आईशी संवाद : ‘ड’ जीवनसत्त्व मुलांच्या प्रतिकारशक्तीचा आधार

डॉ. अमोल अन्नदाते, बालरोगतज्ज्ञ
Saturday, 16 May 2020

स्नायू व हाडांच्या वाढीसाठी जन्मापासून कुमारवयापर्यंत ‘ड’ जीवनसत्त्व अत्यावश्यक जीवनसत्त्व असते. लहान वयात ‘ड’ जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे रीकेट्स व कुमारवयात हाडांची ठिसूळता, हाडे नाजूक राहणे असा त्रास होतो. लहान वयात ‘ड’ जीवनसत्त्व कमी राहिल्यास त्याचा हाडांवर भावी आयुष्यात अगदी म्हातारपणापर्यंत परिणाम राहतो.

भारतातील ८०- ९०टक्के बालकांमध्ये ‘ड’ जीवनसत्त्वाची तीव्र कमतरता आहे.

 ‘ड’ जीवनसत्त्व कशासाठी आवश्यक असते?
स्नायू व हाडांच्या वाढीसाठी जन्मापासून कुमारवयापर्यंत ‘ड’ जीवनसत्त्व अत्यावश्यक जीवनसत्त्व असते. लहान वयात ‘ड’ जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे रीकेट्स व कुमारवयात हाडांची ठिसूळता, हाडे नाजूक राहणे असा त्रास होतो. लहान वयात ‘ड’ जीवनसत्त्व कमी राहिल्यास त्याचा हाडांवर भावी आयुष्यात अगदी म्हातारपणापर्यंत परिणाम राहतो.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

प्रतिकारशक्ती व त्यातच श्वसनाच्या जंतूसंसर्गाविरोधात ‘ड’ जीवनसत्त्वाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. दमा असलेल्या मुलांमध्येही ‘ड’ जीवनसत्त्वाची पातळी नॉर्मल राहणे गरजेचे असते. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर ‘ड’ जीवनसत्त्वाचे खूप महत्त्व आहे. ‘ड’ जीवनसत्त्व घेतल्याने कोरोना संसर्ग होणारच नाही, असे नाही पण त्याची पातळी नॉर्मल असलेल्या बाळाचा कोरोनाबाधित व्यक्तीशी संपर्क आल्यास त्याला प्रतिकारशक्ती चांगली असल्याने कोरोना बाधा होण्याची शक्यता कमी होऊ शकते.

तसेच, कोरोनाची बाधा झाली तरी त्याचे शरीर कोरोनाशी लढण्यास अधिक सक्षम असेल. आईच्या दुधात इतर सर्व घटक असतात, पण ‘ड’ जीवनसत्त्वामध्ये मात्र ते कमी पडते. तसेच सकाळी १० ते ४ अर्धा तास मुलांना उन्हात ठेवणेही व्यावहारिक नाही. त्यामुळे सर्व वयोगटातील लहान मुलांना ‘ड’ जीवनसत्त्वाची गरज असते. याला रोज उन्हात अंघोळ घातली जाणारी नवजात बालके अपवाद असू शकतात. जन्मानंतर पहिल्या महिन्यात बाळाला तेलाने मसाज करून उघड्यावर सूर्यप्रकाशात अंघोळ घातली आणि १० मिनिटे सूर्यप्रकाश मिळू दिल्यास त्यांना ‘ड’ जीवनसत्त्वाचे औषध देण्याची गरज पडणार नाही. पण पहिल्या महिन्यात सूर्यप्रकाश मिळत नसल्यास मात्र जन्मापासूनच ‘ड’ जीवनसत्त्वाचे औषध ४०० IU रोज एक वेळा पहिले वर्ष द्यावे. या नंतर दररोज ४०० ते ६०० IU प्रती दिन देणे अपेक्षित आहे.

पण दररोज औषध देण्याचे कोणालाही शक्य होत नाही व लक्षातही राहात नाही. यासाठी एक वर्षानंतर ६०,००० IU आठवड्यातून एकदा ६ आठवडे व नंतर दर ऋतू बदलला म्हणजे प्रत्येक वेळी ऋतू बदललल्यावर ‘ड’ जीवनसत्त्व एकदा द्यायला हवे. ढोबळपणे दर तीन महिन्यातून एकदा ६०,००० IU असा हा डोस येतो. याशिवाय मुलांनी उन्हात खेळायला हवे. शाळांमध्ये खेळण्याचे तास हे सकाळी १० ते दुपारी ४ च्या दरम्यान ठेवण्यात यावेत. एरवी कुठल्याही गोष्टीसाठी रक्त घेतले जात असेल, तेव्हा मुलांच्या रक्तातील ‘ड’ जीवनसत्त्वाचे प्रमाण तपासून पाहावे. पण आवर्जून हे तपासण्यासाठी रक्त घेऊ नये. हे प्रमाण ५० mg / ml च्या वर असल्यास पुरेसे समजावे. त्याखाली असल्यास पूर्ण उपचारासाठी याप्रमाणे डोस द्यावा लागतो. त्यासाठी आपल्या बालरोगतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. खरेतर कोरोनासोबतच अनेक वर्षांपासून लहान मुलांमध्ये ‘ड’ जीवनसत्त्व कमतरतेची दुर्लक्षित साथ सुरू आहे. कोरोना साथीच्या निमित्ताने ही साथही संपवता येईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Article Dr Amol Annadate on D Vitamin The basis of childrens immunity