Video : आईशी संवाद : जन्मानंतरचा पहिला महिना

डॉ. अमोल अन्नदाते, बालरोगतज्ज्ञ
Friday, 10 January 2020

1) बाळ आणि सांभाळ करणारी आजी किंवा नातेवाईक सोडून कोणीही बाळाला हात लावू नये. 

2) सर्वाधिक जंतू असलेल्या फोन व पैसे या वस्तूंपासून बाळाला लांबच ठेवावे. सांभाळ करणाऱ्यांनीही हात धुऊन, शक्यतो स्टरिलीयम वापरूनच बाळाला हाताळावे. 

3) जंतूसंसर्ग ओळखण्यासाठी पहिल्या महिन्यात आईने तीन लक्षणांवर प्रामुख्याने लक्ष ठेवावेः बाळ नियमित दूध पिते का? बाळ नियमित शी-शू करते का? आणि बाळ दूध प्यायल्यावर शांत झोपते का?   

4) या तीन गोष्टीत कुठे ही अनियमितता आढळली किंवा त्याबरोबर होत नसतील तर बाळाला जंतुसंसर्ग झाला आहे का, हे तपासण्यासाठी शिशुतज्ज्ञांकडे न्यावे.

जन्मानंतर पहिल्या महिन्यात जंतुसंसर्गाचा सर्वाधिक धोका असतो. तो टाळणे तितकेच सोपेही असते. अनेक नॉर्मल असणाऱ्या व तरीही मनात भीती निर्माण करणाऱ्या काही गोष्टी आईने समजून घेतल्या, तर आईची बरीच काळजी कमी होऊ शकते. पहिल्या महिन्यात बाळ झाले म्हणून अनेक जण घरी किंवा हॉस्पिटलमध्ये भेटायला येतात. प्रत्येकाला बाळाला बघण्याची, हातात घेऊन खेळवण्याची इच्छा असते. काहींना बाळासोबत फोटो काढायचा असतो. काही जण बाळाच्या हातात पैसे देतात. या सगळ्या गोष्टी जंतुसंसर्गासाठी कारणीभूत ठरू शकतात.

याशिवाय बाळाला ताप येणे आणि बाळ सतत झोपेत राहणे ही आईला जंतुसंसर्गाविषयी दक्ष करणारी लक्षणे असू शकतात. पहिल्या महिन्यात बाळाला झटके येत असल्यास तेही ओळखता येणे आईसाठी महत्त्वाचे असते. एक हात वा पाय हलणे, सतत जोरात चोखल्यासारखे ओठ करणे, चेहऱ्याची, डोळ्याची एक बाजू उडणे अशा प्रकारे नवजात बाळाला झटके येऊ शकतात. झटके किंवा जंतुसंसर्गाची जराही शंका असल्यास तातडीने रुग्णालयात जायला हवे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

यासोबत अशा काही गोष्टी असतात ज्या नवजात बाळात नॉर्मल असतात. अंगावर निळसर चट्टा असणे हे अनेक मुलांमध्ये दिसून येते. याला मोंगोलियन स्पॉट असे म्हणतात. या शिवाय जन्मानंतर पहिल्या दहा दिवसांत स्तन मोठे होणे, हे नॉर्मल असते. आईकडून नाळेतून बाळाला जे संप्रेरक पोचतात त्यामुळे हे बदल दिसून येतात. याला मालीश करणे किंवा ते पिळून काढल्यामुळे गुंतागुंत निर्माण होते. याला कुठल्याही उपचारांची गरज नसते. योनी मार्गातून पाळीच्या काळात रक्त येते, तसे तीन चार दिवस थोडे रक्त येणेही नॉर्मल असते. ते आपोआप थांबते. काही नवजात बालकांना खूप घाम येणे नॉर्मल असते, पण दूध पिताना दम लागत असेल किंवा कपाळाला जास्त घाम येत असल्यास हृदयरोगाचे लक्षण असू शकते. तसेच झोपल्यावर उशी घामाने ओली होत असल्यास हृदयाची तपासणी करून घेतलेली बरी. जन्मानंतर बेंबी फुगणे नॉर्मल असते, पण बेंबीतून दुर्गंधीयुक्त पस येत असल्यास उपचार आवश्यक असतात. डिलिव्हरीनंतर बऱ्याचदा डोके आईच्या पोटात किंवा बाहेर येताना दबून राहिल्याने थोडी सूज किंवा फुगीर असते. त्यालाही फारशा उपचारांची गरज नसते आणि एका महिन्यात ते बरे होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article dr amol annadate