esakal | मेमॉयर्स : आईची खंबीर साथ!
sakal

बोलून बातमी शोधा

Ashwini-Kulkarni

मी माझ्या आईला पाहिलं ते एक कणखर, कर्तव्यनिष्ठ वकील, तरी कधी एक भावनाप्रधान स्त्री म्हणून. करिअरला प्राधान्य देऊनही घरावर बारीक लक्ष असलेली स्त्री म्हणून मी तिला पाहिलं आणि मोठी झाल्यावर तिला माझ्या आयुष्याचा ‘आयडॉल’ म्हणून स्वीकारलं. कामानिमित्त बाबा नेहमीच बाहेरगावी असायचे. त्यामुळं घराची दुहेरी जबाबदारी तिनं समर्थपणे पेलली. घरातले मोठे निर्णय अत्यंत प्रभावीपणे घेताना मी तिला लहानपणापासून पाहात आले आणि माझ्यात तिची ही निर्णयशक्ती रुजली.

मेमॉयर्स : आईची खंबीर साथ!

sakal_logo
By
अश्‍विनी कुलकर्णी, अभिनेत्री

मी माझ्या आईला पाहिलं ते एक कणखर, कर्तव्यनिष्ठ वकील, तरी कधी एक भावनाप्रधान स्त्री म्हणून. करिअरला प्राधान्य देऊनही घरावर बारीक लक्ष असलेली स्त्री म्हणून मी तिला पाहिलं आणि मोठी झाल्यावर तिला माझ्या आयुष्याचा ‘आयडॉल’ म्हणून स्वीकारलं. कामानिमित्त बाबा नेहमीच बाहेरगावी असायचे. त्यामुळं घराची दुहेरी जबाबदारी तिनं समर्थपणे पेलली. घरातले मोठे निर्णय अत्यंत प्रभावीपणे घेताना मी तिला लहानपणापासून पाहात आले आणि माझ्यात तिची ही निर्णयशक्ती रुजली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सहसा आपण आईची माया आणि बाबांचा धाक, असे समीकरण पाहतो. पण, आमच्याकडं अगदी उलट. बाबा लाड करायचे आणि धाक आईचा. 

आज समजतंय की, कधी कडक तर कधी मैत्रीण होऊन आईनं मला घडवलं; पण तेही अगदी माझ्याही नकळत. मी शाळेत असल्यापासून एक स्कॉलर विद्यार्थिनी होते. कोणाही आई-वडिलांना वाटेल असा ठराविक साचेबंद अभ्यासक्रम मी निवडावा, अशी तिचीही अपेक्षा असावी. मी अभिनय आणि कला क्षेत्र निवडायचा घेतलेला निर्णय पचवणं तिला नक्कीच अवघड गेलं असेल. तरीही ती माझ्यामागं खंबीरपणे उभी राहिली. माझ्या भरतनाट्यम्‌च्या कार्यक्रमांसाठी साडी नेसविण्यापासून हेअर मेकअप अशा अवघड जबाबदाऱ्या तिनं उत्तम निभावल्या.

मुंबईसारख्या शहरात आमचे कोणीही नातेवाईक नसताना तिथं राहताना, चार लोकांत वावरताना ती माझी शक्ती होती. घरापासून दूर राहायचं स्वातंत्र्य मिळूनही तिचे संस्कार आणि शिस्तीमुळं मी माझी ओळख बनवू शकले. इतकी की, ‘पछाडलेला’च्या ‘प्रीमियर’वेळी महेशदादा येऊन आई-बाबांना, ‘‘अगदी गुणी बाळ आहे हो तुमचं,’’ असं आवर्जून सांगायला आले. माझ्या पहिल्या चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी गाडीला अपघात झाला, हे तिला कळताच माझ्याशी बोलेपर्यंत तिच्या जिवात जीव नव्हता. 

खरंतर आईनंच माझ्या पंखांना शक्ती दिली, तिचा प्रोफेशन वेगळा असला तरी सतत ती मला योग्य सल्ले देत राहिली. माझ्या प्रत्येक निर्णयावेळी खंबीरपणी उभी राहिली. तिच्यामुळंच मी आयुष्यातले मोठे निर्णय समर्थपणे घेऊ शकते. प्रत्येक निर्णयात तिनं माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवला. माझ्या करिअरच्या दृष्टीनं तिचं योगदान मोठं आहे. वाचन, स्वयंपाक, स्वच्छता, काटकसर अशा अनेक चांगल्या सवयी आईनं लावल्या. आज चार महिने झाले आईला जाऊन... पण तिनं दिलेला आत्मविश्‍वास आणि संस्कारांच्या रूपात ती आजही माझ्याबरोबरच आहे.. आणि सतत राहील! 

शब्दांकन - अरुण सुर्वे 

loading image
go to top