Women's Day : स्त्रियांचे जगण्याचे समाजभान...

women mail comparison
women mail comparison

कवयित्री बहिणाबाई चौधरी यांनी ‘अरे माणसा माणसा कधी होशील माणूस, माणुसकीचा ना दाणा कानी पडलं कनूस’ असे वर्णन करीत अनेक कवितांमधून माणसाचे विशेषतः स्त्रियांचे विश्‍व उभे केले आहे. याचप्रमाणे स्वातंत्र्यपूर्व काळातील स्त्रियांचे जगणे ताराबाई शिंदे यांनी आपल्या ‘स्त्री-पुरुषतुलना’मधून चित्रित केले आहे. त्यांचे हे छोटेखानी पुस्तक १८८२ मध्ये प्रसिद्ध झालेले आहे. महात्मा जोतिराव फुले यांनी ताराबाई शिंदे यांच्या विचाराचे महत्त्व जाणले होते. त्यांनी आपल्या ‘सत्सार अंक-२’मध्ये त्यांचे कौतुक केले होते.

बुलडाण्यासारख्या त्या काळी मागास समजल्या जाणाऱ्या छोट्या गावात राहणाऱ्या बाईने एवढे प्रखर व वास्तव विचार साकारणे, हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. स्वतंत्र विचारांच्या ताराबाईंची बंडखोरी वृत्ती या पुस्तकातून दिसते. ‘‘ज्या परमेश्‍वराने ही आश्‍चर्यकारक सृष्टी उत्पन्न केली, त्यानेच स्त्री-पुरुष निर्माण केले. तरी सर्व प्रकारचे दुर्गुण स्त्रियांच्याच अंगी वसतात किंवा जे अवगुण स्त्रियांचे अंगी आहेत, तेच पुरुषांत आहेत किंवा नाहीत, हे स्पष्ट करून दाखवावे याच हेतूने हा लहानसा निबंध मी माझ्या सर्व देशभगिनींचा अभिमान धरून रचिला आहे आहे,’’ असे प्रस्तावनेत त्यांनी स्पष्ट केले आहे. 

महिलांविषयीचे आणखी विषय वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

विधवा महिलांचे दुःख
त्या काळी गाजलेल्या विजयलक्ष्मी या विधवा महिलेवरील खटल्याची पार्श्‍वभूमीवर विधवा महिलांचे जगणे व समाजाने लादलेल्या स्त्रीधर्मावर प्रकाश टाकत ‘नवरा मेल्यावर सर्व त्रास स्त्रियांनाच का? बायको मेल्यावर लगेच दुसरी करायला पुरुषांनाच मोकळीक का? नवरा मरावा म्हणून स्त्रियांनी देवाला प्रार्थना केली होती का?’ असा सवाल त्या करतात. ‘प्रार्थना केलीही असती, पण विधवेचे भयानक जीवन वाटेला येऊ नये म्हणून तरी त्या तसे करणार नाहीत,’ असा टोलाही त्यांनी मारला. 

पुराणातील सती सावित्रीच्या कथेचा उल्लेख करीत ‘पतीचे प्राण परत मिळवण्यासाठी सावित्री यमदरबारात पोचली. तसा पत्निप्रेमासाठी कोणी पुरुष यमदरबारी पोचला असल्याचा दाखला आहे, का?’ असे त्या विचारतात. बायकोला नवराच देव असेल तर  नवऱ्याची वागणूकदेखील देवाप्रमाणेच पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. इतर देव-देवता व ऋषिमुनींचा इतिहास पाहिला तर तो काही माणसांपेक्षा वेगळा नाही, असे मत व्यक्त करताना रामायण, महाभारत, पांडवप्रतापमधील उदाहरणे ताराबाईंनी दिली असून देव व ऋषींनीही आपल्या बायकांबरोबर चांगले व्यवहार केले नसल्याची अनेक उदाहरणे त्यांनी दिली आहेत. 

सुधारणावादी इंग्रजांचे कौतुक
इंग्रज सरकारचे कौतुक त्यांनी केले आहे. इंग्रजांनी महिलांच्या बाजूने केलेले कायदे व सुधारणा याला ताराबाईंनी महत्त्व दिले आहे. यात देशभक्तिविरोध कोठेही दिसून येत नाही. उलट आपली परंपरागत वेशभूषा सोडून साहेबाचे अनुकरण करणारे टीकेला पात्र ठरतात, असे ताराबाईंनी म्हटले आहे. 

ताराबाई शिंदे यांचे हे लेखन अतिशय परखड असून उपहास-उपरोधातून त्यांनी समाजात कनिष्ठ मानले गेलेल्या स्त्रियांचे श्रेष्ठत्व यातून दाखवून दिले.

महिलांसाठीच्या विविध कोर्सेसची माहिती घेण्यासाठी येथे ► क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com