मेमॉयर्स : माझे सर्वस्व...!

Pooja-Katurde
Pooja-Katurde

आई... काय लिहायचं हा प्रश्‍नच आहे...आई म्हटल्यावर आपोआप एक भावना आणि स्मितहास्य चेहऱ्यावर येतं आणि तिच्याविषयी जितकं लिहावं तितकं कमीच आहे. कुणाच्याही आईबद्दल फक्त एवढाच विचार मनात येऊ शकतो, प्रेम आणि त्याग! आणि त्यात माझी आई जरा अधिकच स्पेशल आहे. (हे प्रत्येकालाच वाटतं आणि हे प्रत्येकालाच वाटायला पाहिजे, असं मला वाटतं.) माझी आई माझं सर्वस्व आहे, फक्त माझी मैत्रीण नाही तर माझी गाइड, माझी आयडॉल, अगदी शत्रूही (अर्थात जेव्हा प्रेमात भांडण होतात तेव्हा.) खरंतर सगळ्याच भूमिका ती बजावते. मी तिला मम्मी, मम्मा, मम्मूडी असे काहीही म्हणते. माझी सगळे सिक्रेटस तिला माहिती आहेत, मी सगळंच शेअर करते तिला. ती फारच गोड आहे, खूप भोळी आहे आणि खूप दयाळूपण आहे.

(दुसऱ्यांच्या बाबतीत माझ्या बाबतीत जरा कमी.) माझ्या आईने लहानपणापासून खूप कष्ट केले. तिच्या आईबाबांसाठी तिनं शिक्षण सोडलं आणि एका कंपनीत नोकरी करून ती घराला हातभार लावत असे. ती अजूनही खूप कष्ट करते घरासाठी अन् आमच्यासाठी. ती घराची बिग बॉस आहे. ती आमच्यावर रागावणार नाही, दुखावली जाणार नाही याची आम्ही सगळचे खूप काळजी घेतो. तिच्यासारखी सशक्त महिला मी आजपर्यंत कधी पहिली नाही. कधीकधी प्रश्‍न पडतो, आईसारखं आपण कधी करू शकतो का दुसऱ्यांसाठी? तिच्यातला स्वाभिमान, लिडरशिप, प्रेमळ स्वभाव, सुगरण, शिस्तप्रिय, बिनधास्त, हट्टी सगळं काही लोभस आहे. मला तिच्याकडून खूप गोष्टी शिकायला मिळतात.

ती मला नेहमी म्हणते, ‘‘तुझ्या आयुष्यात कितीही मोठा शत्रू आला तरी तू तुझ्यातल्या रागाला स्वतःवर वरचढ होऊ देऊ नकोस. तू प्रेमाने सगळं जिंकू शकतेस. तू कधीच कोणाबद्दल वाईट बोलू नकोस. कारण, आपण जे बोलतो किंवा करतो ते सगळं व्याजासकट आपल्याला परत मिळतं. तुला लोकांसाठी जितकं करता येईल, तितकं कर. फक्त कोणाला बोलून दाखवू नकोस आणि कोणाकडून अपेक्षा ठेवू नकोस. तू हे करशील तेव्हा तुझ्या करण्याला शून्य किंमत असेल.’’ हे मी नेहमी फॉलो करते आणि त्याचा मला खूप फायदा होतो. ती मला नेहमी सांगते की, तू ज्या क्षेत्रात आहेस त्यात खूप स्पर्धा आहे, खूप वाईट लोक भेटतील पुढं, काही मागे बोलणारी असतील, काही पाय खेचणारी असतील; पण या  सगळ्याच्या पलीकडचा विचार कर. तू तुझे प्रयत्न थांबवू नकोस, देवावर विश्‍वास ठेव, मनापासून काम कर, नेहमी शिकत राहा, स्वतःवर विश्‍वास ठेव आणि मी नेहमी आहेच सोबत... तू बेधडक पुढे चालत राहा... अशा खूप गोष्टी आहेत. मी तिच्यापासून लांब राहते. ती पुण्यात असते. मला अभिनयासाठी मुंबईत राहावं लागतं.’’

तिच्या हातचं जेवण स्पेशली मेथीची भाजी, पिठलं भाकरी, इडली सांबर, बासुंदी याची आठवण येते मला. माझ्या आईला इंग्लिश फारसे येत नाही; पण तिला त्याचे वाईट वाटत नाही. तिने आता स्पोकन इंग्लिशचा क्लास लावलाय. ती कॉम्प्युटर लँग्वेज शिकतीये. ती पंधरा वर्षे बचतगटाची अध्यक्ष आहे. तिच्यामुळे खूप जणांना आर्थिकदृष्ट्या स्वतःच्या पायावर उभे राहता आले. खूप वर्ष स्वतःचे हॉटेल चालवून तिने ते सगळे उत्तम सांभाळले. अशा खूप गोष्टी आहेत. मला तिचा खूप अभिमान आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com