वुमनहूड : तुझ्यात असं काय आहे?

रानी (राधिका देशपांडे)
Saturday, 23 May 2020

माझं जाण्याचं ठिकाण, काम, वेळ, कपड्यांचा रंग, मूड यानुसार मी त्या रंगरुप, आकाराची पर्स निवडते. देशीविदेशी पर्सेस असलेलं हे माझं कपाट एक खजिना आहे. तो सगळ्यांकरता उघडा नाहीये बरं का! आता त्यातलीच ही पर्स तुम्हाला फोटोत दिसतेय. बिच्चारी माझी सुंदर पर्स! तिला बघितलंच नाही हो मी लॉकडाउनमुळं गेले ६० दिवस, ११ तास आणि २३ मिनिटे! ती वरच्या कप्प्यात शांतपणे माझी वाट पाहत होती.

माझ्याकडं एक मोठ्ठं अनेक कप्प्यांचं कपाट आहे. त्या कप्प्यांमध्ये अनेक उपयोगी, महत्त्वाच्या, आकर्षक वस्तू ठेवल्या आहेत. वरच्या मोठ्या कप्प्यात रंगीबेरंगी, विविध आकाराच्या, मनमोहक डझनभर पर्सेस आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

माझं जाण्याचं ठिकाण, काम, वेळ, कपड्यांचा रंग, मूड यानुसार मी त्या रंगरुप, आकाराची पर्स निवडते. देशीविदेशी पर्सेस असलेलं हे माझं कपाट एक खजिना आहे. तो सगळ्यांकरता उघडा नाहीये बरं का! आता त्यातलीच ही पर्स तुम्हाला फोटोत दिसतेय. बिच्चारी माझी सुंदर पर्स! तिला बघितलंच नाही हो मी लॉकडाउनमुळं गेले ६० दिवस, ११ तास आणि २३ मिनिटे! ती वरच्या कप्प्यात शांतपणे माझी वाट पाहत होती. धक्का लागून धाडकन खाली पडली. अलगद तिला उचललं, ‘‘माझी पर्स,’’ म्हणत कडकडून मिठी मारली आणि तिला विचारलं, ‘‘तुझ्यात असं काय आहे,’’ तिनं खटकन मलाच विचारलं, ‘‘तुझ्यात असं काय आहे?’’ मी म्हटलं, ‘‘माझ्यात?

माझ्यात काही नाही बाई?’’ संन्याशासारखं जीवन जगते आहे मी सध्या. तर म्हणाली कशी, ‘‘म्हणूनच माझी आठवण नाही आली तुला. मला असं एकटीला सोडून दिलंस. बसवलंस कपाटाच्या कोपऱ्यात. माझ्या इतर बहिणी कशा पाय पसरून, हात लांब करून झोपतात आणि मी मात्र तुझं सगळं सामान ओटीपोटात, पोटात, पाठीवर, मानेवर घेऊन बसले आहे. एकदा तरी माझा विचार केलास? २२ मार्चच्या रात्री आणून पटकलंस, फिरकूनसुद्धा बघितलं नाहीस.’’ मी म्हणाले, “नाही गं! असं नाहीये. अगं तू आणि मी काय वेगळ्या आहोत? तुझ्यात तर माझं सारं जग सामावलेलं असतं.

तुझ्याशिवाय माझं पान हलत नाही. घराचा उंबरठा ओलांडल्यावर तूच तर असतेस माझी पाठराखीण. मला बिलगलेली, माझी जीवश्चकंठश्च मैत्रीण. असे खडे बोल बोलू नकोस.’’ तर म्हणते कशी, ‘‘तुझे नाट्यमय संवाद राहू दे बाजूला. आधी माझ्यातलं सामान बाहेर काढून मला मोकळं कर.’’

माझी पर्स बोलत नाही बरं का! माझे मनाचे मांडे. आपण सगळे अंतर्मुख होतोय, असं काहीजण म्हणतायेत, त्यातलाच हा एक प्रकार असावा. खरंच पर्स बोलू लागली तर? तिच्या पोटात माझं जग असतं. अगदी खऱ्या मैत्रिणीसारखं. पर्समधल्या वस्तूही बाहेर काढल्यावर बोलू लागल्या.

मैत्रिणींनो, एखाद्या बाईकरता पर्स किती जिव्हाळ्याची आणि पर्सनल असते, हे तुम्हाला माहितीच आहे. एखाद्या अभिनेत्रीच्या पर्समध्ये काय असतं, ऐकायचंय? ही पर्स तीन कप्प्यांमध्ये विभागली जाऊ शकते.

