esakal | पालकत्व निभावताना... : बाबा, पाणीपुरी करूयात का?
sakal

बोलून बातमी शोधा

Panipuri

‘बाबा, बाहेर सर्व बंद असल्याने पाणीपुरीचा स्टॉल दोन-अडीच महिने बंद आहे. बाहेरचे नक्कीच नाही खायचे. पण, तुम्ही रोज पोळी-भाजी खायला लावता, त्याने आता कंटाळा आलाय. काही चटपटीत होऊन जाऊदे का? मी मागत नाहीये म्हणजे मला समजते आहे, पण खावे वाटले तर घरी करून खाऊया ना. आपण घरी करू शकतो ना...का त्यालाही काही प्रॉब्लेम आहे?’’ निमिषाच्या या प्रश्‍नांच्या सरबत्तीला काय उत्तर द्यावे, हेच अजितला सुचेनासे झाले. 

पालकत्व निभावताना... : बाबा, पाणीपुरी करूयात का?

sakal_logo
By
आशिष तागडे

‘बाबा, बाहेर सर्व बंद असल्याने पाणीपुरीचा स्टॉल दोन-अडीच महिने बंद आहे. बाहेरचे नक्कीच नाही खायचे. पण, तुम्ही रोज पोळी-भाजी खायला लावता, त्याने आता कंटाळा आलाय. काही चटपटीत होऊन जाऊदे का? मी मागत नाहीये म्हणजे मला समजते आहे, पण खावे वाटले तर घरी करून खाऊया ना. आपण घरी करू शकतो ना...का त्यालाही काही प्रॉब्लेम आहे?’’ निमिषाच्या या प्रश्‍नांच्या सरबत्तीला काय उत्तर द्यावे, हेच अजितला सुचेनासे झाले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

निमिषाला बाहेर खाण्याची फारशी सवय नसली, तरी पाणीपुरी तिची फेव्हरेट होती आणि आठवड्यातून एकदा तरी बाप-लेक पाणीपुरी खायचेच. त्यांचा स्टॉलवालाही ठरलेला होता. निमिषाला सर्व गोष्टींची कल्पना दिल्याने तिने फार हट्ट केला नव्हता. मात्र, आता दुकाने काही प्रमाणात उघडायला लागल्याने तिने बाबाला गुगली टाकली होती.

बाबानेही लॉकडाउनच्या काळात पाणीपुरी खाल्ली नव्हती. या अनाहूत प्रश्‍नाने त्यालाही पाणीपुरी खाण्याची तीव्र इच्छा झाली होती. त्याने बायको स्नेहाला तसे सांगितले. त्यावर ती म्हणाली, ‘‘आताच दुकाने उघडत आहेत. लगेच बाहेरचे खाणे चांगले आहे का? ती निमिषा लहान आहे, तुम्हाला तरी लक्षात यायला पाहिजे ना? अजून काही दिवस 
पाणीपुरी न खाल्ल्याने पित्त बिघडणार आहे का?’’ स्नेहाच्या या वेगळ्या पवित्र्याने अजितला काय बोलावे याचा संभ्रम पडला. त्याच्या डोक्‍यात वेगळाच विचार होता आणि समोर काही वेगळेच आले. जरा सावरत स्नेहाला तो म्हणाला, ‘‘अगं, मी कोठे बाहेर जाऊन खायचे म्हणालो. घरी करूयात का, असे निमिषाने विचारले आहे आणि तसेही तिने कोठे बाहेरचे काही खाल्ले आहे?’’ ‘‘हो का,’’ असे म्हणत स्नेहा म्हणाली, ‘‘अहो, आताची परिस्थिती काय आणि तुम्ही काय विचारता?’’ ‘‘अगं घरी करायला काय हरकत आहे, तू फक्त रगडा शिजवून दे, बाकी आम्ही करतो.’’ ‘‘हे पाहा, काहीही करा, पण घरात पसारा मात्र करू नका. दोन-अडीच महिने तुमचे स्वयंपाकघरातील प्रयोग आणि त्यातून होणारा पसारा आवरता आवरता मला नाकीनऊ आले आहे. तुझ्या हाताला चव आहे, हे मान्य; मात्र पदार्थ केल्याबरोबर त्याचा मागचाही पसारा आवरा. बाकी तुम्हा बापलेकीला स्वयंपाकघरात काय धिंगाणा घालायचा तो घाला.’’ 

स्नेहाची परवानगी मिळताच अजितने ओळखीच्या दुकानातून पाणीपुरीच्या पुऱ्या तसेच पुदिना आणला. बाकी साहित्य घरात असल्याची खात्री केलेली होती. दुसऱ्या दिवशी निमिषाला मदतीला घेत अजित कामाला लागला. पाण्यासाठी पुदिना, कोथिंबीर, आलं, मिरची निमिषाकडून मिक्‍सरवर वाटून घेतले. दुसरीकडे अजितने कुकरला बटाटे, रगडा शिजवायला लावला. बाबा आज आपल्याला मदतीला घेत काहीतरी वेगळा पदार्थ करतो, याचे तिला प्रचंड कौतुक वाटायला लागले. 

‘बाबा, हे वाटून झाले, आता यात काय घालू म्हणून तिने विचारताच त्याने सर्व पदार्थ तिच्याकडून करून घेतला. काही वेळात पाणीपुरी तयार होताच पहिली पुरी बाबाच्या तोंडात टाकली आणि दुसरी पुरी अर्थातच आईच्या. निमिषाचे आईशी चांगले बॉंडिंग होते, मात्र दोन अडीच महिन्यांत तिचे बाबाशीही चांगले बॉंडिंग झाले होते. बाप-लेकीच्या या बॉंडिंगनंतर स्नेहाने स्वयंपाक घरातील पसारा आवरला नसता तरच नवल!

loading image
go to top