esakal | वुमनहूड : मुंबईकर, पुणेकर, नागपूरकर
sakal

बोलून बातमी शोधा

Radhika-Deshpande

‘तू मूळची कुठली गं?’ या प्रश्नाचं मी काहीही उत्तर दिलं तरी म्हणतात कसं, ‘वाटत नाही हं!’ मुळात मला हा प्रश्नच आवडत नाही. प्रश्न काही वाईट नाही; पण बरेच लोक जागा शोधून विचारतात, ते मला आवडत नाही. पु. ल. देशपांडे यांनी, ‘तुम्हाला कोण व्हायचं आहे? मुंबईकर, पुणेकर का नागपूरकर?’ असा प्रश्न विचारला होता. मला आज विचारावंसं वाटतं आहे, की तीनही होता येईल का? त्यांना विचारता आलं असतं तर नक्की मला उत्तर मिळालं असतं, नाही!

वुमनहूड : मुंबईकर, पुणेकर, नागपूरकर

sakal_logo
By
रानी (राधिका देशपांडे)

‘तू मूळची कुठली गं?’ या प्रश्नाचं मी काहीही उत्तर दिलं तरी म्हणतात कसं, ‘वाटत नाही हं!’ मुळात मला हा प्रश्नच आवडत नाही. प्रश्न काही वाईट नाही; पण बरेच लोक जागा शोधून विचारतात, ते मला आवडत नाही. पु. ल. देशपांडे यांनी, ‘तुम्हाला कोण व्हायचं आहे? मुंबईकर, पुणेकर का नागपूरकर?’ असा प्रश्न विचारला होता. मला आज विचारावंसं वाटतं आहे, की तीनही होता येईल का? त्यांना विचारता आलं असतं तर नक्की मला उत्तर मिळालं असतं, नाही!

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मुंबईकरांसारखं काम करता आलं असतं, पुणेकरांसारखं खाता आलं असतं आणि नागपूरकरांसारखं आरामात झोपता आलं असतं, तर काय मजा होती. माझा जन्म आणि शिक्षण नागपूरला झालं, त्यामुळे मी सांबार (कोथिंबीर) घालून केलेली पुडाची वडी खाऊन मोठी झाले. पुण्यात लग्न करून आल्यामुळे पुण्याची भेळ मी खातेच; पण माझं अर्ध्याहून अधिक काम हे मुंबईत असल्यामुळे मुंबईच्या ‘बॉम्बे सँडविच’ला पर्याय नाही. म्हणजे माझा भूतकाळ हा नागपूरचा, वर्तमान काळ पुण्यातला आणि भविष्यकाळ मुंबईचा. 

या तीनही शहरांत राहत असल्यामुळे कोणत्याही मोठ्या माणसाने मोठी कामगिरी केल्यावर, ‘अरे हा आपल्या इथला,’ असं उघडपणे बोलणं अवघड जातं. या तीनही शहरांत मी लीलया खपते. कारण कलाकार असल्यामुळे मी ‘जैसा देस, वैसा भेस’ याचं पालन करते. याचं कारण माझं बालपण असावं. कॉन्व्हेंट शाळेत शिकले असल्याने मुंबईच्या हाय-फाय क्लासबरोबर गप्पा मारणं आपल्याला जमतं. घरात शुद्ध वातावरण असल्यामुळे मराठीत शुद्धलेखन आणि प्रमाण मराठीतच बोलणं हा आमच्या जीवनशैलीचा भाग. माझ्या कपड्यांत ओल्ड फॅशनपासून हाय फॅशन ते ट्रेंडिंग फॅशनपर्यंत बदल होताना मी पहिला आहे. सेंसलेसपासून सेंसेशनलचा प्रवासही मी करू शकते. थँक्स टू दीज सिटीज ऑफ महाराष्ट्र. कधीकधी मला प्रश्न पडतो, नेमकी मी कुठली? 

कोणाशी गोड बोलायचं असंल तर पुणेरी, कामाचं आणि कामाशी काम ठेवून बोलायचं असंल तर मुंबईकरांसारखं आणि शिव्याच घालायच्या असतील तर नागपुरी शिव्यांशिवाय पर्याय नाही! ‘महाराष्ट्राचा सुपरस्टार कोण?’ अशा कार्यक्रमात मी गेले असताना मी ठरवून जाते, कौतुक करायचं असेल तर उभं राहून जोरजोरात कितीही टाळ्या-शिट्ट्या मारायच्या. आपण हे करत असताना कॅमेरा आपल्यासमोर आहे का नाही याची दक्षता घ्यायची, म्हणजे मी मुंबईकर. शिस्तीत, अंकगणित करत, जागेवर बसून टाळ्या वाजवल्या (मारल्या नाही) आणि कॅमेरा आपल्यावर येणार नाही, कारण कॅमेरामन मुंबईकराचा जावई आहे ही माहिती काढून ठेवली असल्यास मी पुणेकर. पण टाळ्या वाजवल्याच नाहीत आणि आपण चमकू कपडे न घातल्यामुळे कॅमेरा आपल्यावर येणार नाही असा कॉन्फिडन्स असल्यास मी नागपूरकर. 

खरंतर तू मला सांग किती काळ एका ठिकाणी राहिलीस? आतून तू कोण आहेस असं तुला वाटतं? कुठल्या ठिकाणची माणसं तुला जवळची वाटतात? एकानं तर मला म्हटलं, ‘बरं, आता तू डोळे बंद करून बघ बरं, तुला कुठलं शहर दिसत ते?’ मी त्याच वेळेला विषय बदलते. मला समुद्राकाठी पहाटेचा सूर्य उगवताना मुंबईत असायला आवडेल. माहेरी अंगणात झुल्यावर झुलत पुस्तक वाचायला आवडेल. संध्याकाळी पुण्यातल्या टेकडीवर माझी सायकल घेऊन जायला आवडेल. आज मला कोणी विचारलं की तू मूळची कुठली, तर मी त्यांना उलट प्रश्न करते, ‘तुम्हाला कुठली आहे, असं ऐकून घ्यायला आवडेल?’ त्यांना कळतं ही मुलगी ‘घाट घाट का पानी पी के आयी है’. पण खरंच पुलं, तुम्हीच सांगा या रा. नी. देशपांडेला. मी नेमकी कुठली आणि कोण? मुंबईकर, पुणेकर की नागपूरकर? कोण आहे मी?

loading image
go to top