esakal | आईशी संवाद : आयुष्यभराचे ओझे असे करु हलके....
sakal

बोलून बातमी शोधा

Child

भारतात दर ७०० मुलांमध्ये एक बाळ डाऊन्स सिंड्रोममुळे मतिमंद आहे. अशा पालकांसाठी हा शब्द आयुष्यभरासाठी ओझे बनतो. कारण, या रुग्णांसाठी बरेच काही करता येऊ शकते, याची त्यांना जाणीवच नसते. डाऊन्स सिंड्रोमची मुले जन्माला आल्यावर पुढच्या काळात तसेच प्रत्येक स्त्रीमध्ये गरोदर असताना या आजाराचा प्रतिबंध केला जाऊ शकतो. गरोदर असताना या आजाराचे निदान करणे अतिशय महत्त्वाचे आहे.

आईशी संवाद : आयुष्यभराचे ओझे असे करु हलके....

sakal_logo
By
डॉ. अमोल अन्नदाते, बालरोगतज्ज्ञ

भारतात दर ७०० मुलांमध्ये एक बाळ डाऊन्स सिंड्रोममुळे मतिमंद आहे. अशा पालकांसाठी हा शब्द आयुष्यभरासाठी ओझे बनतो. कारण, या रुग्णांसाठी बरेच काही करता येऊ शकते, याची त्यांना जाणीवच नसते. डाऊन्स सिंड्रोमची मुले जन्माला आल्यावर पुढच्या काळात तसेच प्रत्येक स्त्रीमध्ये गरोदर असताना या आजाराचा प्रतिबंध केला जाऊ शकतो. गरोदर असताना या आजाराचे निदान करणे अतिशय महत्त्वाचे आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

डाऊन्स सिंड्रोम टाळण्यासाठी
गरोदर स्त्रियांमध्ये १४ ते १६ आठवड्यांदरम्यान अल्फा फिटो प्रोटीन, इस्ट्रीडीऑल व एच. सी. जी. या तपासण्या केल्यास सोळा आठवड्यांतच डाऊन्स सिंड्रोमचे निदान होऊ शकते. याला ‘ट्रिपल टेस्ट’ असे म्हणतात. तसेच १८ ते २० आठवडे सोनोग्राफीच्या माध्यमातून तज्ज्ञांकडून याचे निदान होऊ शकते. सहसा आधी डाऊन्स बाळ जन्माला आल्यास व ३० वर्षांक्षा जास्त वय असलेल्या आईला टेस्ट करण्याचा सल्ला दिला जातो.

उपचार
पालक, डॉक्टर व समाज यांनी हातात हात मिळवून उपचार केले, तर डाऊन्स सिंड्रोमचे बाळ चांगले आयुष्य जगू शकते. या  सिंड्रोमला जोडून येणाऱ्या आजारांची पडताळणी ही उपचारांची पहिली पायरी असते. म्हणून हृदय आजारांसाठी २ डी-इको, दरवर्षी मानेचा एक्स-रे, दरवर्षी थायरॉइडची तपासणी हा महत्त्वाचा भाग असतो. आढळून आल्यास त्या त्या आजारांचे उपचार करावे लागतात. नियमित फिजिओथेरपी व ऑक्युपेशनल थेरपी हा उपचारांचा मोठा स्तंभ ठरतो. स्नायूंची लवचिकता फिजियोथेरपीच्या साह्याने कमी करून मुलांना काम शिकवले जाऊ शकते. अशा प्रकारे आपल्या पायावर उभी राहून चांगले आयुष्य जगत असलेल्यांची कितीतरी उदाहरणे आहेत.

समाजाची जबाबदारी व कायदेशीर बाजू
रुग्णांसाठी सर्वांत मोठा अडसर म्हणजे समाज त्यांना स्वीकारत नाही. त्यांच्या चिडचिडेपणामुळे शाळांमध्ये त्यांना प्रवेश नाकारला जातो. खरेतर डाऊन्स रुग्ण नेहमी हसत, खेळत राहणारे, संगीत गाण्यांमध्ये रमणारे असतात; पण मधूनच त्यांचा स्वभाव खूप रागीट होऊन जातो. हा त्यांच्या स्वभावाचा भाग म्हणून स्वीकारून त्यांनी त्यांना प्रवेश द्यायला हवे. मात्र, डाऊन्स मुलांना प्रवेश नाकारले याची कितीतरी उदाहरणे आहेत. डाऊन्स रुग्णांच्या पालकांनी एकत्र येऊन या रुग्णांसाठी अजून काय करता येईल याचा विचार करावा. डॉक्टर व समाजाने ठरवले तर डाऊन्स बाळांना चांगले आयुष्य दिले जाऊ शकते.

डाऊन्स सिंड्रोम म्हणजे नेमके काय?
सातशेपैकी एका बाळामध्ये २१ नंबरच्या क्रोमोझोममध्ये (गुणसूत्र) दोनऐवजी तीन जोड्या निर्माण झाल्यामुळे  डाऊन्स सिंड्रोमचे बाळ जन्माला येते.

कारणे
डाऊन्स सिंड्रोमचे विशिष्ट असे कारण नाही; पण आईच्या वाढत्या वयाबरोबर डाऊन्स सिंड्रोमचे प्रमाण वाढते. आईचे वय ३५च्या वर असल्यास त्याची शक्यता वाढते.

लक्षणे

  • बाळाची वाढ खुंटणे व मतिमंदत्व हे या आजाराचे सर्वांत प्रमुख लक्षण आहे. 
  • गोल चेहरा, मागून चपटे डोके, विशिष्ट प्रकारे आडवे डोळे, चपटे नाक, मोठ्या आकाराची जीभ, चेहऱ्याच्या विशिष्ट लक्षणांमुळे बाळाकडे बघूनच निदान होते.
  • छोटी मान व मानेवर अधिक प्रमाणात त्वचा.
  • कमी उंची.
  • छोटे हात.
  • पायाच्या व हातांच्या विशिष्ट प्रकारची ठेवण.
  • चिडचिडेपणा

डाऊन्स सिंड्रोमसोबत येणारे आजार

  • जन्मजात हृदयाची व्याधी
  • मानेच्या हाडांची कमजोरी

Edited By - Prashant Patil