍चर्याचा धक्का बसला. तो फार जाणवू न देता तिनं मुग्धाला विचारलं, ‘का गं तुला का आज हा प्रश्‍न पडला?’ त्यावर क्षणाचाही विलंब न करता मुग्धानं सांगितलं, ‘अगं, गेल्या रविवारी ‘फ्रेंडशिप डे’ होता ना आणि तो कसा साजरा करायचा याचं खूप प्लॅनिंग केलं, मात्र काहीच जमून आलं नाही.’ मुग्धानं गेल्याच वर्षी कॉलेज जीवनात पाऊल टाकल्यानं वर्षभरातील सर्व ‘डेज’बद्दल तिच्या मनात कमालीची उत्सुकता होती.

पालकत्व निभावताना... : मैत्रीचा हात...!

sakal_logo
By
आशिष तागडे

मुग्धा गेल्या रविवारपासून जरा नाराजच असल्याचे रेणुकाला जाणवलं. मुलीच्या नाराजीबाबत बोलतं करायला तिनं शुक्रवारी सहज प्रश्‍न केला, ‘बाईसाहेब काय बिनसलं?’ त्यावर ‘आई, तुम्हाला होते का मित्र,’ मुग्धाच्या या प्रश्‍नानं रेणुकाला आश्‍चर्याचा धक्का बसला. तो फार जाणवू न देता तिनं मुग्धाला विचारलं, ‘का गं तुला का आज हा प्रश्‍न पडला?’ त्यावर क्षणाचाही विलंब न करता मुग्धानं सांगितलं, ‘अगं, गेल्या रविवारी ‘फ्रेंडशिप डे’ होता ना आणि तो कसा साजरा करायचा याचं खूप प्लॅनिंग केलं, मात्र काहीच जमून आलं नाही.’ मुग्धानं गेल्याच वर्षी कॉलेज जीवनात पाऊल टाकल्यानं वर्षभरातील सर्व ‘डेज’बद्दल तिच्या मनात कमालीची उत्सुकता होती.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोणताही डे ती साजरा करायचीच. कॉलेज सुरू झाल्यावर पहिलाच फ्रेंडशिप डे असतो. गेल्या वर्षी तिनं जरा बुजतच डे साजरे केले. या वर्षी ‘फ्रेंडशिप डे’ जोरदार साजरा करण्याची इच्छा असताना कोरोनानं त्यावर पाणी फिरविलं. दररोज फोनवर यथासांग चॅटिंग सुरू असतानाही ‘फ्रेंडशिप डे’ एन्जॉय करता आला नसल्यामुळं खट्टू झालेल्या मुग्धानं सरळ आईलाच फ्रेंडशिपबाबत विचारणा केली. मुग्धाची अडचण रेणुकाच्या लक्षात आली. मागं कोठंतरी वाचलेलं तिला आठवलं, ‘मुलं वयात आली की त्यांचे पालक होण्याऐवजी मित्र व्हा.’ ही चालून आलेली संधी गमवायची कशाला, हा विचार करून रेणुकानं तयारी केली. मागच्या रविवारी नाही, निदान या रविवारी तरी लाडक्या मुलीला ‘फ्रेंडशिप’ ऑफर करूयात.

फ्रेडशिप ऑफर करायला ठरावीक दिवस थोडाच पाहिजे, हा विचार करून ती कामाला लागली. पाहता पाहता रविवार उजाडला. मुग्धा जरा उशिरानंच उठली. आपल्या उशीशेजारी छानसं ग्रिटींग आणि आवडता रव्याचा लाडू पाहून ती दचकलीच. आपल्या बेडवर हे कोणी आणून ठेवलं, या उत्सुकतेपोटी आईला फर्मास हाक मारली. रेणुका या हाकेचीच वाट पाहत होती. आई आल्याबरोबर मुग्धानं प्रश्‍नांची सरबत्ती सुरू केली. ‘कोणी दिले हं ग्रिटींग आणि रव्याचे लाडू?’  रेणुका तिला थांबवत म्हणाली, ‘अगं आज सकाळी तुझी एक मैत्रीण आली होती. तिनंच माझ्याकडं दिले आणि तुझ्या उशाशी ठेवायला सांगितले.’

‘अगं पण सांग ना, कोण होती ती आणि तिला कसं माहीत मला रव्याचे लाडू आवडतात ते आणि माझ्या कोणा मैत्रिणीची चित्रकलाही इतकी चांगली नाही. कोण होती....आई तू फार सस्पेंस ठेवू नकोस हं....’ बाहेर जाता येणार नसल्यानं वैतागलेल्या मुग्धाला अजून त्रास न देण्याच्या उद्देशानं रेणुका म्हणाली, ‘अगं, तू ओळखते त्या व्यक्तीला आणि तीही तुला चांगली ओळखून आहे. त्यामुळंच तिनं मैत्रीचा हात पुढं केला आहे...’ रेणुकाला थांबवत मुग्धा जरा चिडून म्हणाली, ‘आई, आता सांगणार आहेस की....’ तिला शांत करत रेणुका म्हणाली, ‘अगं वेडे, मीच ठेवले आहे. मायलेकी मैत्रीण असू शकत नाही का? ‘हॅप्पी फ्रेंडशिप.’ आईच्या या अनोख्या भेटीनं मुग्धाला काय बोलावं तेच सुचेना. आईला जोरात मिठी मारताना तिच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. तिला थोपटत रेणुका म्हणाली, ‘बाईसाहेब आवरा आता तुमच्यासाठी गरमागरम इडली-सांबारही तयार आहे...’

Edited By - Prashant Patil

loading image