‘पब्लिक, प्रोफेशनल आणि प्रायव्हेट.’ ही वजनदार, महागडी पर्स अनेक गमती-जमतींची साक्षीदार असते. तिच्या आत शिरलात, तर अनेक प्रसंग, परिस्थिती, प्राप्त परिणामांना वाचा फुटू शकते. काढते वस्तू सगळ्या बाहेर. बघूया, प्रिय मैत्रिणी, तुझ्यात असं आहे तरी काय!

समोरच्या कप्प्यात कारच्या, घराच्या किल्ल्या, घरभर शोधललं माझं आवडतं पेन. छोटी डायरी आणि लिपबाम. मधल्या कप्प्यातील चोर कप्प्यात गॉगल, गॉगल केस, मेलोडी आणि पारले इलायचीयुक्त चॉकलेट; अचानक भूक लागली की खायला. एखाद्या रडणाऱ्या मुलाला द्यायलाही उपयोगी पडतात. माझ्या पर्समध्ये नेहमीच मोठ्या आकाराचा कंचा सापडेल.

माझ्या नाटकातल्या विद्यार्थ्यांनी चांगलं काम केलं की त्यांना बक्षिस म्हणून देते. मधल्या मोठ्या कप्प्यामध्ये छोटा पाउच आहे, शिवाय एक सहा वर्षं जुनी लेदरची मिनी पर्स आहे. एक्स्ट्रा पावर बँक आहे. दोन परफ्यूमच्या बाटल्या आहेत, कारण मला मिक्स करून लावायला आवडतात. एक पाण्याची बाटली. एक हेडफोन, कारण मला गाणी ऐकायला खूप आवडतात.

हात स्वच्छ करण्यासाठी वेट टिश्यूज. एक पाउच ज्यामध्ये मेकअपचं थोडं सामान, मी घरूनच छान तयार होऊन निघते. एक कॉम्पॅक्ट, ब्लशऑन आणि एक सुंदर गुलाबी लिपस्टिक. तीन वर्षांपूर्वी माझ्या आत्यानं दृष्ट लागू नये मीठमोहरी भरून दिलेली एक छोटी डबी. तिच्यात तिचं प्रेम आहे. दोन रबरबँड, (एक हरवलं तर बॅकअपला दुसरं) सेफ्टीपिनही हमखास माझ्या पर्समध्ये असते. आता लेदर पर्समध्ये काय आहे, ते बघूया. महत्त्वाचे कार्ड्स, पासपोर्ट साईज फोटो, चिल्लर पैसे - रस्त्यावर पेरू दिसला की पटकन घ्यायला, काही नोटा, माझ्या आईनं कधीतरी मला दिलेला विष्णूचा फोटो, पप्पांनी बक्षीस म्हणून दिलेले शंभर रुपये, माझ्या मुलीनं माझं काढलेलं कार्टून, भावानं दिलेलं एक बारीक शस्त्र हे सगळं त्यात आहे. बारीक कंगवाही सापडेल. मला इतरांचा कंगवा वापरायला आवडत नाही. एक फिंगर पपेटही असतो. लहान मुलांचं मनोरंजन करण्यासाठी. घरभर शोधूनही न सापडलेलं  ‘मॅरेज  सर्टिफिकेट’. 

बायकांच्या पर्समध्ये अख्ख जग हरवू शकतं म्हणतात, ते काही खोटं नाही. शेवटी पर्सचं जगच निराळं. आपलं प्रतिरूपच म्हणा नं! त्यात माया, प्रेम, वात्सल्य, सुख, समाधान, आनंद आणि आशावाद आहे. रूप, रंग, गंध, स्पर्श आणि जाणीवाही आहेत. काही आठवणींचे कोपरेही तुम्हाला सापडतील. स्वतःची काळजी, इतरांची मदत आणि मनोरंजन करण्याची इच्छा असते. माझ्या पर्सनं तर सामाजिक, भावनिक, आध्यात्मिक स्तर पण गाठलाय. सूज्ञ नागरिकाची लक्षणं आहेत. ही पर्स नसून मीच आहे, जी आत्मनिर्भर बनून बाहेर पडण्यासाठी आतुर आहे. वस्तू बाहेर काढल्यावर एक रिकामपण आलंय, पर्सलाही आणि मलाही. एका नवीन प्रवासासाठी माझ्या पर्सलाही याची गरज होती. मग एकेदिवशी सकाळी मी पर्स खांद्यावर लटकवून, छातीशी धरून लांबचा प्रवास करायला निघेन. रिकाम्या झालेल्या आम्ही दोघी नवीन अनुभवांनी भरून जाऊ. मात्र त्यासाठी आम्हाला बाहेर पडायचंय. बाहेर पडून त्या व्हायरसला एकदा विचारायचंच आहे, ‘‘तुझ्यात असं काय आहे?’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article radhika deshpande on womenhood