मेमॉयर्स : ममाज गर्ल

गायत्री दातार आई सविता यांच्यासमवेत.
गायत्री दातार आई सविता यांच्यासमवेत.

आपण आईबद्दल बोलू तितकं कमी असतं. प्रत्येकाला आपली आई बेस्ट वाटत असते तसंच मलाही वाटतं की माझी आई ही बेस्ट आहे. लहानपणापासूनच ती माझ्यासाठी रोलमॉडेल आहे. माझी आई (सविता दातार) पुण्यातील एस.पी. कॉलेजच्या झुऑलॉजी विभागाची प्रमुख आहे. तसंच बायोटेक्नॉलॉजीची ‘पीएचडी होल्डर’ आणि ‘ॲक्टिव्ह रिसर्चर’ आहे. तिच्या मार्गदर्शनाखाली अनेकांनी ‘पीएचडी’ मिळवली आहे. त्यामुळे काम आणि घर या दोन्ही गोष्टी ज्या पद्धतीने ती इतकी वर्ष सांभाळत आली आहे ते खरंच ग्रेट आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मी ममाज गर्ल आहे. मी लहानपणापासूनच प्रत्येक गोष्ट अगदी मनमोकळेपणाने तिच्यासोबत शेअर केली आहे. तिचा स्वभाव खूप छान आहे आणि गरज पडली तेव्हा तिने मला खूप छान पद्धतीने समजून घेतलं आहे, चांगले सल्ले दिले आहेत. त्यामुळे माझी आई ही माझी माझ्या वयाहून मोठी मैत्रीण आहे. परंतु तसं असलं तरी मुलगी म्हणून आपल्या आईबद्दल वाटणारी एक आदरयुक्त भीतीही आहे. तिने सगळ्या गोष्टी सक्षमतेने सांभाळल्या आहेत, त्यासाठी माझ्या मनात तिच्याबद्दल प्रचंड आदर आहे. आमच्या घरात अभिनय क्षेत्रात येणारी मी पहिलीच व्यक्ती. मला लहानपणापासूनच अभिनय करायला आवडायचा. आणि या क्षेत्रात काम करायचं असं घरी सांगितलं तेव्हा अनेकांच्या पालकांचं म्हणणं असतं की, ‘तू आधी शिक्षण पूर्ण कर, एक भक्कम डिग्री घे’ तसंच माझ्याही आई-बाबांचं होतं. त्यामुळे मी आयटी इंजिनिअरिंग केलं. मात्र त्यानंतर पुन्हा मी घरच्यांना सांगितलं की, इंजिनिअर झाले असून मला अभिनय क्षेत्रातच काम करायचंय तेव्हा सुरुवातीला त्यांना ते फारसं पटलं नव्हतं. मात्र माझी आवड लक्षात घेऊन आई-बाबांनी मला होकार दिला. त्याचप्रमाणे आत्तापर्यंत आई-बाबांनी कायम मला पाठिंबा दिला आहे.

माझी आई प्रोफेसर आहे. त्या व्यतिरिक्त तिने आपल्या आवडते छंदही जोपासले आहेत. ती खूप छान चित्रं काढते, शिवणकाम करते. तिला वेगवेगळ्या प्रकारच्या फॅशनचे कपडे बनवता येतात. आत्तापर्यंत तिने माझ्यासाठीही भरपूर कपडे तयार केले आहेत. तसेच तिला बागकाम करायचीही खूप आवड आहे. आमच्याकडे खूप झाडं आहेत. त्या झाडांची निगा राखणं, नवीन झाडं आणून लावणं हे ती अगदी मनापासून करते.

माझी आई सुगरण आहे, ती सगळ्या प्रकारचं जेवण उत्तम बनवते. मला तिच्या हातचे सगळेच पदार्थ आवडतात. खास करून पुरणपोळ्या जास्त आवडतात. सध्या मी मुंबईत आणि आई पुण्यात रहात असल्याने आमचं बोलणं रोज होत असलं तरी मी तिच्या हातचं स्वादिष्ट जेवण खूप मिस करत आहे.
शब्दांकन : राजसी वैद्य

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com